पठाणच्या निमित्ताने
सध्या सिनेसृष्टीत बड्या स्टार्सचा येऊ घातलेला प्रत्येक सिनेमा आपल्यासोबत नविन वाद घेऊनच प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. आता प्रेक्षकांना पण ह्याची सवय झाली आहे, किंबहुना “बॉयकॉट बॉलीवूड” हा हॅशटॅग त्यामुळेच जास्त ट्रेंडींग असल्याचे सातत्याने दिसून येतो.
१४ जून २०२० ला अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली त्याला आता दोन -अडीच वर्षे उलटून गेली आहे. एका उमद्या आणि नवोदित अभिनेत्याचा असा आकस्मिक मृत्यू व्हावा ही बातमीच मुळात खूप दु:खद होती त्याच्या अकाली मृत्युला बॉलीवूडमधील गटबाजीच जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. त्या घटनेनंतर बॉलीवूडमधील कंपूशाही, घराणेशाही, बड्या ताऱ्यांची स्वैर वागणूक, पाठोपाठ उघडकीस आलेले ड्रग्स प्रकरण या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून लोकांच्या मनात निर्माण झालेली खदखद हळूहळू बाहेर येऊ लागली. भारतीय लोक हे मुळात सिनेमाप्रेमी असतात. सिनेसृष्टीच्या बाबतीत एक सुप्त आकर्षण लोकांच्या मनात असते. तारे - तारकांची जीवनशैली आणि त्यांचा भारतीयांच्या जीवनावर होणारा परिणाम हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल एवढी त्याची व्याप्ती आहे. त्यामुळे ही खदखद आता दिवसेंदिवस उग्र होताना दिसते. लोकांच्या रोषाला दाक्षिणात्य सिनेमांच्या घवघवीत यशामुळे शिडात हवा भरल्यासारखी गती मिळाली. आता त्यात भर पडली आहे शाहरुख खानच्या बहुचर्चित पठाणची!
शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या मागे लागलेले ड्रग्स प्रकरण आणि त्यातून उद्भवलेल्या कोर्ट कचेऱ्या यामुळे शाहरुख माध्यमांच्या मुख्य प्रवाहापासून दीर्घकाळ दूर राहिला होता. त्याचे “जब तक है जान, फॅन, हॅरी मेट सेजल, झिरो, दिलवाले …असे गेले काही चित्रपट तिकीट खिडकीवर अपेक्षेप्रमाणे फारसे यशस्वी ठरले नाही. बाहुबली, RRR, कांतारा, असे काही दक्षिणात्य चित्रपट शाहरुखच्या हिंदी सिनेमापेक्षा अधिक कमाई करताना दिसले त्यामुळे बॉलीवूडचा बादशाह म्हणवून घेणाऱ्या शाहरुखसाठी ही तशी धोक्याची घंटा मानली जाऊ शकते.
ह्या पार्श्वभुमीवर शाहरुखचा प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘पठाण” सिनेमातील “बेशरम रंग” गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेली तोकडी वस्त्रे आणि तीदेखील भगवी असल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले. ह्या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची ओरड सुरु झाली. पाठोपाठ शाहरुखने वैष्णोदेवीचे घेतलेले दर्शन आणि आमीर खानने सपत्नीक हिंदू रिवाजानुसार केलेले,पुजाविधी ह्यामुळे बॉलीवूड हिंदू प्रेक्षक टिकून रहावा यासाठीच धडपडत असल्याचे दिसून आले.
हा सारा प्रकार नकळत घडून आला की, जाणिवपूर्वक केलेले पब्लिसिटी स्टंट होते असा प्रश्न पडावा इतकी बॉलीवूडची प्रतिमा सद्यस्थितीत जनमाणसात मलीन झाली आहे. गेल्या काही वर्षात हिंदी सिनेसृष्टीने जागतिक पातळीवर स्वत:चे फार मोठ्या प्रमाणावर बस्तान बसविले आहे. जवळपास दोन दशकापुर्वी २००० साली लंडन येथे पहिला वाहिला आयफा पुरस्कार सोहळा रंगला होता. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच बॉलीवूडने जग पादाक्रांत करायला सुरुवात केली होती. या साऱ्या प्रकाराची सुरुवात खरतर नव्वदच्या दशकातच झाली होती. अनिवासी भारतीयाना डोळ्यासमोर ठेवून लिहिले गेलेले राहुल - राज सारखे अनेक पात्र शाहरुखने रंगवले होते.
