टवाळा आवडे ‘ट्रोलिंग’
टवाळा आवडे विनोद ।
उन्मत्तास नाना छंद ।
तामसास अप्रमाद । गोड वाटे ॥ असं समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात म्हटलं आहे. अर्थात, याचा अर्थ सगळेच विनोद करणारे टवाळ असतात, असा अजिबात नाही; पण ज्यांच्या अंगी खोड्याळपणा असतो त्यांना खोड्या काढल्यावाचून, विनोद केल्यावाचून राहवत नाही हे मात्र खरं! तसाच नवा खोड्याळपणा गेली काही वर्ष समाजमाध्यमांवर सुरू आहे तो म्हणजे ट्रोलिंग. अमुक एकाने तमुकाला ट्रोल केलं, रोस्ट केलं, अमुक एका ट्वीटवर ट्रोलर्सनी गर्दी केली, नेटकऱ्यांनी अमुक कलाकाराला ट्रोल करून नाकी नऊ आणलं असे संवाद आपण अनेकदा ऐकत असतो, वृत्तपत्रांच्या वेबपेजवर तशा बातम्या पाहात असतो; पण, हे नाकी नऊ आणणारं ट्रोलिंग आहे तरी काय?
स्मार्टफोन वापरणारा आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समाजमाध्यमावर असतोच. कुटुंबसदस्य, आपली मित्रमंडळी, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था-आस्थापनं अशी सर्वच समाजमाध्यमांवर कार्यरत असतात. संपर्कात राहण्याचं ते एक महत्त्वपूर्ण साधन आहे. मग ते फेसबुक असो, इन्स्टाग्राम असो वा ट्विटर असो. तिथे दिसणाऱ्या एखाद्या गोष्टीचं कौतुक करणं, एखाद्या पोस्ट-स्टेटसवर टीका करणं हेही नित्याचंच. त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे ट्रोलिंग. ट्रोलिंगची इंटरनेटवर मिळालेली व्याख्या अशी - The act of leaving an insulting message on the internet in order to annoy someone. म्हणजे एखाद्याला त्रास देण्यासाठी, दुखवण्यासाठी त्याच्या अकाऊंटवर, हँडलवर अपमानकारक संदेश लिहिणे. If you troll someone, you deliberately try to upset them or start an argument with them, especially by posting offensive or unkind things on the internet. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखाद्याला ट्रोल करता तेव्हा त्याला नाराज करण्याचा किंवा वाद घालण्यासाठी प्रवृत्त करण्याचा कार्यकारणभाव दिसून येतो. इंटरनेटवरील काही ट्रोल्सशी जेव्हा तुम्ही ही व्याख्या ताडून पाहाल तेव्हा त्यामागचा हेतू लगेचच लक्षात येईल. केवळ व्यक्तीच नव्हे, तर अनेकदा दोन संस्था-आस्थापनंही एकमेकांना ट्वीटरवर ट्रोल करत असल्याचं लक्षात आलं आहे. केवळ समाजमाध्यमच नव्हे तर ईमेल-व्हॉट्सअप ग्रूप, ब्लॉग, इंटरनेट 'चॅट रूम्स' इथेही एकमेकांना ट्रोल केलं जातं. फक्त यात सर्वाधिक प्रमाण समाजमाध्यमांचं आहे.
ट्रोलिंगची काही ठळक उदाहरणं आपण पाहू या. स्पॉटिफाय विरुद्ध नेटफ्लिक्स, ऑडी विरुद्ध बीएमडब्ल्यू, गुगल क्रोम विरुद्ध मायक्रोसॉफ्ट, तनिष्क-मायंत्रा-ब्रुकबाँड रेड लेबल विरूद्ध सामान्य जनता अशी अनेक ट्रोलिंगची उदाहरणं आपण गेल्या काही वर्षांत अनुभवली. इंटरनेट अस्तित्वात नसण्याच्या काळातही अशी काही ट्रोलिंगची उदाहरणं झाली आहेत, आठवतात का तुम्हाला? थम्स अप विरुद्ध अमूल दूधचं एक उदाहरण मला स्मरतंय. जेव्हा अमूल दूध पिणं किती महत्त्वाचं आहे असं जाहिरातीतून सांगितलं जात असे, तेव्हा ‘थम्स अप’ने दूध पिणं कच्च्या-बच्च्यांचं काम आहे असं जाहिरातीत म्हटलं होतं. त्यांना ती जाहिरात मागे घ्यावी लागली होती. हे त्या काळातलं ट्रोलिंगच नाही का? मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींवर, त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवर तर सर्वसामान्य लोक अगदी लक्ष ठेवून असतात. त्यांच्या मत व्यक्त करण्यावर, चित्रपटांमधील कंटेंटवर, त्यातील विरोधाभासावर ट्रोलर्स टीका करत असतात. स्मार्टफोनमुळे टीका करण्याचं साधन आपल्या मुठीत सामावलं गेलंय.
