प्रिय टॉम अँड जेरी,

18 May 2022 10:38:20


tom and jerry

अरे कित्तीकित्ती वेडे आहात रे तुम्ही दोघं! हसूनहसून पोट दुखायला लागतं, जबडा दुखायला लागतो... इतकंइतकं हसवायचं? किती प्रेम करते माहितेय मी तुमच्यावर? जर समोर खरेखुरे असता ना, तर दृष्ट काढून टाकली असती तुमची. अगं आई गं... नुसतं तुमचं नाव जरी काढलं ना, तरी तुमच्या अशक्य खोड्या आठवून हसून डोळ्यात पाणी येतं. कसली कमाल आहे रे तुमची जोडगोळी

 

पण एक खरं खरं सांगू का…. तुम्ही दोघं ज्या खोड्या करता ना त्या जर घरात माझ्या मुलांनी केल्या असत्या, तर मात्र मी काठी घेऊन त्यांच्या मागे लागले असते. मग घरातल्या इतरांना प्रत्यक्ष 'टॉम अँड जेरी'समोर घडतंय असंच वाटलं असतं. अरे बापरे! किती रे तुमचा दंगा, एकमेकांच्या किती रे खोड्या काढता! खोड्या काढायच्या आणि एकमेकांवर मात करण्यासाठी ज्या आयडियेच्या कल्पना लढवता ना त्या फारच भन्नाट असतात. अगदी एकमेकांचा जीव घ्यायला उठलेले असलात तरी तेव्हाचे धम्माल किस्से, तुमचे चाळे बघून हसू आवरत नाही आणि आश्चर्य म्हणजे हे सगळं तुम्ही काही न बोलता करता तरी ते आमच्यापर्यंत अगदी नीटच पोहोचतं. काय एकेक भाव असतात तुमच्या चेहऱ्यावर! नंतर नुसतं आठवलं तरी हसायला येतं. हे खरं तर किती कौतुकास्पद आहे. तुम्ही कितीही मस्तीखोर असलात, तरी पण तुम्ही माझे फार फार लाडके आहात. त्या राम-लखनवर त्यांची आई जितकं प्रेम करते ना त्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम आहे माझं तुमच्यावर. वय वाढलं, तरी तुम्हाला सारखंसारखं बघायला आवडतंच मला. वय विसरायला लावता तुम्ही दोघं. तुम्ही तर चिरतरुण आहातच, पण सोबत सगळ्यांनाच तरुण करताय. कित्ती छान!

 

तुमचे चाळे बघताना मला आणखी एक सारखं जाणवत राहतं ते म्हणजे, तुम्ही सगळ्यांना खूप हसवता हे झालंच; पण त्या हसवण्याबरोबर तुमच्याकडून शिकण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत. जरी तुम्ही दोघं एकमेकांबरोबर प्रचंड भांडलात तरी जेव्हा दोघांवरही तिसरं काही संकट येतं, तेव्हा मात्र तुम्ही दोघं एकत्र येऊन त्या संकटावर मात करता. हे असं छुपं प्रेम खूप करता ना एकमेकांवर? कायम असेच रहा रे दोघं. जेवणात चवीसाठी तिखट-मीठ घेतलं तरी जेवणाचा शेवट जर गोडाने झाला तर आवडतंच ना सगळ्यांना... तसंच आहे रे तुमचं नातं! तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना असं होतं ना तुम्हाला? जेरीकडे पाहून मला कायम वाटतं की, आपला आकार, आपली ताकद केवढी आहे या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत. हार न मानता डोकं लढवून आलेल्या प्रसंगातून निभावणं महत्त्वाचं. किती काय काय शिकवताय रे आम्हाला! खरंच तुमच्यासाठी मी प्रचंड वेडी आहे.

 

मला जास्त हसू कधी येतं माहितेय? तुम्ही पळापळी करताना जर कशावर आदळलात किंवा तुमच्यावर काही एखादी वस्तू पडली, तर लगेच तुम्ही त्या वस्तूच्या आकाराचे होता. वेगवेगळ्या आकाराचे तुमचे स्टिकर झालेले बघताना आणि एकेक अवयव परत जागेवर आणताना बघणं फारच मजेशीर असतं. बिचाऱ्या टॉमच्या बाबतीत तर, असं स्टिकर होणं फार वेळा घडतं. जाम हसू येतं त्याला त्या अवस्थेत बघताना. तुम्हाला दणादण आपटताना किंवा मार खाताना पाहिलं की एकीकडे हसू तर येत असतंच पण तोंडातून स्स... अरेरे असे उद्गारही बाहेर पडत असतात. मरतंय आता वाटेपर्यंत हातून सुटलेला असता. मग मलाच हुश्श होतं. कधी शांत बसवतच नाही का रे तुम्हाला? दोघांपैकी कोणी एक शांत असलं तरी दुसऱ्याला लगेच त्याची खोडी काढावी वाटते आणि मग सुरुच होतो तुमचा हवाहवासा वाटणारा दंगा. यात ना जेरी तू जाम शैतान आहेस बरं का... टॉमच्या खोड्या काढून त्याला उचकवलं तर चिडणारच की तो; पण कसं होतं ना... तुझा साधा भोळा चेहरा पाहून सहानुभूती तुलाच मिळून जाते रे. आणि टॉमची ती प्रेयसी...तिच्यासाठी टॉमचं 'दिल' किती धकधक करत असतं! त्या दोघांच्यामध्येही तुझी लुडबुड आपली चालूच. असे उद्योग करताना तुला पाहिलं ना की कधीकधी तुझी शांत करुन घ्यावी की काय वाटायला लागतं बघ; पण जेरी, तुझं आणि बदकूच्या पिल्लाचं जे नातं आहे ना ते ही फार आवडतं मला. त्या पिल्लाला टॉमपासून वाचवण्यासाठी काय काय करतोस तू... आणि तुला वाचवण्यासाठी ते पिल्लू. ममा म्हणत ते पिल्लू जेव्हा तुझ्या अंगाला अंग घासतं ना तेव्हा मन हळवं होऊन जातं रे एकदम. लेकीबरोबर जर ते बघत असले ना तर तीही अशीच जवळ येते लगेच आणि मग माझे हातही तिला मिठीत घेतात. तुम्ही किती श्रीमंत करताय माहितेय मला!

 

दोघं खरंच ग्रेट आहात रे! सगळं विसरायला लावून किती वेळ खिळवून ठेवता! तुम्हाला पाहिलं ना की, एकदम कसं मोकळं मोकळं वाटतं. तुमचे चाळे कितीही जुने झाले ना तरीही ते प्रत्येकवेळी नवेच वाटतात. म्हणूनच तर मगाशी तुम्हाला चिरतरुण म्हटलं. जीवापाड प्रेम करावं असेच आहात दोघंही. बरं….आता बास करते बरं. कामं पडलेत खूप, पण आता समोर तुम्हाला पाहिल्याशिवाय हातच लावणार नाहीये कामांना. बघतेच आता काय दंगा करताय ते. कायम भेटत राहूच.

 

तुमच्या दंग्याची चाहती….

जस्मिन जोगळेकर

Powered By Sangraha 9.0