गीत-संगीत

24 Jan 2022 10:53:33

गीत-संगीत -


music 

इतर देशीय चित्रपट आणि आशियाई चित्रपट (प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ) यांच्यात सगळ्यात मोठा फरक म्हणजे त्यांची गाणी ! भारतात, तर आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक इव्हेंटवर गाणी आहेत. प्रत्येक सणावर, प्रत्येक उत्सवावर गाणी. याचं प्रमुख कारण म्हणजे, शास्त्रीय संगीताचा आपल्याच भूमीत झालेला जन्म आणि संगीताचे आपल्या आयुष्यात असलेले महत्त्व ! विरंगुळा म्हणून किंवा अगदी थकवा घालवण्यासाठी किंवा डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठीसुद्धा आपण संगीताची साथ घेतो. याला कारणही तसंच गोड आहे. भारतीय संगीतकारांनी वेळोवेळी आपल्याला दिलेली सुमधुर गाणी आणि आपल्याला लाभलेले गायक आणि गायिका ! के. एल. सहगलपासून ते अगदी अरिजितसिंगपर्यंत आणि शमशाद बेगमपासून ते श्रेया घोशालपर्यंत आपल्याला लाभलेला हा आवाज म्हणजे खरंच वरदान आहे. जवळपास प्रत्येक चित्रपटाला आपल्यात गाणं हे आहेच, किंबहुना गाण्याशिवाय चित्रपटाची कल्पना आपण करू शकत नाहीच. पण गाणी तयार करणं तितकंसं सोपं आहे का ? जितक्या सहजतेने आपण एखाद्या गाण्याच्या चालीवर ताल धरतो, ते गाणं कसं तयार होतं या विषयी जाणून घेण्यास आपल्या सगळ्यांना उत्कंठा आहेच.

 

भारतात चित्रपट सुरू झाला, तेव्हा नाटकं, संगीत नाट्य, मैफली यांचा बोलबाला होताच. प्रत्येक प्रदेशाचे आपले एक लोकनाट्य, लोकनृत्य होतेच. प्रत्येक ५० मैलांवर बदलणारी भाषा आणि त्या भाषेच्या आधारावर तयार झालेली लोकगीतेही होतीच ! त्यानुसारच चित्रपटात गीत घेण्याची परंपरा सुरू झाली असावी. संवाद अधिक प्रभावीपणे, थोडक्यात सांगण्याची कला शब्दांनी सुरांना देणं म्हणजे गाणं ! हे इतकं सहज आणि सोपं होतं.

 

१९०२ साली गौहर जान यांनी आर. पी. गोयंका (HMV RPG) साठी 'आलम आरा) यांच्यासाठी एक गीत गायलं होतं. भारतीय चित्रसृष्टीत हे आजही पाहिलं चित्रपटगीत मानलं जातं. या नंतर मास्टर वसंत, के. एल. सहगल, गोविंदराव टेंबे, उमा शशी, शांताबाई आपटे, कानन देवी, अशोक कुमार, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली अशी मर्यादित गायकांची फळी तयार झाली. मूकपटातून पूर्णपणे बाहेर येताना, भारतीय चित्रपटाने संगीतातही मोठी क्रांती घडवून आणली. आधी फक्त श्रीमंताची हौस म्हणून असलेलं गाणं, रेडिओमुळे मध्यमवर्गीय माणसाच्या घरात येऊन पोहोचलं. सण-वार, उत्सव यासोबत या संगीतात नवीन प्रयोगदेखील व्हायला लागले. कव्वाली, डिस्को, यांसारख्या प्रयोगाने भारतीय संगीताला नवीन मार्केट दिलंच, त्यासोबत नवीन कलाकार आणि पैसाही दिला. आज भारतीय संगीत हा चित्रपट संगीत, पॉप अल्बम, कॉनसर्ट, ऑर्केस्ट्रा या माध्यमातून एक मोठं आर्थिक उलाढालीचं स्रोत झाला आहे. अर्थात, हे दिसतं तितकं सोपं कधीही नव्हतं. प्रत्येक गायकाने, गायिकेने आणि संगीतकाराने यासाठी जीवापाड श्रम घेतले आहेतच.

 

कथा तयार झाल्यावर त्यानुसार गीतकार काही गाणी लिहून निर्मात्याकडे देतो. निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार हे त्या गाण्याचा अभ्यास करून ते गाणं चित्रपटात फिट बसवतात. त्याला चाल दिली जाते आणि गायकांकडून ते गायले जाते. ही साधी-सोपी पद्धत आहे. पूर्वी गायक फारसे नसत, त्यामुळे अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडून गाणी गाऊन घेतली जायची, तीही ON SET. संगीतकार तिथे आपल्या पूर्ण ताफा घेऊन येत असत. कारण त्या वेळी डबिंगची सुविधा नव्हती. Vacuum Studio नव्हते. वादक मुबलक नव्हते. त्यामुळे वाद्यही मर्यादित असायचे. थेट कॅमेऱ्यासमोर रेकॉर्डिंग असल्याने गायकांवर दबाव वगैरे येण्याची सोय नव्हती. प्ले-बॅकही नंतर आलं. स्टुडिओमध्ये गाणं आधी रेकॉर्ड करून, ते सेव्ह करून नंतर वापरण्याची सोय तेव्हा नव्हती. प्ले-बॅक सिंगरदेखील शूटिंगच्या ठिकाणी गाणी म्हणत आणि कलाकार केवळ ओठांच्या हालचाली करत.

 

- अनुराग वैद्य

Powered By Sangraha 9.0