जिथे समाजमाध्यम आहे, तिथे ट्रोलिंग आहे. कोणाच्या वर्णावर, कोणाच्या तब्येतीवर, कोणाच्या कपड्यांवर, कोणाच्या कलात्मक सादरीकरणावर, कोणाच्या राजकीय मतांवर, कोणाच्या सामाजिक स्थानावर ट्रोलिंग होतंच असतं; पण ट्रोलिंगच्या या प्रवृत्तीची सकारात्मक बाजूही समजून घेतली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांसाठी थेट भेट घेऊन तक्रार व्यक्त करणं, वर्तमानपत्रात लिहून टीका करणं हे सहजसाध्य नसतं. अशा वेळी समाजमाध्यम हा एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. आणि याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने त्यांच्या अनेक जाहिरातींमुळे नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खोडसाळपणा केला आहे. कुंभमेळा, होळी, गणेशोत्सव अशा अनेक निमित्ताने त्यांनी तयार केलेल्या काही जाहिराती या समाजभावना, धर्मभावना दुखावणाऱ्या होत्या. अशा वेळी ट्रोलर्सनी त्यांचा चांगला समाचार घेऊन उत्पादनांवर प्रसंगी बहिष्कारही घातला आहे. याचंच आणखी एक नुकतंच झालेलं उदाहरण म्हणजे #NoBindiNoBusiness हा हॅशटॅग. समाजमाध्यमावरील महत्त्वाच्या लेखिका, प्राचीन मंदिरांच्या अभ्यासक, पारंपरिक वस्त्रांच्या जाणकार शेफाली वैद्य यांनी हा हॅशटॅग स्वतःपुरता सुरू केला आणि अक्षरशः ज्या ज्या जाहिरातीतील मॉडेल टिकलीशिवाय असेल, त्या उत्पादनांना-उत्पादकांना ट्रोल करायला सुरुवात केली. केवळ समाजमाध्यमावरच नव्हे, तर वर्तमानपत्रातील जाहिराती, रस्त्यात टांगलेल्या फ्लेक्सचे फोटो काढून कंपन्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, ऐन दिवाळीच्या तोंडावर तयार असलेल्या जाहिराती मागे घेऊन मॉडेलच्या चेहऱ्यावर टिकली असणाऱ्या नव्या जाहिराती सादर करण्यात आल्या. कारण त्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती.
ट्रोलिंग करणं हे वाच्यार्थाने अपमानकारक असलं, तरी त्याचा असा मोहिमेप्रमाणे वापर करणारे नेटकरीही आहेत. एखादा अभिनेता वा अभिनेत्री एखाद्या घटनेवर आपलं मत व्यक्त करतात, तसा त्यांना अधिकार आहेच; पण काही वेळा त्यांचं स्वतःचं वागणं मात्र याच्या अगदी विरूद्ध असतं. उदाहरणार्थ, हिंदीतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पर्यावरणाच्या समस्येवर टिका करणारं ट्वीट केलं होतं, प्रत्यक्षात तिचा धूम्रपान करतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला होता. अशावेळी त्यांना त्यांच्या वर्तणुकीची जाणीव करून देण्याचं काम ट्रोलर्स करतात. काही वेळा मात्र ठरवून, मानहानी करण्यासाठीच ट्रोलिंग केलं जातं. त्यासाठी पेड ट्रोलर्सची मदत घेतली जाते. पैसे देऊन, टुलकिट तयार करून ट्रोलिंग केलं जातं. म्हणजे व्यावसायिक दृष्टीकोनातून एकमेकांना खाली खेचण्यासाठी एखाद्या हत्यारासारखा ट्रोलिंगचा वापर केला जातो. यामुळे अनेकांच्या संपूर्ण कारकीर्दीवर परिणाम होण्याची शक्यता असते, द्वेषमूलक ट्रोलिंगमुळे एखादी कंपनी रसातळाला जाऊ शकते, राजकीय पटलावरून एखादं नाव कायमचं पुसलं जाऊ शकतं, एखादी सामाजिक संस्था कायमची संपुष्टात येऊ शकते. मुळात, इंटरनेट हेच दुधारी शस्त्र आहे. त्यातलंच एक चिमुकलं पण गंभीर परिणाम करणारं ट्रोलिंगचं विश्व आहे. ते कधी आपल्याकडे बुमरँगसारखं येईल सांगता येत नाही. त्यामुळे समाजमाध्यम वापरताना काळजी घेणं एवढंच आपण करू शकतो. टवाळखोर ट्रोलर्सना टाळणं एका मर्यादेपलिकडे आपल्या हातात नाही. स्वतःपुरती बंधनं घालून घेणं, त्यांना एंटरटेन न करणं एवढंच सध्या शक्य आहे.
(तळटीप – या लेखातील उत्पादकांची, आस्थापनांची नावं ही केवळ संदर्भासाठी घेण्यात आली आहेत. कोणालाही दुखावण्याचा लेखकाचा हेतू नाही.)