'कठीण कठीण कठीण किती पुरुषहृदय बाई', हे नाट्यगीत आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलं असेलच. या एका ओळीत किती प्रकारच्या भावना दडलेल्या आहेत. मानवी समाज एका चाकोरीत स्वतःचा व्यवहार करत असतो. स्त्री-पुरुष यांच्या भूमिकाही त्याने तशाच चाकोरीत मांडल्या आहेत. पुरुष म्हटला की, तो कमी आणि खर्जातल्या आवाजात बोलणारा, गंभीर वागणारा, कधीही न रडणारा, कठीण परिस्थितीतही कोलमडून न पडणारा, सतत कार्यरत राहून घरासाठी पैसा कमावणारा, घरातला कर्ता, स्वतःच्या मर्जीने वागणारा, प्रसंगी तऱ्हेवाईक वागणारा, काही घटनांमध्ये स्त्रीवर अन्याय करणारा, तिच्यावर बंधने लादणारा, तिला गृहीत धरणारा, कुरघोडी करणारा, व्यसनं करणारा, मुख्य म्हणजे स्त्रीवर्गाला समजून न घेणारा अशी एक प्रतिमा समाज आपल्यापुढे उभी करतो.
एका नुकत्याच मुंज झालेल्या मुलाला आईबाबा ओरडताना मी पाहिलं. कसल्यातरी बारीकशा गोष्टीवरून तो रडत घरी आला. वास्तविक, मुंज मुलगा म्हणजे जास्तीत जास्त दहा वर्षांचा असेल. त्याचं रडणं बघून आईवडिलांची प्रतिक्रिया होती, काय मुलीसारखा मुळूमुळू रडतोयस? माझ्यासाठी ही तुलना हा धक्का होता. म्हणजे मुळूमुळू रडतात त्या मुली आणि एखाद्या बाबतीत ठामपणे उत्तर देतात ते मुलगे ही मानसिकता जगभरातील आईवडलांमध्ये आजही रुजलेली आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही अंशी पालकांमध्ये बदल होत असला तरी त्याची टक्केवारी उत्साहवर्धक नक्कीच नाही. यूट्यूबवर अशाच संदर्भाचा एक व्हिडिओदेखील आहे. मुलग्यांवर मुळूमुळू रडणं हे अपराधी असल्याचं इतकं बिंबवलं जातं की, त्यातले कोमल हळवे क्षणांचं आकलनही त्यांना होईनासं होतं. याचीच परिणिती पुढे होते, ती स्त्रीविषयक चुकीच्या जाणिवा तयार होण्यात.
कमी गुण मिळाले म्हणून मुसमुसत रडणं असो, बहिणीची पाठवणी करताना ओक्साबोक्शी रडणं असो, पत्नीच्या प्रसुतीवेणा ऐकून डोळ्यात तरळलेलं पाणी असो, वृद्ध आई-वडलांच्या आजारपणाकडे पाहून दुःखातिरेकाने रडू येणं असो, जगातल्या प्रत्येक पुरुषाला आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. साध्या साध्या प्रसंगातही काही मुलं-पुरुष भीतीने भेदरलेला ससा होतात, काही जण दुःखावेगाने ओक्साबोक्शी रडतात, गळपटून जातात. आपल्याकडे ‘मर्द को दर्द नहीं होता’ ही संकल्पना बॉलिवूडने इतकी खोलवर रुजवली आहे की, 'टफेस्ट अँग्री यंग मॅन'च्या कल्पनेतून आपला समाज बाहेरच पडू इच्छित नाही. मुळात जिथे भावनावेगाचा मुद्दा येतो तिथे लिंगभेद उरतच नाही. केवळ दुःखच नव्हे तर आनंद त्याच्या आवडीच्या पद्धतीने व्यक्त करण्याचाही पूर्ण अधिकार त्याला आहे. मग तो मनातल्या मनात असो वा उन्मुक्तपणे एन्जॉय करत आनंद घेणं असो. छोट्याशा आनंदाने मोहरणं असो वा खळखळून हसणं असो. हर्षोल्हास, अपेक्षाभंग, यश-अपयश या साऱ्या भावना त्यालाही असतातच ना; पण केवळ पुरुष आहे म्हणून याचा मुक्त आनंद घेता न येणं हे किती अन्यायकारक आहे.
