पापड

14 Apr 2022 10:36:06
पापड
 

papad 
एके काळी मराठी मध्यमवर्गीय कुटुंब रेस्टारॅंटमध्ये जेवायला गेलं की, सगळी ऑर्डर देऊन झाल्यावर, जितके लोक तितके मसाला पापड मागवले जायचे. उडदाचा तळलेला पापड, त्यावर बारीक कांदा, टमाटा, शेव, तिखट-मीठ, चाटमसाला, कोथिंबीर घालून सर्व्ह व्हायचा. मेनकोर्स येईपर्यंत चाळा म्हणून हा पापड खाल्ला जायचा. नाजूक पापडावर ठेवलेले कांदे-टमाटे सांभाळत खायची कसरत करण्यात वेळ सहज निघून जायचा. घरी कधीही अशी कलाकुसर करून मिळायची नाही. आपल्याकडे बायका पापड, कुरडया घरी करतील; पण गार्निशिंग म्हणजे त्यांना वेळ वाया घालवणे वाटतं. आता मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात लोक पदार्थ सजवून, प्रकाशयोजना करून, प्रॉपर अँगलमध्ये फोटो काढायला शिकले आहेत.
 
 
उन्हाळा सुरू झाला की, वाळवणीचे पदार्थ बनवणं सुरू होते, त्यातील महत्वाचा पदार्थ म्हणजे पापड. 'पापड' हा शब्द संस्कृतमधील 'पर्पट' या शब्दापासून तयार झाला आहे. भारतासारख्या उष्ण प्रदेशात पापडाचा जन्म न झाला तर नवलच! पूर्वी हे सगळे वाळवणाचे पदार्थ सोवळ्यात केले जायचे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या पदार्थांना पाणी लागून खराब होऊ नये, हेच असायचं. उडदाच्या डाळीचा पापड जवळपास सर्व भारतीयांच्या घरी असतो, खाल्ला जातो. राजस्थान-गुजरातमध्ये, तर रोजच्या जेवणात पापड असतोच, आपल्याकडे मात्र सणासुदीला! दोन दिवस गहू पाण्यात भिजत घालून, भरडून, गाळून गव्हाचं सत्त्व वेगळं करायचे. या गव्हाच्या सत्वाला शिजवून त्याचं पापड किंवा कुरडया केल्या जातात. ही रेसिपी ज्या महाभागाने शोधून काढली, त्याला/तिला शतशः नमन! या शिजवलेल्या सत्वाला गव्हाचा चीक म्हणतात. कुरडया करतांना तेल-तिखट किंवा दूध-साखर घालून घरातील मंडळींना, विशेषतः लहान मुलांना खायला देतात. त्यात मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण चुकलं, तर काही खैर नाही. मोठया पातेल्यात हा चीक शिजत असतांना ढवळणं म्हणजे 'बायसेप्स'साठी चांगला व्यायाम आहे. याच चिकाचे पापडही करतात आणि गाळून वेगळ्या काढलेल्या गव्हाच्या खारोड्या! खारोड्या म्हणजे गव्हाचे फायबर, डाळ, तिखट, मीठ मसाले घालून शिजवायचे आणि पापड थापायचे. वाळल्यावर या कुरकुरीत खारोड्या नुसत्या, भाजून किंवा तळून खाता येतात. इतके फायबर तुम्हांला इतर कोणत्याही पदार्थात मिळणार नाही! ज्वारी, बाजरी यांच्याही खारोड्या, पापड बनवतात. नाचणी, पोहे, तांदूळ यांचे पापड तळल्यावर अतिशय चविष्ट लागतात, बटाट्याच्या 'चीप्स'पेक्षा केव्हाही चांगलेच!
 
