अखेरचा पॉझ
“जाकर कहदो उनसे के कमिशनर गायतोंडे मौतसे नही डरता “
केवळ अमिताभच्याच नव्हे तर हिंदी सिनेमाच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय चित्रपट असलेल्या 'अग्निपथ'मधील कमिशनर गायतोंडेचा हा डायलॉग ! ती भुमिका साकारली होती दिग्गज अभिनेते विक्रम गोखले ह्यांनी! आपल्या समोर अमिताभ बच्चन नावाचा बुलंद अभिनयाचा शहनशाह उभा असताना देखील, विक्रम गोखले ह्यांनी साकारलेला खमक्या स्वभावाचा निर्भीड कमिशनर गायतोंडे अनेकांच्या स्मरणात राहिला. योगायोग बघा कसा असतो .. विक्रम गोखले आपल्या मृत्युला देखील त्याच निर्भीडपणे सामोरे गेले. त्यांच्या मृत्यूविषयी उलटसुलट बातम्या प्रसृत होत असताना देखील ते मृत्यूशी झगडत राहिले आणि कोणे एकेकाळी आपणच उच्चारलेला तो डायलॉग त्यांनी सार्थ केला.
सक्षम अभिनय आणि प्रवाहाविरुद्ध जाऊन उभे राहण्याची बंडखोर वृत्ती बहुधा त्यांच्या रक्तातच असावी. त्यांची आजी दुर्गाबाई कामत ह्या अशा काळात अभिनय क्षेत्रात उतरल्या होत्या जेव्हा घरंदाज कुटुंबातील महिला सिनेसृष्टीत कामाची कल्पना करणे पण हीन दर्जाचे मानत. पहिली भारतीय महिला अभिनेत्री हे बिरूद लाभलेल्या दुर्गाबाईंच्या कन्या म्हणजे विक्रमजींची आजी कमलाबाई ह्या सुद्धा भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या महिला बाल कलावंत ठरल्या.
पण हा प्रथमपणाचा मान फारसा सुखकर नव्हता. विक्रमजींच बालपण हे गरीबीचे चटके सोसत गेलंं होतंं. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे स्वतः दिग्गज अभिनेते होते पण त्यांनीही आयुष्यात असा दुर्धर कालखंड पाहिला होता की, आर्थिक तंगीमुळे एकवेळ आत्महत्येच्या विचारापर्यंत येऊन मुलाबाळांच्या विचाराने त्यांनी माघार घेतली होती. वडिलांच्या निधनानंतर त्यांची आठवण सांगताना विक्रमजी एकदा म्हणाले होते की, एके दिवशी दिवाळीत शेजाऱ्या पाजार्यांच्या मुलांचे न फुटलेले फटाके उचलून ते फोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या वडिलांनी त्याना पाहिले आणि घरात गेल्यावर झोडपून काढले. पण आपण आपल्या मुलांना हा सणासुदीचा आनंद देखील देऊन शकत नाही, ह्या कल्पनेने त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी कुठून तरी पैसे उसणे आणून मुलांंना फटाके आणून दिले. पण नंतर विक्रम गोखले ह्यांनी आयुष्यभर कधीच फटाके वाजवले नाही.
‘हम दिल दे चुके सनम’ मधील शास्त्रीय गायक असो किंवा माहेरच्या साडीमधील हेकेखोर बाप दोन्ही पात्रातला फरक ते सहजतेने दाखवू शकत. भुलभुलैय्या सारख्या विनोदाचा धुमाकूळ असलेल्या चित्रपटात अक्षयकुमार, राजपाल यादव, परेश रावल धुडगूस घालत असताना देखील मांत्रिकाचे पात्र त्या गदारोळात हास्यास्पद न होता गंभीर आणि आश्वासक वाटेल हि किमया विक्रम गोखलेच करू शकत.
आयुष्यभर हिंदी - मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला आपल्या अभिनयाच्या नजराण्याने संपन्न करणारा हा अभिनेता आपल्या दोन वाक्यातील पॉझसाठी ओळखला जाई. मृत्यूसमयी पण त्यांनी पॉझ घेत यमराजाला काही काळ हुलकावणी दिली. पण दुर्दैवाने हा शेवटचा पॉझ ठरला. एक बुलंद अभिनेता म्हणून समाज त्याना जेवढा स्मरणात ठेवेल तेवढाच माजी सैनिकाकारीता आणि निराधार मुलांकरीता त्यांनी केलेल्या समाजकार्यसाठी देखील स्मरणात ठेवेल.
मोबाईल ९८८१७८३४७४