सदाबहार गाण्यांचा प्रतिभावंत नायक

04 Feb 2022 10:52:40

सदाबहार गाण्यांचा प्रतिभावंत नायक

 
ramesh dev

भल्या मोठ्या दिवाणखान्यात दिमाखाने उभा असणारा पियानो, त्या सुरांच्या पार्श्वभूमीवर गायलं जाणारं सूर तेच छेडिताहे महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं गाणं आणि रमेश देव यांच्यासारख्या रूपसंपन्न, देखण्या नटाचा अभिनय हे चित्र प्रत्येक चित्रपटसंगीतप्रेमीच्या मनात ठसलेलं, कायमचं कोरलं गेलेलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक प्रतिभावंत, अभिनयसंपन्न आणि देखणे नट लाभले. प्रतिभावंतांच्या मांदियाळीतच वसलेल्या आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट कोण? असं विचारलं, तर त्यात सर्वांत वर नाव असेल रमेश देव यांचं!

 

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रमेश देव यांचं २ फेब्रुवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं आकस्मिक निधन झालं. ९३ वर्षं वय असलं, तरी त्यांचा उत्साह अठरा वर्षांच्या मुलाला लाजवणारा होता. त्यामुळे या चिरतरुण अभिनेत्याचं जाणं अनेकांना चटका लावून गेलं. त्यांनी उत्तमोत्तम कथा,दिग्दर्शन असणाऱ्या असंख्य मराठी-हिंदी चित्रपटांतून काम केलं. अनेक नाटकांतूनही कामं केली. त्यांनी काम केलेले चित्रपटच छान होते असं नव्हे, तर देखण्या नायकाला तितकीच श्रवणीय गाणी मिळण्याचं भाग्यही रमेश देव यांना लाभलं.

 

रमेश देव यांचा चेहरा आठवला की, माझ्या कानात रुंजी घालू लागतं ते सुवासिनीचित्रपटातलं 'काल मी रघुनंदन पाहिले' हे गाणं.

वीरवेष ते तरुण धनुर्धर, जिंकून गेले माझे अंतर

त्या नयनांचे चंद्रबाण, मी हृदयीं या साहिले,

रघुनंदन पाहिले, काल मी रघुनंदन पाहिले।।

 

विवाहापूर्वी प्रभू श्रीरामांची केवळ झलक पाहिलेल्या सीतेच्या मनातील भाव गदिमांनी आपल्या शब्दांतून, सुधीर फडके यांच्या संगीतातून आणि आशाबाईंच्या सुरांतून पूरेपूर प्रकटलीय. वास्तविक प्रत्यक्ष रमेश देवांचच खरोखर वर्णन असावं इतकं ते त्याच्या देखणेपणाला शोभलंय. खरं तर, या चित्रपटात तसं थेट देव यांच्या तोंडी एकही गाणं नाही; पण प्रत्येक गाणं हे त्यांच्याशी या ना त्या प्रसंगाने जोडलेलं आहे. मग ते येणार नाथ आताअसो वा जीवलगा कधी रे येशील तू...ही दोन्ही गाणी कथानायकाचा संदर्भ घेऊनच आपल्या भेटीला येतात.

 

हिंदीत जसा आनंदउल्लेखनीय तसा मराठीत देव यांची गाण्यातून खास ओळख तयार करणारा चित्रपट म्हणजे अपराध. सूर तेच छेडिता, गीत उमटले नवेहे अजरामर गीत याच चित्रपटातलं. 'सूर तेच छेडिता' हे गीत आणि रमेश देव हे अद्वय होऊन गेलं होतं इतके ते या गाण्याशी समरस झाले. यातलंच दुसरं महत्त्वाचं युगुलगीत म्हणजे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला….’ रमेश देव आणि सीमा देव जोडीचा सुवासिनी, जगाच्या पाठीवर प्रमाणे हादेखील आणखी एक नितांतसुंदर चित्रपट. साठच्या दशकात सामाजिक संदेश देणारे अनेक चांगले सिनेमे आले त्यातलाच वरदक्षिणा हा एक चित्रपट. हुंड्याच्या प्रथेवर भाष्य करणाऱ्या या सिनेमातलं 'घन घन माला', हे गीत गाजलंच. त्याहून थोडं सौम्य ढंगाचं पण खरं भारतीय तत्त्वज्ञान मांडणारं आणखी एक गीत गाजलं ते म्हणजे एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात’. आपल्या संस्कृतीत स्वतःकडे कमीपणा घेऊन देवाला शरण जाण्यास सांगितलं आहे. मुका बावरा, मी भोळा, पडेन का तुझिया डोळा ? मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरातअसे रमेश देव यांच्या तोंडचे शब्दही तेच तर प्रकट करतात. गदिमांचे शब्द आणि सुधीर फडके यांचं संगीत असणारं हे गाणं म्हणजे डोळे मिटून ऐकताना स्वतःचा स्वतःशी संवाद साधण्याचं, परमेश्वराला साद घालण्याचं एक निमित्तच.

