मजविण मज तू दे रे राम !

21 Mar 2022 10:29:19

मजविण मज तू दे रे राम !

 
ramdas

'देव' या शब्दाचा अर्थच मुळी जो सतत काहीतरी 'देत' असतो असा आहे. त्यामुळे त्याच्यापुढे हात जोडल्यावर, त्याला काही तरी 'मागणं' यात चूक नाही; पण आपण देवाकडे मागून मागून काय मागतो, तर 'देवा या वर्षी ही परिक्षा पास करून दे', 'देवा या वेळी पगार वाढवून दे', वगैरे वगैरे... अशा मागण्या ऐकल्यावर देव म्हणत असेल की, 'बाबांनो, या सगळ्या गोष्टी मिळवण्याचे सामर्थ्य मी तुम्हाला आधीच दिले आहे ! फक्त त्या क्षमतांचा वापर करा.' थोडक्यात काय, तर देवाला 'कसं' आणि 'काय' मागावं हे माहिती असावं लागतं. आणि हे संतांकडून शिकावं. ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी पसायदान मागितलं, तसेच समर्थांनी रामरायाकडे आपल्या सर्वांसाठी एक मागणे मागितले आहे. त्याचा काही भाग या लेखात पाहू या.

 

समर्थ सुरूवात करतात, 'कोमल वाचा दे रे राम |' वाह ! किती सुंदर शब्द वापरला आहे. 'कोमल' वाचा. समर्थ इथे 'मधुर' वाचा दे रे राम किंवा अशाच अर्थाचा एखादा दुसरा शब्द वापरू शकले असते; पण त्यांनी 'कोमल' हा शब्द वापरला. का ? तर, समर्थांना 'गोडबोले' लोकं नको आहेत. कारण 'मधु तिष्ठति जिव्हाग्रे हृदये तु हलाहलम्', असे लोकं या जगात आहेत हे त्यांना माहिती आहे आणि केवळ गोड बोलणारी लोकं तरी काय कामाची ? आपले दोष दाखवणारी, आपल्या चूका समजावून सांगणारी मंडळीसुद्धा आजूबाजूला हवीच ना. म्हणून ते रामरायाला मधुर वाचा नाही, तर कोमल वाचा मागतात की, जिच्या मदतीने एखादे कठोर, कटू सत्यसुद्धा समोरच्या माणसाला सुसह्य होईल आणि त्याचा विपरीत परिणाम न होता आपली भावना योग्य पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचेल.

 

एकदा का हे साध्य झाले की, पुढची मागणी अलगद आपल्या झोळीत येऊन पडेल. कुठली मागणी ? समर्थ पुढे म्हणतात, 'विमल करणी दे रे राम'. विमल म्हणजे मलविरहित. निर्मळ करणी की, जिचे कुठलेही 'साईड इफेक्ट्स' नाहीत. आपली बहुतांश कामे ही बोलण्यावर अवलंबून असतात. कुठल्याही क्षेत्रात 'संवाद' हा एक अपरिहार्य घटक असतो. त्यामुळे तो जर का नीट झाला तर मी केलेले कामही योग्य पद्धतीने समोरच्या पर्यंत पोहोचेल. उदाहरणार्थ मी मन लावून प्रचंड काम केले; पण पलीकडच्या व्यक्तीला अद्वातद्वा बोलले, तर त्याचे माझ्याविषयीचे मत कलुशित होणार नाही का ? अतः माझी 'करणी' जर 'विमल' असावी असं मला वाटत असेल, तर आधी माझी वाचा 'कोमल' असणे गरजेचे आहे. आता कुठे कधी काय बोलावे यासाठी वेळेचे, परिस्थितीचे भान असणे आवश्यक आहे, म्हणून समर्थ पुढे म्हणतात,

'प्रसंग ओळखी दे रे राम | धुर्त कळा मज दे रे राम'

 

