हसण्यासाठी जन्म आपुला

29 Apr 2022 09:49:19
हसण्यासाठी जन्म आपुला
 

smile 
 
हसतील त्याचे दात दिसतील किंवा अति झालं आणि हसू आलं, हसून हसून पुरेवाट असे वाक्प्रचार आपण किती तरी वेळा वापरतो. मुळातच हसू, रडू, आनंद, दुःख, क्रोध, द्वेष, शृंगार असे कितीतरी भाव मानवी जीवनाला व्यापून राहिले आहेत, म्हणूनच तर ते आपल्या भाषेचा-संस्कृतीचाही एक भाग झाले आहेत. माणूस आपल्या हावभावांतून हे भाव अभिव्यक्त करीत असतो. कधी नाजूकशी दंतपंक्ती दाखवत तर कधी सातमजली गडगडाट करीत तो आपला आनंद, हास्य व्यक्त करतो. कधी मुसमुसत, तर कधी ओक्साबोक्शी रडत मनाच्या वेदनेला, संतापाला वाट करून देत असतो. मानवी मनाची ही अभिव्यक्ती त्याच्या मनाचा कॅथार्सिस करत असते, म्हणजे त्याच्या मनातील भाव मोकळे करत असते. त्यातही हसणं वा हास्य ही क्रिया मनाला खूप आनंद देणारी असते. सकाळी एखाद्या घटनेनं चेहऱ्यावर उमटलेलं हसू अख्खा दिवस आनंददायी करू शकतं.
 
 
मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तम आरोग्यासाठी हास्य अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे योगदिन ही आपण भारताला दिलेली देणगी आहे, तसाच जागतिक हास्यदिन हादेखील जगाला भारतानेच दिला आहे. पहिला जागतिक हास्य जिन १९९८मध्ये भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजेच मुंबईत साजरा केला गेला. जागतिक हास्ययोग चळवळीचे अध्वर्यू डॉ. मदन कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. हास्य या कृतीचं महत्त्व आणि आवश्यकता अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि जागतिक हास्यदिन दरवर्षी साजरा करण्यात येऊ लागला. आज अनेक ठिकाणी हास्य क्लब आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक बागेमध्ये, मोकळ्या मैदानात हास्य योग करताना दिसून येतात. वास्तविक ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच सतत ताणाखाली असणारा नोकरदार वर्ग, अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थीवर्ग, नोकरी-घराचा ताळमेळ जमवणारा महिलावर्ग यांनाही या थेरपीची तितकीच गरज आहे.
 
 
आपलं बोळकं पसरवंत खळखळून हसणारं बाळ पाहिलं, सलज्ज चेहऱ्याने खुदकन हसणारी नवयौवना पाहिली, एखादा विनोद ऐकल्याने चेहऱ्यावर सहजपणे हसू उमटलं, एखाद्याचा सुंदर दंतपंक्ती असणारा हसरा चेहरा पाहिला की दिवस कसा छान जातो. बघा बरं आठवून... तुम्हीही याचा अनुभव घेतला असेल. हीच तर हास्याची गंमत आहे. हे सारं स्वाभाविक असलं तरी त्यामागे शास्त्रीय कारणंही आहेत. ती अशी – हास्य हे इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं, आरोग्य सुधारतं, बेचैनी दूर करतं, ताणाच्या परिणामापासून आपल्याला दूर ठेवतं, नातेसंबंध सुधारतं, शारीरिक वेदना दूर करतं. हे सारे झाले बाह्य दिसून येणारे परिणाम; पण आपल्या शरीरात नेमके कोणते बदल होतात, ते ही पाहू. हास्यामुळे मेंदूतून Endorphin नामक संप्रेरक स्रवतं. हे संप्रेरक मानवी मनाला फील गुडचा म्हणजे आल्हाददायक अनुभव देतं. एकट्याने नव्हे, तर समुहाने एखाद्या विनोदाचा आस्वाद घेतला तर, सगळ्यांच्याच मेंदूतून हे संप्रेरक स्रवायला सुरुवात होते, कारण मुळातच या संप्रेरकाचं काम हे सकारात्मकता किंवा आल्हाददायकता पसरवणं हे आहे. अशा हास्योत्पन्न करणाऱ्या घटनांमुळे माणसामाणसातील स्नेह बळकट होत जातो. हास्य मेंदूची कार्यक्षमता वाढवतं. निराश झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या मानवी मनावर चैतन्याची फुंकर घालण्याचं काम हास्य करतं. फुफ्फुसांची ताकद, छातीच्या-हृदयाच्या स्नायूंची ताकद वाढवण्याची करामत हास्य करतं. हृदयविकारापासून माणसाला दूर ठेवण्यात हास्य साहाय्यभूत ठरतं. अँटी-डिप्रेसंट म्हणजे निराशामुक्तीच्या औषधांचं कामही हास्य करतं. त्यामुळे खरं तर, प्रत्येक आजारात हास्य योगाचा किंवा हास्योपचारांचा समावेश करणं खरं तर आवश्यकच आहे.
 
