कोशिंबीर
कोशिंबिरीची सॅलड, कचुंबर, सलाद ही अजून नावे आणि रायता हेही एक व्हर्जन. कच्च्या भाज्या/ फळे/ मोड आलेले कडधान्ये यांचे किंचित मीठ, मसाला घातलेले मिश्रण म्हणजे कोशिंबीर. परदेशात याच्या जोडीला तेल, मेयॉनीज, हमस किंवा स्पेशल सॅलड ड्रेसिंग्ज घालतात आणि आपण दही घालतो. ताटात चटणीजवळच या पदार्थाला जागा मिळाली. आता कुठे लोक ‘हेल्थ कॉन्शियस’ झालेत आणि कच्च्या भाज्यांचे महत्त्व त्यांना जाणवले. तसं पाहिल्यास, पुरातन काळापासून लोक कोशिंबीर खात असतील. अगदी आदिमानवाच्या काळातला पदार्थ आहे हा! अर्थात तेव्हा मसाले, मीठ, तेल वगैरे नसावे. कोशिंबीर म्हटलं की, मराठी लोकांना काकडी आठवतं. त्याला दही घालून केलेली काकडीची कोशिंबीर, खमंग काकडी असंही म्हणतात. या पदार्थाबद्दल मला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे कमी वेळ लागतो, कमी भाज्या/ फळे असली, तरी असंख्य कॉम्बिनेशन्स करता येतात आणि ड्रेसिंगचे प्रमाण योग्य ठेवल्यास अतिशय पौष्टिक होतो! सॅलड म्हटलं की, हिरव्यागार भाज्या डोळ्यासमोर येतात, पण चिकन सॅलडही असतं.
रायते आणि आपली दही घालून केलेली कोशिंबीर सारखीच असते. उकडलेले बटाटे/भोपळा/रताळे कुस्करून, दही घालून फोडणी देतात, ते रायतं अप्रतिम असतं. भाज्यांच्या चिरण्याच्या पद्धती आणि आकार यावरही चव अवलंबून असते. फळांचे फ्रुटचाट, कस्टर्ड घालून केलेलं फ्रुटसॅलड, केळ्याची कोशिंबीर (सणावाराला असते ती), गुजरातमध्ये मिळते ती कच्च्या पपईची कोशिंबीर (साम्भारो) हे काही वेगळे प्रकार. बिर्याणीसोबतचं रायतं सर्वांचं आवडतं आहे, पण खान्देशात वांग्याच्या भरीतासोबत द्राक्षे आणि काही फळे घालून कोशिंबीर करतात. तसं पाहता भारतातील कोशिंबिरीचे प्रकारच कोट्यवधी असतील, तर परदेशात तर अजून अधिक! रशियन सॅलड, ग्रीक गॉडेस सॅलड (इन्स्टाग्रामवर दिसणारी हिरवीगार रेसिपी), सीझर सॅलड हे प्रकार नेहमीच दिसतात. आपल्यासाठी कोशिंबीर तोंडी लावणे या प्रकारात मोडत असली, तरी परदेशात साईड डिश, डेझर्ट, मेन कोर्स, अपेटाईझर अशा कोणत्याही कोर्समध्ये सॅलड मिळू शकतं, किंबहुना त्यानुसार केलं जातं. इतकेच नव्हे, तर पास्ता, जेली, चीझ यांचे सॅलडही असतं. भारतात ड्रेसिंगचे फार प्रकार नाहीत. तेल, मसाले, दही, तीळ किंवा शेंगदाण्याचा कूट फार तर क्रीम ड्रेसिंगसाठी वापरतात. परदेशात मात्र व्हिनेगर, अंडे, तेल, मसाले, चीझ, अव्होकॅडो, वेगवेगळे सॉस यांचे भाज्या आणि चवीनुसार कॉम्बिनेशन्स असतात, इंटरनेटवर सापडतील.
फास्टफूडचे प्रमाण वाढले आणि जेवणात कोशिंबिरीची जागा फरसाण, शेव, कुरकुरे, चिप्स यांनी घेतली. खान्देशातील महालक्ष्मीच्या स्वयंपाकात काही कुटुंबांमध्ये चक्क सोळा प्रकारच्या चटण्या आणि कोशिंबिरी असतात. नेहमीप्रमाणेच जोपर्यंत परदेशातील लोकांनी कौतुक केलं नाही आणि डॉक्टरांनी सॅलड खा असं बजावलं नाही, तोपर्यंत आपण कोशिंबिरीकडे दुर्लक्षच केलं. आज मला खरंच काय लिहावं सुचत नाहीय. इतक्या लहानशा पदार्थाचा इतका मोठा आवाका असेल असं वाटलं नव्हतं. कोशिंबिरीचा एक फायदा किंवा तोटा असतो, तो म्हणजे मूळ पदार्थाची चव फारशी झाकली जात नाही, कारण बहुतांश साहित्य कच्चे असतं. यामुळेच कडसर भाज्या यात सरसकट वापरता येत नाहीत. परदेशी सॅलड्स काहीशी बेचव असतात, पण आपण मात्र चाट मसाला, तिखट, लिंबू यांचा मारा केल्याशिवाय कोशिंबीर खात नाही. दिवसभरात कमीतकमी आठ कप भरून कच्या भाज्या खाव्या म्हणतात ज्यामुळे मिनरल्स, व्हिटॅमिन्स, फायबर योग्य प्रमाणात मिळतं आणि पचनाचे आजार होत नाहीत. आपल्यापैकी बरेच लोक आठवड्याला आठ कप इतक्याही भाज्या खात नसतील. फळे/भाज्या फेसपॅकमध्ये घालून चेहऱ्यावर लावण्यापेक्षा खाल्ल्या तर ग्लो जास्त येतो आणि खूप काळ टिकतो, हा माझा अनुभव आहे.
मार्केटमध्ये सॅलड किंवा कोशिंबीर विकत घ्यायच्या मी विरुद्ध आहे. चांगल्या प्रकारचं पॅकेजिंग आणि कोल्ड चेन असल्यास भाज्यांचा लॉस कमी होईल जेणेकरून सगळ्या लोकांना जास्त प्रमाणात कोशिंबीर/सॅलड खाता येईल. यासाठी चांगली शाश्वत टेक्नॉलॉजी आणि योग्य डिस्ट्रिब्युशन सिस्टीम हवी, ते काम फूड इंडस्ट्रीचे आहे. कमीतकमी केमिकल्स वापरून भाज्या/फळे/ मोड आलेले कडधान्ये टिकवणे आणि ते लोकांपर्यंत किफायती दरात पोहोचवणे हे फूड प्रोसेसिंग आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीसमोर मोठे आव्हान आहे. चहा/कॉफीसाठी जशी प्रत्येक कोपऱ्यावर दुकाने/कॅफे आहेत तसे सॅलड आणि कोशिंबिरीसाठी हवे, काळाची गरज आहे!
- सावनी