आठवले सारे सारे, गहिवरले डोळे..

21 Dec 2022 10:12:58

father
 
 
 
आठवले सारे सारे, गहिवरले डोळे..
माझ्या पिल्लास,
 
पिल्लू म्हटल्यावर गालातल्या गालात हसलीस ना? माहितेय मला…तू तशी हसली असणार, पाकिटावरचे अक्षर पाहून तुझे हात थरथरले असणार, आनंदाचे, आठवणींचे आणि आश्चर्याचे आसू बेमालूमपणे एकमेकांत मिसळून सीमोल्लंघन करायच्या तयारीत असणार…हो ना? आश्चर्याचे का म्हणतोय माहितेय? तू मनातल्या मनात म्हणत असशील की, काय हा बाबा पण…हातात फोन असताना आणि एकदा क्लिक केल्यावर प्रत्यक्ष बोलता येत असताना पत्र काय पाठवतोय. पण खरं सांगू? पत्रातली मजा काय वेगळीच गं! लिहिणाऱ्याच्या दृष्टीने आणि वाचणाऱ्याच्याही दृष्टीने वेगळी. बघ वाचताना येतेय का मजा तुला…
 
असे कितीसे दिवस झाले गं तुझं लग्न होऊन…पण अजून तू आसपासच आहेस असंच वाटतंय. तू आम्हाला सोडून सासरी गेलीस आणि इकडे माझ्या मनातल्या आठवणी फुलपाखरं होऊन अवतीभवती भिरभिरायला लागली बघ. तुझ्याबरोबरच्या रंगबिरंगी आठवणींचे रंगबिरंगी पंख तुझ्यापर्यंत पोहोचायला बघताहेत… त्यांना कसं आवरू गं? खरंतर आठवणींच्या त्या रंगात भिजत भिजतच तू लहानाची मोठी झाली आहेस. आठवतंय तुला?…तुझ्याच लहानपणीच्या गमतीजमती मी तुला 'एक छोटीशी मुलगी होती बरं का…' अशी सुरुवात करत सांगायचो. सगळी गंमत ऐकून झाली की, तू विचारायचीच मला…'कोण होती ती मुग्गी?' मग तुझं नाव सांगितलं की, लाजत लाजत इतकी काही गोड हसायचीस की बस…तुझं ते मधाळ हसणं बघण्यासाठी मी सारखं सारखं त्या आठवणींच्या रंगपंचमीत तुला भिजवायचो. किती गोड दिवस होते गं ते! का मोठ्ठा झालास रे माझ्या पिल्ला? मोठी होत गेलीस तशी तुझ्या छुम छुमची जागा नाजूक आवाजाच्या पैंजणांनी घेतली. पण तुझा आवाज मात्र…अखंड बडबड. घरी असलीस की, कधी कधी वाटायचं कधी एकदा शाळेत जातेस; पण तू बाहेर पडायचीस त्या क्षणापासून मन मात्र तुझ्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसायचो. तू नसलीस तरी तुझा आणि तुझ्या पैंजणांचा आवाज आसपास रेंगाळतोय असं कायम वाटत राहायचं. आता तर कोणाच्या पायातल्या पैंजणांचा जरी आवाज आला ना तरी पटकन तुझे लहानपणीचे बोबडे बोल आठवून जातात. ते बोलही तसेच नाजूक असायचे… पैंजणांच्या नाजूक छुम छुम छुम आवाजासारखे. तुझे ते बोल मनात साठवायला आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला मला किती कसरत करावी लागायची माहितेय? अळवाच्या पानावरचा पाण्याचा थेंब जर जमिनीवर निसटू द्यायचा नसेल तर किती कसरत करावी लागेल ना तशीच! पण कसरत केली तरी त्याचे श्रम मात्र कधीच व्हायचे नाहीत, उलट अधिक ऊर्जा मिळायची त्यातून. तेव्हाच काय; पण आताही तुझी उणीव भासू न देण्यासाठी तीच ऊर्जा काम करतेय. फार रम्य दिवस होते ते. तुझ्यासारखी गोड मुलगी पदरात घातल्याबद्दल आणि तुझ्याबरोबरचे ते सुंदर क्षण याबद्दल देवाचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील.
 
आता काय…त्या रम्य आठवणीच सोबत घेऊन पुढे जात राहायचं. फोनवरून तर आपलं बोलणं होत राहीलच, पण आज एकदम तुला पत्र का लिहावं वाटलं सांगू? संदीप खरेची "दमलेल्या बाबाची कहाणी" ऐकत होतो आणि अनिवार रडू आलं. मग म्हटलं हे फोनवर सांगण्यापेक्षा पत्र लिहावं तुला. कारण फोनवरचा माझा कापरा आवाज तू लगेच पकडला असतास ना! हे गाणं काय आजच पहिल्यांदा ऐकलं असं नाही ना. आपण दोघांनी मिळून कितीदातरी ऐकलंय आणि गळ्यात पडून कितीदातरी रडलोय. पण गाण्यातल्या त्या बाबासारखा मात्र मी नव्हतो कधीच. तुझं बालपण ही मी खूप एन्जॉय केलंय. आपण दोघांनी मिळून किती मस्ती केलेय, मजा केलेय. सगळं लख्ख डोळ्यासमोर आहे अजून आणि कायमच राहणार ते.
 
"बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत-रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं"
 
हे कडवं ऐकलं आणि तू जशीच्या तशी दिसायला लागलीस. तू म्हणजे घरातलं हिंडतं फिरतं चैतन्य होतीस गं. तेच चैतन्य आता जावईबापूंच्या ओंजळीत दान म्हणून दिलंय ना! 'दान' शब्द वापरताना चुकल्यासारखं वाटतंय गं काही. दान दिलं की त्यावर आपला हक्क राहत नाही ना खरंतर. पण इथं मात्र तसा अर्थ बिलकुल लावायचा नाही हा आपण. तू माझीच आणि मी तुझाच आणि हे नातं असंच कायम राहणार हे पक्कं जाणून आहोत आपण दोघंही. तुमच्या हल्लीच्या भाषेत ते काय म्हणतात 'लब्यु' वगैरे…तसलं काही जरी मी म्हटलं नाही तरी तू समोर आलीस की माझे डोळे सांगतीलच तुला काय ते. कधी येतेस मग?
 
फक्त तुझ्यावर प्रेम करणारा तुझा…
बाबा
 
जस्मिन जोगळेकर.
 
Powered By Sangraha 9.0