 

उमज पडेल तर’, या चित्रपटातील नवीन आज चंद्रमाहे असंच एक प्रसिद्ध गीत. मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी अशी उत्कट भावना व्यक्त करणारं. शब्दातली उत्कटता केवढी, पत्नीला यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनीम्हणणारी. त्या काळात ही अशी भावना म्हणजे क्रांतिकारकच म्हणावी लागेल. जेव्हा जेव्हा चंद्र-चांदणं यांच्याशी संबंधित गाण्यांची यादी केली जाते तेव्हा हे युगुलगीत या गाण्याचा उल्लेख होतोच होतो. याच चित्रपटातील दुसरं गाजलेलं गाणं म्हणजे नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. एका विशिष्ट लयीतलं आणि जिथे काम तेथे उभा शाम आहे, नव्हे धर्म रे घर्म ते रूप पाहे, असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी ! अशा शब्दांत श्रमांचं महत्त्व सांगणारं हे गीत विशेष गाजलं.

 

मोलकरीणहा खरं तर आतड्याला पीळ पाडणारा सिनेमा. हा सिनेमा पाहून ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही, तो मनाचा कठोर समजावा इतकं भावोत्कट आणि करुणरसपूर्ण चित्रण यात केलेलं आहे. पण हलकं फुलकं सिनेमाच्या विषयापेक्षा वेगळं पण हलकं फुलकं रमेश आणि सीमा देव यांच्यावर चित्रित झालेलं हसले आधी कुणी, तू का मी?’ हे गीत. आशा भोसले आणि तलत महमूद यांचं युगुलगीत विशेष गाजलं. पी सावळाराम यांचे शब्द आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे.

 

ते माझे घरसिनेमातील रवींद्र भटांनी शब्दबद्ध केलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं व गायलेलं श्रमिक हो घ्या इथे विश्रांतीहे गाणं म्हणजे भागवत धर्माचा कर्मयोग सांगणारं. 

आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरीही दारिद्र्याचे

अभंग ओठी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती, अशा शब्दात गदिमांनी वारकरी पंथाचा, भागवत धर्माचा विठ्ठलभक्तीचा कार्यकारणभावच स्पष्ट केला आहे.

 

आपल्या पत्नीशी प्रतारणा करणाऱ्या नवऱ्याची रमेश देवांनी ज्यात भूमिका केली तो 'वैशाखवणवा'. या चित्रपटातलं सासरी निघालेल्या जावई रमेश देव यांना कोकणची महती सांगणारं, नावाड्याच्या तोंडचं गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवाहे गीत. आजही अनेक सांगितिक कार्यक्रमांमध्ये हे गीत आवर्जून गायलं जातं. आधुनिक वाल्मिकीने लिहिलेलं, पण तरीही कोकणातल्या पारंपरिक गीतांचा बाज असलेलं आणि नाट्यसंगीत क्षेत्रात जे तेजाप्रमाणे तळपले अशा पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं हे गीत आहे.

 

मराठीत ५० ते ८०च्या दशकात अनेक उत्तमोत्तम दर्जाचे सिनेमे तयार झाले. यांपैकी अनेक सिनेमांमध्ये रमेश देव यांनी आपल्या प्रतिभेने, अभिनयाने अलौकिक ठसा उमटवला; पण त्याला एक वलय प्राप्त झालं ते अत्यंत सुमधूर, श्रवणीय अशा या गीतांनी. सगळ्याच गीतांचा उल्लेख करणं शक्य नाही, पण त्यातल्या महत्त्वपूर्ण गीतांचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केलाय. रमेश देव यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात या गाण्यांचाही मोठा वाटा असणार आहे.

- मृदुला राजवाडे 
Powered By Sangraha 9.0