माझिया मना...
खरं तर, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. अचानक समोर हे पत्र पाहून तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे होते; पण मी तुला पत्र लिहिणार आहे हे तुला आधीच कळलं होतं ना? कळणार नाही तर काय होणार? तुझ्यामुळेच तर सुचलं ना मला हे... आणि या पुढेही अशीच वेगवेगळी पत्रे लिहायला तू मला मदत करणार असं कबूल केलं आहेस. आहे ना लक्षात?
मला कधीकधी काही मॅडसारखं वाटतं. मी जे काय करते, लिहिते ते माझ्या मनात येतं, म्हणून माझ्याकडून केलं जातं; पण मनात कुठून येतं हे सगळं? मनाला पण मन असतं का? तरी प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीच. मनाच्या मनात कुठून येतं? की मनाच्या मनाला पण मन असतं? जाऊ दे ! फार गोंधळात टाकणारा प्रश्न आहे हा. अजून वाढवत बसले, तर उगाच ते सातारचा म्हातारा शेकोटीला आला खेळ खेळल्यासारखं वाटेल. आपण हा प्रश्न ऑप्शनला टाकून देऊ या झालं. मी पुढं कायकाय करणार आहे तुला पक्कं माहीत असतं, हे मलाही पक्कं माहितेय. बऱ्याचदा हे सगळं आपल्या दोघांतच चालतं ना रे. आताही काय काय लिहिणार आहे ते तूच मला सुचवतो आहेस; पण आज ते आपल्या दोघांतच ठेवायचं नाहीये मला. अर्थात तेही तूच सुचवलं आहेस म्हणा. त्यामुळं मला तुझ्याविषयी काय वाटतंय ते आज सगळ्यांना वाचायला देणार आहे मी.
लहानपणीची तुझी अल्लडता आता परिपक्व झाली आहे. झालेय ना रे? पण मुळात तू संवेदनशील आहेस ना ते मला खूप आवडतं. मोठं होशील तसं हळवेपणसुद्धा वाढत चाललंय का तुझं? एक मात्र आहे... किती वेगवेगळ्या गोष्टी करायला तू मला बऱ्याचदा उद्युक्त करतोस! कधीकधी त्यावर माझा आळस मात करतो ती गोष्ट निराळी; पण तुझी नाविन्याची आवड मला रहाटगाडग्यामधून बाहेर काढायला बघते हे नक्की. ते म्हणतात ना, 'कामात बदल म्हणजे विश्रांती'. तसं आहे तुझं. मी काही सारखी कामात अडकलेले असते असं नाही. पण तू मात्र अखंड काही ना काही चक्र फिरवत बसलेलाच असतोस. कधी विश्रांती घेणार रे तू? तुझं चक्र फिरवणं तरी कसलं... आत्ता वर्तमानात आहेस म्हणेपर्यंत व्हाया भविष्य, भूतकाळात कधी पोहोचशील काही सांगता येत नाही; पण भूतकाळात तुला फारसं रमायला आवडत नाही ना? आणि भविष्याबद्दल तरी कुठं काय माहितेय. आता आहेआहे म्हणेपर्यंत पुढच्या क्षणाला गायब झालेलं पाहतोच की आपण. त्यापेक्षा वर्तमानात जगायचं तुझं तत्त्व आवडतं मला.
मला माहिती आहे, सगळे म्हणतात मनात नेहमी चांगले विचार आणा. मन सुंदर तर जग सुंदर... हे सगळं अगदी मान्य आहे. तसं जर सगळी मनं सुंदर झाली तर स्वर्ग इथेच निर्माण होईल ना! पण शक्य नसतं ना ते. तू ही काही साधू- संत नाहीयेस. अधूनमधून काही तरी अंगात येतं तुझ्या ते माहिती आहे मला. तसंही तू मूडी आहेसच. तुला कधी एकटं रहावं वाटेल, कधी मस्ती करावी वाटेल, कधी कंटाळा येईल काही सांगता येत नाही; पण तसं प्रत्येकाच्या मनाचं होतच असणार की! सारखंसारखं तेचतेच करायला लागलं की, नको वाटणारच; पण एक मात्र आहे हं... तोचतोचपणा तू लिखाणात डोकावू देत नाहीयेस ते बरंय. कधी तुझ्यामुळे मुक्तछंदातली, तर कधी वृत्तातली कविता सुचते...कधी छोटेछोटे लेख लिहायला विषय पुरवतोस, तर कधी गोष्टी. असा बदल होत असल्यामुळं ना आणखी लिहावं वाटतं; पण एक तक्रार आहे हं तुझ्याबद्दल. कधीकधी इतका कसा रुसतोस रे? लिहायला एक शब्दही सुचत नाही मग. हे एखादं दिवस नव्हे, तर कधीकधी खूप दिवसही चालतं. मग मात्र मला करमत नाही हं. असं नको ना करत जाऊ. आपण हातात हात घालूनच आलोय रे आत्तापर्यंत. तू सोबत नसलास की, अगदी सुनं सुनं वाटतं बघ. एकटं वाटायला लागतं. एकटं राहणं आवडतं मला, पण तरी तुझी लिखाणासाठी मदत नसली, तर मात्र ते जीवघेणं वाटतं. बट्टी आहे ना आपली !
बरं… आता लिखाण थांबवायचं का हे? पण त्या आधी मला ना तुझ्याकडून वचन हवं आहे एक. अधूनमधून सुट्टी घेतलीस, तर माझी काहीच हरकत नाहीय; पण मला कायम साथ देत राहशील ना? तुझ्याशिवाय अधुरी आहे रे मी. चंचल आहेस तू माहिती आहे मला. मला सोडून; पण जाणार नाहीस तेही माहिती आहे; पण मला एवढंच सांगायचंय की, कधीच अगदी मरगळून जाऊ नकोस. तुझ्याकडे उत्साह असला ना, तर मीही उत्साही असते. संगतीचा असा चांगला परिणाम झाला तर उत्तमच ना! मरगळणार नाहीस असं वाटतंय आतून, तुला तशा अवस्थेत बघवणारच नाही खरं तर मला; पण ते वाटणं विश्वासात बदललं की मी निर्धास्त. मग राहशील ना कायम उत्साहात सोबत?
फक्त तुझीच