 
एखाद्याने सांगितलेल्या विनोदावर किती स्वाभाविकपणे आपण हसतो, सकाळी वाचलेला एखादा छोटासा जोकही, नाश्त्याच्या टेबलावर घडलेला हसवणारा किस्सा आपल्याला दिवसभरासाठी चैतन्य देऊन जातो. अगदी एकटेच असलो, तरी एखादी घटना आठवून आपल्या ओठांवर हास्य पसरतंच. वाचनाची आवड असेल, तर हास्याचा एक मोठा दरबारच तुमच्यासाठी खुला आहे. मराठीत चिं. वि. जोशी, आचार्य प्र.के. अत्रे, पु.ल. देशपांडे, द.मा. मिरासदार, व.पु. काळे, मंगला गोडबोले यांनी आपल्या कथांतून, किश्श्यांतून, स्वगतातून, नाटकांतून, लेखांतून विविधरंगी, विविधढंगी हलकं फुलकं विनोदी साहित्य मराठी रसिकांसाठी उपलब्ध करून दिलंय. इंग्लिशमध्ये चार्ल्स डिकन्स, पी.जी. वुडहाऊस अशांनी हे दालन खुलं केलंय. एकटे असलात, तरी हरकत नाही. यांचं कोणतंही पुस्तक निवडा आणि वाचायला सुरुवात करा. 'पुलं' तर इतक्यांदा वाचलेत, ऐकलेत तरी पुनःप्रत्ययाचा तितकाच आनंद प्रत्येक वेळा देतात.
 
 
विनोदी पुस्तकाचं एखादं पान, नाटकातला एखादा विनोदी प्रसंग, एखाद्या नाटकात झालेली फजिती, हृषिकेश मुखर्जी, प्रियदर्शन यांचे विनोदी चित्रपट, एखादा सहज म्हणून झालेली; पण विनोदनिर्मिती करणारी घटना, एखादा विनोद, विडंबन काव्य, मोबाईलवर आलेला एखादा छोटासा विनोद, वर्तमानपत्रातील एखादी आगळीवेगळी सकारात्मक बातमी, चावट (हो असंही साहित्य मराठीत आहे) पुस्तकातील एखादा विनोदी किस्सा, वात्रटिका अशा अमाप गोष्टींनी आपलं जीवन अत्यंत सुखकर आणि आनंददायी केलं आहे. यातलं आपल्या आवडीचं एखादं निवडण्याची गरज आहे फक्त. एकटे असा वा दुकटे, दुःखात असा वा विवंचनेत, आजारी असा वा आजारपण निभावत असा, स्त्री असा वा पुरुष असा, बाल असा वा वृद्ध असा, संवेदनशील असा वा कोरडे पाषाण असा, अगदी कोणीही असा. हास्याची लकेर तुमचं जीवन सुखकर करू शकते. नेहमी गंभीरच रहायला हवं, असं कोणी सांगितलंय. या हास्याचा आनंदही भरभरून घ्यायला हवा.
 
 
या वर्षी जागतिक हास्यदिन १ मे रोजी येतोय. रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. मग करायची सुरुवात हा आनंद घ्यायला. एखादा विनोदी चित्रपट, विनोदी पुस्तक यांचा सहकुटुंब आनंद घ्या किंवा मग आपलं आवडतं खाणं आणि आवडतं विनोदी पुस्तक हातात घ्या व रविवार साजरा करा. खरं तर, हास्यदिन हा रोजच असायला हवा. दिवसभरात पुस्तकाचं एक पान तरी वाचण्याचा उपक्रम अनेक जण राबवतात. आनंदी राहण्यासाठी आपणही ते करू शकतोच की! एखादं आवडत्या लेखकाचं पुस्तक, एखादं नाटक, आवडत असतील, तर टिव्हीवरील स्किट्स याचा नियमित आनंद घेऊ या, तणावमुक्त होऊ या. हसण्यासाठीच, तर आपला जन्म आहे, अन्यथा सारं काही व्यर्थ आहे.
 
- मृदुला राजवाडे 
Powered By Sangraha 9.0