 
उपवासाच्या पापडांमध्ये बटाटा, साबुदाणा, फणस यांचे पापड बनवतात. साबुदाण्याचा पांढराशुभ्र पापड तळल्यावर काय सुंदर दिसतो! या सगळ्या पदार्थांसोबत वेगवेगळ्या भाज्यांचे सांडगेही बनवले जातात, विशेषतः विदर्भात. लहानपणी बाजारात वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे लहान पापड मिळायचे, घरी आणून तळायचे. आईला कधी ते विकतचे पापड आवडायचे नाही म्हणून वेगवेगळ्या रंगाच्या कुरडयांवर ती हौस भागवली जायची. हा पोटभरीचा पदार्थ नव्हे; पण ताटात मात्र जास्त जागा लागते, मग थाळीत पोळीवर किंवा भाज्यांच्या वाट्यांवर वाढतांना सर्वांत शेवटी पापडाला स्थान मिळतं; पण मजा म्हणजे सगळ्या पदार्थांना झाकून टाकणारा मोठा पापड हा सर्वांत आधी खाल्ला जातो! भारतात लिज्जत पापडाचं साम्राज्य आहे आणि त्यापासून प्रभावित होऊन असंख्य लहानसहान उद्योग छान पैसे कमावत आहेत. पापड करणं हे प्रचंड कष्टाचं काम, पण टेकनॉलॉजीने सुसह्य झालंय. तेलात तळण्यापेक्षा एअर फ्रायरमध्ये बनवता येतील असे पापड बाजारात मिळायला हवेत, विशेषतः डाळींचे आणि गव्हातील फायबरचे! गव्हाच्या खारोड्यांना न्यूट्रीबारइतकी प्रसिद्धी आणि दर्जा मिळायला हवा!
 
 
उन्हाळ्यातील एखाद्या दुपारी उडदाचे पापड लाटायचा घाट घातला जायचा. साबुदाणा पापड, बटाटा चिप्स, लोणचे आणि अगदी कुर्डयाही घरातील बायका कोणाच्या मदतीशिवाय बनवायच्या (भूतकाळातीलच गोष्टी, आता सगळं विकत मिळतं आणि तरी खायला बंदी असते.) पण उडदाचं पापड लाटणं एका बाईचे कामच नाही. सकाळीच पापडखार, मसाले घालून उडदाच्या पिठाला दणके मिळायचे. हो, हे पीठ घट्ट भिजवण्यासाठी कुटावेच लागते! या पिठाच्या लहान गोळ्या, लाट्या बनवल्या जायच्या. हे लहान गोळे तेलात डुबक्या मारून, पोळपाटावर लाटले जायचे. जेवण वगैरे आटोपून दुपारच्या सुमारास सगळ्या बायका आपापल्या घराचे पोळपाट-लाटणे घेऊन पापडकर्तीच्या घरी जमायच्या. नॉनस्टॉप गप्पा मारत, भराभर पापड लाटले जात.
 
 
एका बाईकडे पापड लाटून झाले की, त्याच मीटिंगमध्ये दुसऱ्या बाईच्या घरी पापड लाटायची तारीख ठरायची. पूर्वी तर वाळवणाचं काम मुहूर्त पाहून करायचे म्हणे, आपल्या पंचांगावरून हवामानाचा अंदाज तेव्हा लावता यायचा. मध्येमध्ये लुडबुड करणाऱ्या आम्हा मुलांना ते भन्नाट चवीचं, उडदाचं कच्चं पीठ खायला मिळायचे; पण आमच्यावर नजर असायची कारण जास्त पीठ खाऊन आमचेच पोट दुखणार! हे पापड लाटायला रेषा असलेले एक वेगळे लाटणे असायचे, त्याची छान नक्षी उमटायची. शाळेत काही मुलांच्या डब्यात तशी नक्षी असलेल्या पोळ्या असायच्या पण आमच्याकडे मात्र केवळ पापड लाटायला ते लाटणे बाहेर निघायचे. उन्हात हे पापड पटकन वाळायचे आणि रात्री तळून ताटात हजर असायचे. इतकी मेहनत करून बनवलेले अर्धे पापड, कुरडया लोकांना वाटण्यात संपायचे आणि उरलेले कधीतरी सणासुदीला ताटात असायचे, सगळ्या पक्वान्नांच्या गर्दीत! कधीतरी भाजी नसेल तर उडदाच्या पापडांचा चुरा, तिखट, तेल आणि कांदा घालून पोळीसोबत खायला मिळायचा. असले भन्नाट कॉम्बिनेशन होते ते! घरात दोन-चार दिवस हिंग, मसाल्याचे सुगंध दरवळत असायचे, आता आठवणींचा सुगंध तेवढा उरला आहे!
 
- सावनी 
Powered By Sangraha 9.0