बबरू - हिमाचल प्रदेशची कचोरी

17 Nov 2022 10:00:00

babaru
 
 
 
 
बबरू - हिमाचल प्रदेशची कचोरी
 
आजपासून आपण हिमाचल प्रदेशातील खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. हिमाचल प्रदेश म्हणजे प्रचंड थंडी आणि प्रेमात पाडणारा पहाडी प्रदेश! या राज्यातील पदार्थांबद्दल लिहायचे ठरवले तेव्हा नावे आठवून हसू आले. आपण लहान बाळांना लाडाने ज्या नावांनी हाक मारतो तशी इथल्या पदार्थांची नावे आहेत, बबरू, कुल्लू फिश, सिद्धू. इथल्या पदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे दही, जायफळाचा वापर आणि मंद आचेवर शिजणारे पदार्थ. सगळ्या पदार्थांवर जवळच्या जम्मू, पंजाब आणि तिबेटचा प्रभाव जाणवतो. पहाडी प्रदेशात भाज्या कमी मिळत असल्याने मुख्यतः मांसाहारी पदार्थ किंवा डाळीचा वापर जास्त असतो.
 
आज आपण जाणून घेणार आहोत कचोरीसारख्या दिसणाऱ्या बबरू बद्दल. बबरूची दुसरी पाळण्यातील नावे म्हणजे बटुरू आणि बेडवान. बटुरू हे थोडे पंजाबी भटुर्यासारखे वाटते. यात गोड आणि तिखट असे दोन प्रकार असतात. गोड प्रकारात गुळाचा पाक असतो आणि तिखट प्रकारात उडदाच्या डाळीचे सारण. पारंपरिक रेसिपीमध्ये गव्हाचे पीठ ताकात किंवा दह्यात भिजवतात आणि रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवतात. पटकन करायचे असल्यास सोडा किंवा बेकिंग पावडर वापरूनही पीठ फर्मेंट करता येते. सैलसर भिजवलेले हे पीठ परत गव्हाचे पीठ आणि गूळ/साखरेच्या पाकात भिजवतात. घट्टसर भिजवलेल्या पिठाला तेल लावून परत २-३ तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवतात. या पिठाच्या पुऱ्या लाटून तेलात किंवा तुपात तळतात. त्या पुऱ्या काहीश्या जाडसर असतात. त्यावर वेगवेगळी नक्षी यावी म्हणून पारंपरिक साचेही मिळतात किंवा चमचा/सूरी याने नक्षी काढता येते.
 
उडदाच्या डाळीचे सारण असलेले बबरू पण तितकेच लोकांना आवडतात. यात फर्मेंट केलेले पीठ परत गव्हाच्या पीठ मिसळून घट्ट भिजवतात, पाक न घालता. भिजवलेल्या उडदाच्या डाळीत मिरची, तिखट, मसाले, मीठ टाकून बारीक पेस्ट करतात. काही लोक यात केवळ मीठ आणि हिंग टाकतात. या पेस्टचे सारण गव्हाच्या पिठात भरून पुरीसारखे तळतात. कधीकधी डाळ थोडी शिजवूनही घेतात आणि काळे चणेही वापरतात. यावरही नक्षी काढता येते. पीठ फर्मेंट केल्याने बबरू छान खुसखुशीत होतात. नाश्त्यात दिला जाणारा हा पदार्थ गरमागरम चहासोबत खातात. उडदाची डाळ प्रोटीन सोर्स म्हणून चांगली आणि फर्मेंट केलेले पीठ पचायला थोडे सोपे. दक्षिण भारतात तांदूळ फर्मेंट करतात तर उत्तर भारतीय राज्यात गव्हाचे पीठ! चना मद्रा (चण्याची उसळ) किंवा बूंदी रायत्यासोबत हे तिखट बबरू छान लागतात. मांसाहारी लोक यासोबत फिश करी वगैरेही खातात.
 
हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमला मध्ये हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. थंडगार सकाळी चहा आणि बबरू असा नाश्ता करून निघाल्यास संपूर्ण शहर फिरू शकतो. या पदार्थाला पुरी म्हणावे की, भटुरा  की, कचोरी असा प्रश्न पडू शकतो पण याचा जास्त विचार न करता वेगळी चव अनुभवावी. हिमाचल प्रदेशात कधी जाता येईल याचा विचार न करता पटकन हा पदार्थ घरी करून पाहावा!
 
 
- सावनी 
Powered By Sangraha 9.0