आज पूर्वीसारखं पुरुष उंबऱ्याबाहेर आणि स्त्री उंबऱ्याच्या आत अशी स्थिती राहिलेली नाही, अनेक पुरुष घरात काम करू इच्छितात, पत्नीचा आईचा घरकामाचा भार उचलू इच्छितात, घरकामात कोणताही कमीपणा नाही याची त्यांना जाणीव आहे, काही जण, तर मनापासून 'हाऊस हसबंड' होऊ इच्छितात. बहिणीला-मैत्रिणीला मुक्त वातावरणाचा अनुभव यावा यासाठी प्रयत्न करू इच्छितात, कार्यालयात सहकारी महिलेला मनापासून मदत करू इच्छितात, मुलामुलीला एकसारखं वाढवू इच्छितात. कोणाला विवाह करण्याऐवजी एकल आणि पूर्णपणे स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे, तर कोणाला 'लिव्ह इन'मध्ये राहण्यात रस आहे आहे, तर कोणाला एकट्यानेच मूल वाढवायचं आहे. परंतु, वर म्हटल्याप्रमाणे पुरुषांच्या जाणिवा एका चौकटीत अडकवून आणि त्याला पुरुषार्थाचं लेबल अडकवून समाज मोकळा होतो आणि अनेक गोष्टी मनात असूनही आज एक मोठा पुरुषवर्ग कुढत जगतो आहे.
आज अनेक पुरुषांना नोकरीतून थोडासा 'ब्रेक' हवा आहे, पण समाज काय म्हणेल या भीतीपायी तो 'ब्रेक' घेऊ शकत नाही. कोणाला नृत्यकलेत रस आहे, कोणाला स्वयंपाकात तर कोणाला शिवणकामात रस आहे. खूप कमी जणांना वेगळे ऑफबिट किंवा ज्यात मुलींचा सहभाग जास्त असतो अशा क्षेत्रात प्रवेश घ्यायला घरातून पाठिंबा मिळतो. कोणी घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेत पत्नीला करिअरमध्ये पाठिंबा देऊ इच्छितो. सहकारी स्त्रियांची धावपळ, घुसमट त्याला समजते आहे. स्त्रीवर कोणत्याही बंधने येता कामा नयेत अशी कित्येकांची मनापासून इच्छा आहे, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांच्या मनात भयानक चीड आहे; परंतु आपल्या पुरुषविषयक बंधनांना चिकटून तेही व्यक्त होणं सोडून घुसमटत आहेत. अनेक पुरुष अक्षरशः पिचले जात आहेत.
तो पुरुष आहे म्हणून किती गोष्टी त्याने करायच्या नाहीत, याची फार मोठी यादी आहे आपल्या समाजात. डोळ्यांत पाणी येऊनही त्याने रडायचं नाही, खळखळून हसायचं नाही, हळवं व्हायचं नाही, पत्नीला मदत करणारा पती म्हणून हसं होऊ द्यायचं नाही, आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे पत्नीवर सोपवून घर सांभाळायचं नाही, आवड असली तरी नृत्य करायचं नाही, 'पॅटर्नल लिव्ह' घेऊन मुलाचं संगोपन करायचं नाही, सहकारी स्त्रीसोबत मित्र म्हणून बोलायचं नाही, हळवेपणाने मन तिच्याकडे मोकळं करायचं नाही. महिला बॉसच्या हाताखाली काम करायचं नाही. मोजत बसलो, तर ही यादी कधी संपणार नाही.
आपल्याकडे ८ मार्च रोजी महिलादिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण १९ नोव्हेंबर रोजी असणारा पुरुष दिन मात्र दुर्दैवाने खिल्ली उडवत साजरा केला जातो. पुरुष 'दीन' अशी त्यांची हेटाळणी केली जाते. त्याच्याशी जोडले गेलेले विनोद सोशल मीडियावर प्रसारित केले जातात. आज हा दिन नसला, तरी त्या मुंजमुलाची घटना मात्र मला विचार करायला भाग पाडणारी होती. स्त्रीचं मन समजून घ्यावं अशी जी एक सार्वत्रिक अपेक्षा असते, तशीच पुरुषांचंही मन समजून घेतलं पाहिजे. बाप, पती, मुलगा, भाऊ, मित्र, सहकारी अशा वेगवेगळ्या भूमिकांत वावरणाऱ्या त्याचं मन वाचता आलं पाहिजे. त्याच्या व्यक्त होण्यावर सहज वाटावी अशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. लिंगभेदापलिकडे जाऊन माणूस म्हणून त्याला समजून घेतलं पाहिजे. पुरुषहृदयाचं कठीण दर्शन नाही, तर एक वेगळंच हळवं, समंजस रूप आपल्याला दिसून येईल.