कल्याआईचं मंडळ

13 Apr 2022 10:07:53

कल्याआईचं मंडळ

 
kalyaaaicha mandal

पहाटेचे आठ वाजले होते. मी अजून अंथरुणात पडून होतो. आईची कामाला जायचं म्हणून काम आवरण्याची लगबग चालू होती. माझी झोप केव्हाच झाली होती; पण मी लोळत पडलो होतो अंथरुणात. आज मायला काम नव्हतं; पण आईची जोडीदारीन कल्याआई मायला म्हणली होती की, 'दिनकर पाटलांच्या मळ्यात एखाद्या वखताला काम राहील.' काल पाटील मला चौकात भेटले तेव्हा सकाळी कामाचा खुलासा करतो म्हणून कल्याआईला सांगून गेले होते.

 

कल्याआई मांगीन आईच्या टोळीची मुकरदंम होती. गावात शेतातली काही कामं असली की, गावातले लोकं तिला सांगायची अन् ती तिचं वीस-पंचवीस बायकांचं मंडळ करून त्यांना कामाला घेऊन जायची. सुगीच्या दिवसांत गावात तिचा बोलबाला राहायचा. या दिवसांत गावातल्या सरपंचाला कुणी हुंगायचं नाही; पण कल्याआईला मात्र सारं गाव शोधत भटकत राहायचं. लोकांना कामासाठी कल्याआई अन् तिचं मंडळ नेहमी लागायचं, कारण कल्याआईची कामातली इमानदारी, दिलेला 'शबुद' ती पाळायची अन् वखुत पडला, तर ती पैश्याला आठ-चार दिसांसाठी शिल्लक थांबायची..!

 

आईनं बिगीबीगी काम आवरलं अन् मी परसात जातो म्हणून आईला सांगून टरमळं घेऊन नदीच्या अंगाला गेलो. आईचं आवरलं. कल्याआई घरला आली अन् कामाचा खुलासा हावचा असला, तर पटदिशी निघायला म्हणून दुपारची न्याहारी भाकर, मिरचीचा खर्डा, लोणचं फडक्यात गुंडाळून माय आमच्या कुडाच्या घराला असलेल्या उंबऱ्यावर वेणीफणी करत बसली होती.

 

मी परसातून आलो. चुल्हांगांवर ठेवलेलं घमील्याततलं पाणी इस्नाला आलं होतं. मी ते पितळीच्या बांधलीत ओतलं अन् न्हाणीघरात जाऊन इसनाला रांजणमधून पाणी घेऊन अंघोळ करत बसलो. कडाक्याचा उन्हाळा असल्यानं अंघोळ करायला अजूनच भारी वाटत होतं. मी अंघोळ करत करत हिमेश रेशमियाच्या आवजातली गाणी म्हणत होतो.

 

कल्याआई चौकातून बिगीबीगी आमच्या खोपटाकडे वळली तसं मायना मला हाक दिली, 'छोटे सरकार, आवरा लवकर. तुमचं बाळंतपण कामाचा सांगावा घेऊन मांगीन म्हातारी आली हायसा. कामाचा हवाला असल, तर निघायला लागल.'

 

मी फटदिशी बादलीतलं सगळं पाणी अंगावर घेतलं अन् टायलानं अंग कोरडे करत आत खोपटात गेलो. तोवर कल्याआई अंगणात आली अन् आईला ओरडू लागली, 'लक्षे अय लक्षे दिनकर पाटलांच्या कामाचा खुलासा आला हायसा. सरकी येचायला पाशेरीवर बोलीले हाय काय करती जायचं का नाय..?'

 

माय आरसा खुंटीला टांगून बाहेर आली अन् कल्याआईला बोलू लागली,

 

'जायचं. तुझं सबुद खरं हायसा मायवं; पण आता सर्कीच्या चार-चार येचण्या होऊन गेल्या हाईत पाशेरीवर. काय भाव खाईल माय त्यो कापूस रोज भी नाय निघायचा माय आपला.'

 

'तुझं सबुद खरं हाय लक्षे पर, आपल्याला बी कुठशिक काम हायसा आज मग जावूत की, तेव्हडचं तेला-पाण्याला पैका होतील सौ-पचास अन् पाटील बरसदीच्या दिसाला आपल्याला मोप काम देतूया मग जावा लागत असा, काय म्हणीस तू..?'

 

'मग ठीक हाय माय जावा लागीस, पर शांता, कोळ्याची सुमन, रखमा, कला बंजारीन सबिना आपा यांना संगतीला घे म्हणजे लवकर उरकून घ्यायला होईल कपास.'

'अगं, त्या यायला हायसा तुझाच खुलासा घ्यायला मी आली हाय मग चालस का तू लक्षे..?'

'हा चालस माय चालस..!'

 

'चल मग, त्या बी निघाल्या हायसा, आपल्याला चौकात भेटतीला.' 'माझी भाकर घे व लेकी लक्षे आज म्या केली नाय पहाटेला वखुत झाला', मला उठायला, कल्याआई मायला म्हणली.

 

मी भांग पाडला अन् बुटाड घालून गावात हिंडायला निघालो होतो. मायना कल्याआईची भाकर धुडक्यात बांधून घेतली अन् घराला कडी-कोंडा घालून माय डोईवर भाकरीचे पेंडके घेऊन कल्याआई संगतीना निघाली. मायना उटळ माझ्याजवळ दिलं अन् मी ते करदुड्यात फाशी देऊन मायच्या मागमाग चौकात आलो. त्यांच्या मंडळातील रोजंदारनी आल्या होत्या.

 

म्या कल्या याडीला बघून तिला म्हंटलं,

'याडीये कशेर नंगाळ लामेलीछी तू दुपारेती बाटी खामेल..?'

कल्यायाडी बंजारीन म्हंटली,

'छोटं सरकार रिंगळा र नंगाळ अन् बोंभलार खुडी लामेलीछी..!'

 

- भारत लक्ष्मण सोनवणे.

Powered By Sangraha 9.0