या ओळी वाचत असताना माझ्या मनात दोन विचार आले. पहिला म्हणजे, समर्थ रामरायाला 'प्रसंगावधानता' मागत आहेत आणि 'प्रसंगी ओळख ठेव बरं', असाही एक विचार मनाला चाटून गेला. म्हणजे बघा ना, समर्थ आपल्यासाठी मागणे मागत आहेत. त्यांना माहिती आहे की दुःखाचा प्रसंग आला की, हरिपाठ घेऊन बसणारी आणि सुखाचा प्रसंग आला की, हरीकडे पाठ फिरवणारी ही लोकं आहेत. मग अशा 'स्वार्थी' लोकांना गरज पडल्यास 'तो' मदतीला धावून येईल का ? खरं तर तो येतोच; पण असा प्रश्न आपल्यासारख्या लोकांना पडू शकतो म्हणून समर्थांनी हे लिहिले असावे असे वाटते, असो. हा कदाचित ओढून ताणून केलेला विचार वाटू शकतो; पण 'प्रसंग ओळख'मध्ये प्रसंगावधानताच समर्थांना अभिप्रेत आहे असे वाटते कारण पुढे ते म्हणतात 'धुर्त कळा मज दे रे राम'. एकदा का प्रसंगाची ओळख पटली की, आपले कोण आणि परके कोण याची देखील ओळख पटते.किंबहुना अशा लोकांची ओळख पटव असे समर्थ म्हणत असावे.

 

पुढे समर्थ म्हणतात, 'हितकारक ते दे रे राम'. मी लाख मागेन रे तुझ्याकडे, पण ते जर माझ्यासाठी हितकारक असेल तरच दे. फक्त हितकारक नव्हे तर 'जनसुखकारक' असेल ते दे. स्वतःपुरता विचार करण्याची शिकवण समर्थ कधीच देणार नाहीत. कारण बऱ्याचदा माझ्यासाठी हितकारक असणारी गोष्ट इतरांसाठी असेलच असे नाही.त्यामुळे 'हितकारक' आणि 'जनसुखकारक' असे मागणे पूर्ण कर.

 

पुढे ते म्हणतात, 'अंतरपारखी दे रे राम | बहुजन मैत्री दे रे राम 

राष्ट्रकार्य करायचे आहे तर लोकसंग्रह हवाच. एकटा माणूस काहीही करू शकत नाही. समर्थ स्वतः दासबोधात म्हणतात, 'बहुत लोक मिळवावे | एक विचारे भरावे |' असे बहुत लोक मिळवण्यासाठी बहुजन मैत्री हवी; पण एका विचाराने कार्यासाठी प्रेरित झालेल्या मंडळींचा संघ स्थापन करायचा आहे तर, बहुजनांचे अंतरंग पारखायला नको ? लक्षात घ्या, इथे समर्थ 'अंतर' हा शब्द वापरतात.कारण बऱ्याचदा 'दिसणे' आणि 'असणे' यात विसंगती असते. केवळ शरीराने बलदंड असणारी व्यक्ती नको आहे. मनात विचार पक्का असेल तर शरीर नंतरही कमावता येईल, पण बलदंड असून जर मनात विचार पक्का नसेल तर ऐन वेळी त्यांचा पाय मागे येण्याची शक्यता असते. अशाने राष्ट्रकार्य कसे होणार ? म्हणून त्यांच्या बाह्यरूपावर न भाळता त्यांचे अंतर पारख्याची शक्ती दे, असं समर्थ म्हणतात.

 

पुढे ते म्हणतात, 'विद्या वैभव दे रे राम | उदासीनता दे रे राम'.

वैभव आपणही मागतो हो देवाकडे, पण समर्थांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे तो इथे की, समर्थ विद्या वैभव मागतात आणि आपण धन वैभव मागतो. विद्या ही श्रेष्ठ संपत्ती आहे असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. एक सुभाषितकार या विद्या वैभवाचे फार सुंदर वर्णन करतो, तो म्हणतो,

