जगणं शिकवणारा अवलिया..!

27 Apr 2022 10:00:00

जगणं शिकवणारा अवलिया..!


jagana 

नेहमीप्रमाणे सायंकाळ होते, अन् मी फिरायला घराच्या बाहेर पडतो. घरापासून लांब असलेल्या सिमेंटच्या रस्त्याने मी चालत राहतो. सायंकाळ होण्यास बराच वेळ बाकी असल्याने कॉलनीतील सर्वच घरांचे दरवाजे बंद असतात. कॉलनीत सामसूम वाटत असतं. माझ्या शूजचा आवाज ऐकत घरे, रस्त्यानं ये-जा करणारी माणसं, बंद-चालू होणारी स्ट्रीट लाईट न्याहाळत मी चालत असतो. काही वेळ चाललो की, लाल मातीच्या जमिनीवर मी चालायला लागतो. मग सिमेंटचे रस्ते मागे पडतात. लाल मातीच्या रानात एका सरळ रेषेत चालून चालून तयार झालेल्या पायवाटेने मग मी चालत राहतो.
 

आता घरे मागे पडलेली असतात. दूरवर नजर जाईल तिथवर फक्त लाल मातीचे रान अन् या पायवाटा. लाल मातीच्या फुफाट्यात पडलेल्या बुटांच्या अनेक नक्षी न्याहाळत नवीन बूट कोणता, चप्पल कोणती हे बघत मी चालत असतो. दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत असतो. चीनच्या भिंतीप्रमाणे असलेल्या नवोदय विद्यालय अन् कॉलेजच्या भिंतीपलीकडे असलेल्या झाडांच्या पानांची सळसळ, वाऱ्याच्या झुळकेने येणारा आवाज अन् त्याच वाऱ्यामुळे माझ्यापर्यंत येणारा त्या झाडांचा दरवळ.

 

मी एकटा आहे. एकटाच चालत असतो. आता लाल मातीच्या रानातली पायवाटा मागे पडून डांबरी रस्त्याला मी लागलेला असतो. आता थोडीबहुत माझ्यासारखी एकलकोंडी माणसं एकटीएकटीच बाहेर फिरायला निघालेली असतात. माझं त्यांना न्याहाळणं सुरू असतं. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून मनोमन विचार करणं सुरू असतं, तेही कदाचित हेच करत असावे; कारण एकलकोंडी माणसं अशीच असतात. निरीक्षण करणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असतो.

 

डांबरी रस्त्याने दीड-दोन किमी चाललं की, येणारी-जाणारी माणसं, वाहनं, ऊसतोडीच्या परतीच्या वाटेला लागलेल्या गाड्या अन् पुन्हा ही एकलकोंडी माणसं... हेच मी न्याहाळत चालत असतो. साडेपाच झालेले असतात. त्यामुळे बँक, फायनान्ससारख्या क्षेत्रात काम करणारी माणसे वैतागून वैतागलेला चेहरा घेऊन घरी परतीच्या वाटेनं घराकडे निघाली असतात. त्यांचा टापटीपपणा त्यांचा हुद्दा काय आहे हे ओळखायला मदत करतो..!

 

इतकं सर्व चालून झालं की, मी रस्त्याच्या एकांगाला असलेल्या लाल मातीच्या अन् काळ्या खडकाच्या रानात खडकावर जाऊन एकटा बसून राहतो. माझ्यासारखी एकलकोंडी माणसं ज्याच्या-त्याच्या खडकावर बसून हे सर्व न्याहाळत असतात. दूरवर नुकतीच रिटायर्ड झालेल्या आजोबांची एक टीम त्यांच्या आठवणींना शब्दांनी उजाळा देत त्यांचे नोकरीचे अनुभव एकमेकांना सांगत असतात. दिसायला सगळे कसे टापटीप असतात.

 

मी ही माझ्या खडकावर बसून रस्त्यानं जाणारी, येणारी माणसे बघत विचार करत बसलेलो असतो. मग ती व्यक्ती मला माझ्या नजरेला भेटते, जिचा मी रोज विचार करत असतो, वाट बघत असतो.

होय, तीच ती व्यक्ती, जी रस्त्यानं चालतांना मला रोज भेटत असते. गवंड्याच्या हाताखाली जाणारी ती व्यक्ती माझा फिरायला जायचा वेळ अन् तिचा दिवसभर काम करून, वाळूचे घमेले वाहून थकून पार वाकून गेलेली ती साठीतील व्यक्ती! तिची आणि माझी परतीच्या वाटेनं जायची वेळ एकच असते.

 

अलीकडे रोजच भेटतो तोही, एका हातात तीन ताली डब्बा अन् एका हातात कधीकधी कामावर घालायचे कपडे असलेली पिशवी घेऊन तो चालत असतो. शेजारच्या गावातला असल्यानं तो दिवसभर काम करून थकून जात असल्यानं रस्त्यानं हळूहळू चालत असतो. चालता चालता थांबून मागून येणाऱ्या गाडीला न्याहाळत असतो. त्याच्या गावातलं कुणी ओळखीचे दिसलं की, त्यांना हातातला डबा वर करून थांबायला सांगत असतो. कुणीच थांबत नाही; पण तो चालत असतो, थांबत असतो, हात देत असतो अन् मी हे सर्व न्याहाळत असतो. रोजच त्याची अन् माझी या वेळेला भेट होत असते. कधी बोलणं नाही की, कधी काही नाही; पण हे आमचं भेटणं रोजचं असतं.

 

एक गोष्ट मी त्याच्या या अशा वागण्यातून कैद केली की, तो बळजबरीने कुणाच्या गाडीवर बसत नाही. तो फक्त हात देतो. कुणी थांबलं, तर मुकाट्यानं, खुश न होता गाडीवर बसतो आणि निघून जातो. कारण त्याला माहीत आहे रोजचं आहे हे आपलं. त्याचं एक विशेष अप्रूप यासाठीही वाटलं की, तो टापटीप पोशाख असलेल्या गाडीवाल्यांना कधीच हात देत नाही किंवा लिफ्ट मागत नाही. कारण मी समजू शकतो. एक अनामिक समाधान त्याला भेटलं की, मला वाटतं. त्यामुळे असं त्याचं रोजचं वाट बघणं असतं खडकावर बसून.

 

दर सोमवारी बाजाराच्या दिवशी एखाद्या आठवड्याला त्याची भेट होत नाही; पण एखाद्या सोमवारी झाली की, त्या दिवशी तो खूप छान टापटीप असा असलेला भेटतो. त्याच्या हातात असलेली बाजाराची पिशवी घेऊन तो चालत असतो. त्याच गतीने ज्या गतीने तो रोज चालतो. लोकांना हात देतो कुणी भेटलं की, निपचित गाडीवर बसतो अन त्याच्या घराकडे निघतो. यात त्याला काहीही वाटत नाही किंवा कुठला आनंद. त्याला मिळालेली लिफ्ट मी बघितली की, मला मात्र हल्ली आपसूकच आनंद होतो. मग मी विचार करत बसलेलो असतो त्याच खडकांवर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना न्याहाळत.

 

- भारत लक्ष्मण सोनवणे, औरंगाबाद

Powered By Sangraha 9.0