ऋतुराज आज वनी आला…
वसंतास...
काय गंमत आहे बघ न! तुला लिहिलेलं हे पत्र जर कोण्या तिसऱ्याच्या हाती पडलं, तर तुझं वसंत नाव वाचून कोणालाही वाटेल नं की, हे पत्र कुणा वसंत नावाच्या मुलाला लिहिलंय; पण मला सांग ना... मनातले भाव व्यक्त करायचे असतील, तर पत्र फक्त काय कुणा व्यक्तीलाच लिहायला हवं असं नाही ना! पत्र हे केवळ एक माध्यम आहे रे… तू आहेसच माझा अगदी जवळचा सखा, समोर असताना तुझ्याकडे नुसतं निरखत बसावं वाटतं असा माझा प्रिय वसंत. तुझं कित्तीकित्ती कौतुक करू असं होऊन जातं बघ मला. अक्षरशः शब्द अपुरे पडतात. तुझ्या येण्याने जशी फांदी-फांदीवर कोवळी पालवी फुटून येते कीनई, तसे मनातून नवीन नवीन शब्दसुद्धा फुटून यायला हवेत बघ तुझं कौतुक करायला. होईल का रे असं कधी?
तशी तुझ्याशी ओळख शाळेत असतानाच झाली. 'चैत्र-वैशाख वसंत ऋतू' असं शिकतच तर मोठी झाले; पण खरी ओळख मात्र नंतर हळूहळू होत गेली, जेव्हा निसर्गाच्या हातात हात घालून चालायला लागले. कित्तीकित्ती आनंद दिलास तू! तुला माहितेय? शिशिरातल्या पानगळीतून जाणवणारं भकास, उजाडपण तुझ्या चाहुलीनं कुठल्याकुठे पळून जातं आणि पुढचा ग्रीष्माचा जाळही तात्पुरता का होईना विसरला जातो. मग अशा वेळी कायम तू जवळ हवाहवासा वाटतोस; पण तुझं काय न…. ठराविक वेळी येणार नि ठरलेल्या वेळी जाणार. 'जरा अजून थांब ना' अशी कितीही लाडिक विनंती केली, तरी तू काही अजिबात विरघळत नाहीस. मग काय... बारा महिन्यातले फक्त दोन महिने तू येणार. मी बसते आपली तुझी चातकासारखी वाट बघत! पण एक मात्र खरं हं, एकदा का आलास की मात्र सगळ्या वर्षाचं उट्टं काढून टाकतोस. फक्त तू येण्याचा अवकाश... निसर्गात एकदमच हवीहवीशी गोड खळबळ उडून जाते. निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी बहरलेली झाडं जिकडे-तिकडे दिसायला लागली की, निसर्गातल्या या रंगपंचमीत रंगून जायला होतं. नानाविध रंगांना सोबत घेऊन तुझं येणं म्हणजे पर्वणीच असते रे. कोवळ्या कोवळ्या पानांचा तो नाजूक पोपटी रंग सकाळच्या तशाच कोवळ्या उन्हात चमकताना किती मस्त दिसतो! आणि पिंपळाची ती पानं.... त्यांचा तो लाल-गुलाबी रंग तर निव्वळ कमाल! तुला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची लाजेची छटा असते का रे ती? स्पर्श तर किती कोमल असतो तो. त्या पानांवरून अलवार हात फिरवला ना की, अगदी इवलुशा बाळाच्या अंगावरून हात फिरतोय असं वाटतं अगदी. किती नाजूक, मोहक असावं ना एखाद्यानं! झाडांवर उमललेल्या फुलांचे रंग म्हणजे तर वेड. जंगलात लाल-केशरी पळस फुललेला पाहिला की ते सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवते बघ मी. कितीकिती उपमा सुचून जातात मग आणि प्रत्येक झाडाचं, फुलांचं सौंदर्य वेगळं रे! हे नुसतंच दृष्टीसुख नसतं, तर मंद वाऱ्याबरोबर सर्वत्र दरवळणारा सुगंधही वेडं करून टाकतो. तेव्हा ना कपाटातल्या अत्तराच्या त्या कुप्यांना काहीच किंमत उरत नाही. सगळं अगदी सगळं वातावरण मोहमयी असतं. सृजनाची किती वेगवेगळी रूपं या काळात बघायला मिळतात अरे. आता झाडं, फुलं अशी बहरुन गेल्यावर त्यावर पक्षी, भुंगे आकृष्ट होणारच ना. तुला माहितेय… घड्याळातल्या गजरापेक्षा ना सकाळी पक्ष्यांच्या किलबिलीमुळे जी जाग येते ना, ती एकदम प्रसन्न असते रे. तू आलास ना की, हे सगळं सुख मिळत बघ. ती सुरंगी आणि त्यावरचे ते भुंगे…अरे किती दंगा चालू असतो त्यांचा! जाड जाड खोडावर बिलगलेली ती छोटीछोटी पिवळी फुलं आईच्या कुशीतल्या छोट्या बाळासारखी वाटतात; पण सुगंध काय वर्णावा! मधासाठी गोळा झालेले भुंगे तर बहुतेक वेडे होतात त्या फुलांसाठी. गंमत माहितेय... सुरंगीचे गजरे बाजारात जरी विकायला ठेवले असले ना, तरी त्याभोवती पण त्यांचा गुंजारव सुरुच असतो. सगळी मजाचमजा! एकूणच निसर्गात सगळीकडे लाघवी हालचाल असते, केवळ तुझ्या येण्यामुळे.
काय म्हणतोस? किती कौतुक करतेय तुझं? आहेसच रे तू कौतुकाला पात्र. आणि खरं सांगू? हे कौतुक करण्यामागे थोडा स्वार्थही आहे माझा. मला ना तू कायम माझ्यासोबत असावास असं वाटतं. म्हणून जरा खडा टाकून बघतेय; पण मला माहितेय तू काही बधणार नाहीस. बरोबरही आहे म्हणा तुझं. इतर ऋतूंचे बहरही तितकेच महत्त्वाचे आहेत ना. शिशिरातली पानगळ नसतीच, तर तुझ्या कोवळेपणात काय अप्रूप राहिलं असतं. वाट बघण्यातली लज्जत काही औरच असते. ती लज्जत मला गमवायची नाहीये हे ही खरं; पण मला एक सांग... हल्ली तुमचं हे ऋतुचक्र थोडं मागेपुढे झालंय का रे? चैत्रात येणारा तू जरा अलीकडेच यायला लागलाहेस असं वाटलं बघ मला आणि जायची तरी किती घाई रे तुला ! वसंत आला आला म्हणेपर्यंत ग्रीष्माच्या झळा सुरु होतात. मग तू असतानाच्या थंड रात्री आठवायला लागतात; पण माझ्या दृष्टीनं तुझं येणं महत्त्वाचं. तुझ्या थोड्या सहवासात जो आनंद मिळतो ना तीच माझी उरलेल्या वर्षाची ऊर्जा असते. माझ्या आनंदलोकात तुझं घर कायमचं असणार हे नक्की. असाच येत रहा आणि ऊर्जा देत रहा एवढंच माझं माफक मागणं. आता मात्र थांबते. भेटत राहूच.
तुझीच
(कोण ते माहीत आहेच तुला)
- जस्मिन जोगळेकर