चोप्रा - जोहर व इतर मंडळींनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, परदेस, दिल तो पागल है, मोहोब्बते, कभी ख़ुशी कभी गममधून पाश्चिमात्य जीवनशैली जगणारा नायक दाखवून मुक्त अर्थव्यवस्थेत नव्याने श्रीमंत होऊ घातलेल्या भारतीय तरुणाईला वेड लावले. जवळपास प्रत्येक अभिनेत्याने आणि अभिनेत्रीने ह्या काळासोबत जुळवून घेतले. शाहरुख ह्या काळात कारकीर्दीच्या सर्वोच्चस्थानी होता त्यामुळे त्याचा प्रभाव निश्चितच जास्त होता. त्यानेच साकारलेला राजू बन गया जंटलमन, चमत्कार, कभी हा कभी ना, बाजीगर मधला सर्वसामान्य भारतीयांच्या जवळचा वाटणारा नायक त्यामुळे हळूहळू दूर होत गेला.
हे सगळं घडत असताना शाहरूखची वैयक्तिक महत्वाकांक्षा जागतिक दर्जाचा सुपरस्टार होण्याची आहे हे मात्र लपून राहिलेले नव्हते. जिथे भारतीय सिनेसृष्टीच हॉलीवूडला टक्कर देण्याच्या तयारीत होती तिथे शाहरुख मागे कसा राहील? त्याच्यातल्या कुशल व्यावसायिकाने नवीन मार्ग चोखाळला. हॉलीवूडमध्ये जाऊन दुय्यम भूमिका करण्यापेक्षा त्याने आखाती मुस्लीम राष्ट्राकडे मोर्चा वळविला. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक , सौदी अरेबिया ह्या भागात आपली लोकप्रियता एन्कॅश करण्याचा प्रयत्न त्याने केला. ९/११ ला अमेरिकेवर झालेल्या विमान हल्ल्यामुळे जगभरातील मुस्लीमांकडे संशयाने पाहिले जाऊ लागले होते. शाहरुखच्या ‘माय नेम इज खानने” जागतिक पातळीवर मुस्लीम समुदायाच्या त्या असंतोषाला अथवा अस्वस्थतेला वाचा फोडत त्यांचे नायकत्व स्वीकारले.
“वीर झारा” मधील भारत - पाकिस्तान शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर असलेली प्रेमकथा किंवा “मै हु ना” मधील ऑपरेशन मिलाप ह्या सिन मधून भारत - पाक मैत्रीची गरज बोलून दाखवली कारण अर्थातच भारतीय सिनेसृष्टीतल्या धुरीणांना पाकिस्तानातील मार्केट खुणावू लागले होते. टीव्हीवर दिसणारे सिंगिग, कॉमेडी किंवा इतर रीएलीटी शो मध्ये पाकिस्तानी कलावंत जास्त दिसू लागले. एवढच काय पण नुकत्याच सुरु झालेल्या आय.पी.एलमध्ये शाहरुखने कोलकाता नाईटरायडरसाठी आवर्जून शोएब अख्तरला घेणे हे सगळ ते मार्केट टिकविण्याच्याच धडपडीचा एक भाग होत. “ओम शांती ओम: मध्ये झाडून सगळ बॉलीवूड आलेल असताना नायकाच्या वडिलांच्या रोलमध्ये मात्र पाकिस्तानी अभिनेत्याची वर्णी लागावी हा केवळ योगायोग म्हणावा का ?
‘चक दे इंडिया” मधून पुन्हा एकदा शाहरुखला तसाच व्हिक्टिम कार्ड खेळणारा रोल मिळाला. रईस मध्ये पण त्याची पुनरावृत्ती झाली. अर्थात फक्त शाहरुख हे सगळं करत होता अशातला भाग नाही. “बजरंगी भाईजान” मधून सलमानने देखील हेच केल. आमीर खानच्या पिके मध्ये अंतरिक्षातून आलेल्या पिकेला पाकिस्तानमधील कोण्या सरफराजला क्लिनचीट देण्याची गरज का भासावी? अक्षयकुमारच्या “नमस्ते लंडनमधील ” एका प्रसंगात देखील अनिवासी भारतीय आणि पाकिस्तानी एकत्र खेळून इंग्रजांच्या टीमला हरवताना दाखवले आहे.
हे सगळं होत असताना आपला मूळ गाभा भारतीय संस्कृती आणि प्रेक्षक आहे ह्याचा विसर ह्या सर्वाना पडत गेला आणि त्याचाच फायदा दक्षिणात्य सिनेमाने घेतला. शाहरुख - अमीर - सलमानला पाहून वेड्या होणाऱ्या तरुणी आता संसार थाटून दोन लेकरांच्या आई झाल्या आहेत तरी हे आपल्या मुलीच्या वयाच्या नायिकांसोबत रोमान्स करत नाचायची आणि जगभर स्वतःचा ब्रांड टिकवून ठेवण्याची केविलवाणी धडपड करत असतील तर त्यावर होणाऱ्या टीकेला तेच सर्वस्वी जबाबदार आहे…….पठाण केवळ निमितमात्र आहे.
- सौरभ रत्नपारखी
-
-