'न चोरहार्य न राजहार्य न भ्रतृभाज्यं न च भारकारि ।

व्यये कृते वर्धति एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् ॥

अर्थात चोर चोरी करू शकत नाही, राजा आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही, जे भावांमध्ये वाटल्या जाऊ शकत नाही, ज्याचा कधीही भार होत नाही, खर्च केल्याने ज्याची संख्या वाढते असं विद्याधन हे सर्व श्रेष्ठ आहे. आणि म्हणून समर्थ विद्यावैभव मागतात; पण इथे एक प्रश्न पडतो की, विद्या वैभव ठीक‌ आहे पण उदासीनता का मागतात समर्थ ? तर, आपल्याला 'उदासीन' या शब्दाचा जो अर्थ माहिती आहे तो इथे समर्थांना अभिप्रेत नाही. उदासीन म्हणजे दुःखी असणे नव्हे तर उदासीन ही अध्यात्मातील एक श्रेष्ठ अवस्थेपैकी एक आहे. उद् + असीन म्हणजे वर जाऊन बसलेला. असा माणूस की, जो न गुंतता प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे पाहू शकतो. ही उदासीनता अपेक्षित आहे. मग ही उदासीनता केव्हा येईल तर, अज्ञान दूर झाल्यावर. अज्ञान आहे म्हणून आपण त्या गोष्टींमधे भावनिकदृष्ट्या गुंततो आहे, पण एकदा का विद्यावैभव प्राप्त झाले की, आपोआप अज्ञान नाहीसे होईल आणि आपल्यातली उदासीन वृत्ती जागृत होईल किंवा उलटही घडू शकते. उदासीनवृत्ती जागृत झाली की, विद्येचा सर्वार्थाने उपयोग केला जाईल आणि म्हणून समर्थ त्या रामाकडे उदासीनतेची याचना करतात.

 

पण हे असं कधीपर्यंत मागत राहायचं देवाकडे ? आणि काय काय मागायचं ? एक मागणी पूर्ण होत नाही की लगेच आपली दुसरी तयार असते. म्हणून समर्थ म्हणतात, 'मागो नेणे दे रे राम |' मला तुझ्याकडे काही मागायची इच्छाच उत्पन्न होऊ देऊ नकोस. कारण मला ज्या गोष्टी कळतात त्यापेक्षा किती तरी अधिक गोष्टींविषयी मी अनभिज्ञ आहे म्हणून 'मज न कळे' असे, पण जे माझ्यासाठी हितकारक आहे ते दे रे राम असं समर्थ म्हणतात.

 

किती विचार करून समर्थांनी मागणे मागितले आहे.आपल्यासाठी ! हे मी का म्हणते आहे कारण समर्थ पुढे म्हणतात, 'तुझी आवडी दे रे राम' ! आपणा सर्वांना ज्ञात आहे की, समर्थांचं उपास्य दैवत प्रभू रामचंद्र होतं. सदा सर्वकाळ त्यांच्या मनात फक्त रामाचंच वास्तव्य असायचं. असं असताना, ते रामाकडे हे मागणे का मागतील बरं ? या कारणास्तव असे मनापासून वाटते की 'दास‌ म्हणे मज दे रे राम' असं जिथे जिथे समर्थ म्हणतात तिथे 'मज' म्हणजे 'समर्थ' नसून 'मी' म्हणजे ही चौपदी वाचणारी, गाणारी, लिहिणारी, ऐकणारी व्यक्ती आहे.आणि ती हे मागणे रामाकडे मागते आहे.

 

खरं तर समर्थांच्या साहित्याचा आवाका इतका मोठा आहे की, त्यांच्या कुठल्याही साहित्यकृतीबद्दल लिहावे इतकी माझी योग्यता नाही. ही चौपदी वाचताना माझ्या मनात उमटलेला अर्थ मी आपणासमोर मांडला. हा असाच असेल असे ठामपणे सांगत नाही.'यः पश्यति स पश्यति' या उक्तीचा आधार घेऊन ज्याच्या त्याच्या दृष्टीप्रमाणे त्याला ह्या ओळींचा अर्थ लागेल. मी माझ्यापरीने हे उलगडण्याचा प्रयत्न करेन. श्रीराम समर्थ !

क्रमशः

- मृण्मयी गालफाडे.

Powered By Sangraha 9.0