धोंडाईचा गाव - भाग तीन

02 Nov 2022 10:00:00

dhondaaicha gaon
 
 
धोंडाईचा गाव   -  भाग तीन
धुरपा काकू डोक्यावरचा पदर सावरत तिच्या घराकडे निघून गेली अन् धोंड्याईने डोळ्यातील आसवं लुगड्याच्या पदरानं पुसत घासलेली भांडी आत घेतली. दारी टाकलेल्या खाटीवर गोधडी अंथरुन उशी घ्यायला आत घडुंची जवळ गेली.
घोंगडी, उशी घेऊन देव्हाऱ्यातला दिवा मालवत, घरात पिवळा धम्मक चमकणारा लाईट इजून, दाराला कडी कोंडा घालून खाटीवर पाठ लांब करून दिली. लेवकाच्या चिंतेन चिंतातुर झालेली, कामाच्या व्यापानं धोंड्याई पार कमरात वाकली होती. एक अंगाला झोपून ती वाटेकडे बघत बसली होती स्मशान वाटेनं येणाऱ्या जाणाऱ्या इस्मास.
तितक्यात, महादेवाच्या देऊळात झोपणारा धोंड्याईच्या वयातला दगडु म्हातारा देऊळाच्या वाटेनं चालला होता. त्यानं म्हातारीला हटकले.
'अय धोंड्याई कशी हायसा..? तुझा लेवुक आला का नाय शहरावरून..?
धोंड्याई बोलती झाली, 'नाय व बा. उद्या सांज पहुतर येईन असं वाटून राहिलं हाईसा,पर का महीस येतु का तिकडच राहतुया.
दगडु म्हातारा बोलता झाला, 'ईल ईल.. काळजी नगं करू..!'
नायतर माझा लेवूक पराच्या दिशी जातुया शहराच्या गावाला, तो हुडकून आणीन गावला जातूया तर. चल म्हातारे येतूया मी. तू पण झोप रात सरायला हायसा.'
अन् म्हातारं इजारीच्या उजेडात स्मशान वाटेनं महादेवाच्या देऊळाला जाया निघालं. 
 
 
धोंड्याई अंगावर लेवून डोक्यात सतरा ईच्यार घेऊन या उष्यावरून त्या उष्याला होत होती. पण तिच्या डोळा काही झोप उत्रणा झाली हुती अन् दोन्ही डोळ्यांच्या धारा काही खंडणा झाल्या होत्या. 
रात कशीबशी सरली रातभर धोंड्याईचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. पहाटेच कोंबडा आरवायच्या आत धोंडाई उठली अन् तिनं परस अंगणात पडलेल्या घोळाने अंगण झाडायला सुरुवात केली अंगण झाडून स्वच्छ करून तिनं काल सांजेला संतुक आबाच्या गोठ्यातून आणलेल्या शेणाने अंगण सारून घेतलं अन् न्हाने धुणे करून धोंडाई अंगणात असलेल्या पिंपळ बाईच्या पारावर बसून माथ्याला तेल लावून माथं फणीने इचरीत बसली.
 
धोंडाईचे केसं पार कुरळे असल्यानं त्याची वेणी यायची नाही मग ते केस इचरून त्याला रेबनीने फुल करून पिळ देऊन अंबाडा घातल्यागत बांधून घ्यायची. धोंडाईची वेनीफनी झाली अन् तिनं फणीतले केसांचा गुत्ता काढून तो परसदारच्या दरवाज्याच्या फटीत कोंबून दिले. धोंडाईचं लक्ष काही केल्या कामात लागेन झालं होतं. तिचं अर्ध लक्ष्य घरातल्या कामात अन् अर्ध लक्ष्य गावाकडे येणाऱ्या म्हसन वाटेला लागून असलेल्या वाटेला लागून होतं. धुरपता काकुने उद्याच्याला संतु सोनाराच्या वावरात सरकी जमा करायले जायचं म्हणुन धोंड्याईला काल रातच्याला सांगावा दिला होता अन् कामाला जाणं महत्त्वाचं होतं म्हणून धोंडाईचं बिगीबीगी पहाटची कामं आवरू लागली अन् घटकाभरच्यान घरातलं काम आवरून धोंडाई धुरपता काकुची वाट पाहत दाराच्या उंबरठ्यावर बसून राहिली.
 
तितक्यात धुरपता काकू आली अन् धोंडाईला आवाज देऊ लागली.
'ओ मायव आवरीलेस का तुझं व माय..?'
चाल वं माय ईळ हून रहायला..!
अन् धोंडाई बोलू लागली,
'आलीवं आली धूरपे..!'
भाकरीचं पेंडकं घेऊन धोंडाई अन् धूरपा काकू निघाल्या. वाटेनं चालत असताना सुद्धा त्यांच्यात धोंडाईच्या लेवकाच्या गप्पा चालू होत्या. अन् इकडं काही केल्या धोंडाईचा जीव थाऱ्यावर नव्हता. दुपार सरून संध्याकाळ सरत आली अन् सूर्य सांजेकडे कलला तसं धोंडाई अन् धूरपा काकू घराच्या वाटेला लागल्या.
वाटेत धूरपा काकूचा लेवूक संजू भेटला अन् धोंडाईल म्हणाला,
आयव नामा आला हैसा..!
 
हे ऐकून धोंडाईच्या जीवात जीव आला अंक ती झपाझप पावलं टाकत घराच्या वाटेनं घर जवळ करू लागली होती. धुरपता काकूच्या बोलण्याला ती होला करत तिच्या लेकराचा चेहरा बघण्यासाठी आससून गेली होती.
नामा घराबाहेर खाटेवर बसला होता. दुरून येणारी आई बघून कधी एकदा आईला शहराच्या गावाला नोकरी लागली,हे सांगल असं त्याला झालं होतं.
धोंडाई आली लेकाला बघतच बोलू लागली,
कधी आलासा नामा..?
नामा बोलता झाला,
घटकाभर झाला हायसा..!
समाप्त..!
 
 
 - भारत सोनावणे 
 
 
Powered By Sangraha 9.0