उपमा विनायकस्य !

28 Feb 2022 10:53:28

उपमा विनायकस्य !


सावरकर 

काही विशेषणे आणि पदव्या एखाद्या माणसाच्या वर्णनाला, वर्तनाला इतक्या चपखल लागू पडतात की, काही काळाने त्यांचे विशेषणहे रूप गळून पडून तो शब्द त्यांच्या नामाभिधानाचाच एक भाग म्हणून ओळखला जातो. असाच स्वातंत्र्यवीरहा शब्द होय ! हा शब्द उच्चारतो न उच्चारतो तोच सावरकरांची तेजस्वी आणि करारी मूर्ती आपल्या नजरेसमोर तराळून जाते आणि जणू या शब्दाशिवाय त्यांचे नाव अपूर्ण आहे असे वाटते. ज्याप्रकारे स्वातंत्र्यसावरकरांच्या जगण्याचा ध्यास होता त्याचप्रकारे साहित्यहा सावरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.

 

ते कवी म्हणूनच जन्माला आले होते, परिस्थितीमुळे त्यांना शस्त्र उचलावी लागली, परंतु त्याही स्थितीत त्यांनी उच्चकोटीचे साहित्य निर्माण केले हे आपण जाणतोच. त्यांची नवोन्मेषशालीन प्रतिभा आणि आशयघन कवितांना ध्यानात ठेऊनच महाकाव्य न लिहिता जाणकारांनी महाकवीही उपाधी बहाल करून त्यांना थेट कालिदासाच्या पंक्तीला नेऊन बसवले.संस्कृतमधे कालिदासाच्या उपमा वाचताना जसे अचंबित व्हायला होते तसेच सावरकरांनी दिलेल्या उपमा वाचतानाही आपण निःशब्द होतो. उदाहरण म्हणून आपण सावरकरांची तारकांस पाहूनही कविता बघूया.एकापेक्षा एक उपमा दिल्या आहेत यात सावरकरांनी.

 

मेघदूतामध्ये एका ठिकाणी कालिदास अलकानगरीतील वाड्यांची मेघासोबत तुलना करतो. अशीच जमीन आस्मानाची तुलना सावरकर या कवितेत करताना आपल्याला दिसतात. ते सुरुवात करतात,

सुनील नभ हें, सुंदर नभ हें, नभ हें अतल अहा ।

सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलची हा

अहाहा! काय सुंदर नाद आहे या शब्दांना. व्याकरणप्रेमींना नक्कीच अनुप्रासअलंकराची आठवण झाली असेल. मुळात सागराची आणि नभाची तुलना ही कल्पनाच किती आल्हाददायक आहे. पुढे सावरकर म्हणतात,

नक्षत्रांहीं तारांकित हें नभ चमचम हासे, प्रतिबिंबाही तसा सागरहि तारांकित भासे..

नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई । नभात जल तें जलात नभ तें संगमुनी जाई'

१९०६ मध्ये बोटीतून लंडनला जाताना लिहिलेली ही कविता आहे. बोटीच्या डेकवरुन दूर क्षितिजापर्यंत दृष्टिक्षेप टाकल्यास डोळ्यात फक्त ही निळाईच भरून राहते. म्हणून पुढे ते लिहितात,

खरा कोणता सागर ह्यातुनी वरती की खाली,

खरे तसे आकाश कोणते गुंग मती झाली

आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती,

किंवा आकाशी बिंबीति सागारिचे मोती

 

सावरकरांनी इतक्या साध्या सहज शब्दात लिहिले आहे की, या ओळींविषयी मला वेगळे काहीच लिहायची गरज नाही. अशी स्थिति झाल्यामुळे सावरकरांना प्रश्न पडला आहे की हे सगळे आकाशच आहे की ऋषीमुनींनी पुराणात वर्णन केलेला तो भावसागर म्हणून हा सगळा देखावा सागरच आहे ? विस्तीर्ण पसरलेल्या त्या निळाईने सावरकरांना बुचकळ्यात टाकले आहे. त्यांना आता सुंदर, सुखशीतल भासणाऱ्या चांदण्यांविषयी देखील शंका उत्पन्न झाली आहे व म्हणून ते थेट तिलाच विचारतात की बाई गं तू तशीच आहेस ना ?’ आणि पुढच्या संपूर्ण कडव्यात ते ह्या चांदण्यांना आगीचे लोळ म्हणून संबोधणाऱ्या, त्यांचे सुंदर रूप विद्रूप करणाऱ्या भिंगाने त्या तारकांचे निरीक्षण करणाऱ्या अरसिक जीवांना ते आगीचे लोळ हे न्हवेचहे अतिशय चतुराईने पटवून देतात आणि इथे सुरू होतात सावरकरांच्या उपमा ! मग हे आगीचे लोट नाही तर नक्की काय आहे ? यावर सावरकर पहिली उपमा देतात हे अमृत बिंदु सारे!

 

आपण त्यांना विचारू की, 'कसे काय ?' ते म्हणतात 'सांगतो.' समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश वरती नेता नेता देव आणि असुरांमध्ये ओढाताण झाली होती की नाही? त्या ओढताणीत काही अमृत बिंदु गळून पडले आणि म्हणून तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले’. ही ओळ प्रत्येक कडव्यात येते. इंग्रजीत याला ‘Repetition’ अलंकार म्हणतात ज्याला मराठीत आपण पुनरावृत्ति म्हणतो तो या कवितेत सावरकरांनी वापरला आहे.

 

दुसरी उपमा ते देतात ती म्हणजे अप्सरांचे हास्य’ ! ते म्हणतात की जेव्हा अप्सरा व इतर देव गण खाली डोकावून पाहतात तेव्हा त्यांना ह्या वसुंधरेवर छान चमेली, जाई, जुई, मोगरा आणि मालतीची फुले फुललेली दिसतात आणि आपल्याही नंदनवनात अशी फुले असावी म्हणून ते आपले हास्य नभात पेरून देतात व जेव्हा हास्य-लते सुरसुहासिनींच्या आली ऋतुत फुले तयाची तारे..’.

आपण म्हणू या हे कसे काय शक्य आहे ? त्यावर सावरकर लगेच उत्तर देतात हे नाही पटत का, ठीक आहे. मग हे पटतंय का बघा.

थवे काजव्यांचे की नंदनवनिंच्या चकचकले, तयाची तारे..’,

सुनील शालूवरि मायेच्या लकलकती टिकले, तयाची तारे..’ (इथे माया=प्रकृति होय) अशा एकसोबत दोन-तीन उपमा ते देतात. ज्ञानेश्वरीत माऊली जशा एका मागोमाग उदहरणांच्या आणि उपमांच्या लाडीच्या लडी आपल्या समोर ठेवतात तसेच सावरकर एका पाठोपाठ एक उदाहरणं देत जातात.

 

पुढच्या कडव्यात सावरकरांनी शृंगार रस हाताळला आहे. इतक्या संयतपणे सावरकरांची लेखनी चालते की, अश्लीलतेचा गंधही त्याला स्पर्श करत नाही. ते म्हणतात एकदा शिव आणि पार्वती प्रणयरसात मग्न असताना अचानक दारावर श्रीहरींची थाप पडते व ती पार्वती लगबगीने सावरून पळू लागते तेव्हा

हिसका बसूनी हार गळ्यातील तटकन तो तुटला,

त्या हरातील मोती सैरावैरा ओघळले, तयाची तारे..’.

तटकनहा ध्वनिदर्शक शब्द आहे. इंग्रजीत वर्णन केलेला ‘onamatopoia’ हा अलंकार इतक्या सुंदर पद्धतीने इथे येतो की वाचताना तो आवाज अक्षरश: ऐकू येतो आपल्याला.

 

पुढची उपमा, तर फारच सुंदर आहे. जेव्हा दशानन वैदेहिला पुष्पक विमानातून घेऊन चालला होता ना तेव्हा तिने जे अश्रु ढाळले तेचि राहिले असे चकाकत जाणो दिव्यबले, तयाची तारे...पुराणातील उदाहरणं झाली, कल्पनेतील उदाहरणं झाली, अशी विविध उदाहरणं देत आहेत. अशात ते त्यांचा क्रांतिकारी पिंड विसरणे शक्य आहे का ? नाही. मुळीच नाही. म्हणून ते पुढच्या कडव्यात लिहितात की, चितोडला जेव्हा परकीयांचे आक्रमण झाले तेव्हा चितोडवासिनी देवी अग्नीच्या ज्वालांवर आरूढ झाल्या आणि ज्वालारूढ देवी दुरुनी त्या चमकीत तेजोबळे, तयाची तारे...

 

पुढे सावरकर अनेक अशाच सुंदरसुंदर उपमा देतात. कधी नभाच्या विंगेतून वाकून देवाने रचलेले नाटक बघणाऱ्या अप्सरांची वदनमंडले, कधी तपस्या भंग झालेल्या शंभूचे संचित बिंदू अशी अनेक उदाहरणं देतात सावरकर. एवढ्यात कुठून तरी एक चांदणी त्या सुंदर अशा नभांगणातून निसटून जाते, तेव्हा सावरकरांना आपल्या प्रियजनांची आठवण येते आणि

''तुझा तुझ्या चांदणिशी पाहुनी प्रिय संगम साचा |

तव मत्सर ना, परि तळी त्या वियोग दयितांचा'

या शब्दांत ते त्यांच्या विरही भावनेचे वर्णन करतात. शेवटी मात्र जगण्याविषयी, या प्रवासाविषयी ते ताऱ्यांना अनेक प्रश्न विचारतात व एका वेगळ्याच वळणावर ही कविता संपते. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की, ही संपूर्ण कविता वाचनीय आहे. जरूर वाचा. मी जेव्हा ही कविता पहिल्यांदा वाचली होती, तेव्हा आपसूकच ओठांवर शब्द तरळले आणि ते म्हणजे उपमा विनायकस्य’ ! तुम्हीदेखील या उक्तीचा प्रत्यय घ्या.

- मृण्मयी गालफाडे

Powered By Sangraha 9.0