पंचामृत

20 Jan 2022 12:30:55

panchamrut 
नवल वाटले ना? हा काही पदार्थ नव्हे त्यावर लेख लिहायला पण तसं नाहीये. हा यावर्षीचा म्हणजेच २०२२चा पहिला लेख म्हणून हा पदार्थ निवडला. गेली दोन वर्षे आपल्या सर्वांचेच आयुष्य एका दुष्ट विषाणू आणि आजाराभोवती फिरतेय. प्रत्येक हिंदू पूजेत पंचामृताचे किती महत्त्व असते हे सर्वानाच माहित आहे. या लेखाच्या निमित्ताने देवाकडे प्रार्थना आहे, 'देवा, हा पहिला लेख तुझी पूजा म्हणून अर्पण करतेय आता हे वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धीचे आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी असू दे. हे आजाराचे संकट जगावरून कायमचे दूर कर, दुसरेही कोणते संकट पाठवू नकोस आणि सर्वांना ठणठणीत दीर्घायुष्य दे.' (देवाकडे प्रार्थना करतांना मी शब्द जपून वापरते, देव कसा शब्दात पकडतो आणि नंतर इंगा दाखवतो हे लहानपणी असुरांच्या कथांमध्ये वाचलंय. मी असूर नाहीये; पण कोण रिस्क घेईल? म्हणून ठणठणीत, फिट दीर्घायुष्य दे)
आता मुख्य विषयाकडे वळू या. पंचामृत हा वाटीत घेऊन खायचा पदार्थ नव्हे पण दोन चमचे तरी नक्की खायला हवा. यात प्रमुख पाच पदार्थ असतात दूध, तूप, दही, मध आणि साखर/गूळ/केळी. शास्त्रीयदृष्टया पाहिल्यास हे महत्त्वाचे नुट्रीएंट्स. साधारण पाच भाग दूध आणि बाकी पदार्थ एक भाग अशी पाककृती असते. प्रोटीनची दूध, हेल्थी फॅटसाठी तूप, प्रोबायोटिकसाठी दही, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडन्टसाठी मध आणि कार्बोहैड्रेटसाठी साखर. प्रमाणात खाल्ले तर हे पाच घटक किंबहुना नुट्रीएंट्स अमृतासारखे आपल्या शरीरासाठी काम करतात हा संदेश आहे. यातही प्रोटीन जास्त मिळावे म्हणून दूध जास्त असा बादरायण संबंध जोडता येऊ शकतोच. (व्हॉट्सॲप फॉर्वर्डस् मध्ये असतो तसा!)
राज्यानुसार पंचामृताची रेसिपी किंचित बदलते. महाराष्ट्रात साखरेऐवजी खडीसाखर किंवा केळी वापरायचे. फळातील साखर टेबल शुगरपेक्षा केव्हाही चांगलीच. तमिळनाडूमध्ये आजही केळीच वापरतात, साखर शुद्ध नाही म्हणून. काहीकाही समजुती खरोखर पटतात त्यातील ही एक. केरळमध्ये पंचामृतात नारळाचे पाणी किंवा मलाई असते. त्यांच्यासाठी ते अमृतच! काही ठिकाणी विलायचीही घालतात. पूजेच्या पंचामृतात तुळशीचे पानही असते, हिरव्या पानाशिवाय कोणतेही डायट पूर्ण होऊच शकत नाही. आज सगळं सिम्बॉलिक लिहिणार आहे कारण हा पदार्थच सिम्बॉलिक आहे. आपल्या आयुर्वेदाचे, संस्कृतीचे प्रतीक! आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम गोष्टी मग त्या अन्नातील का असेना, देवाला अर्पण करायच्या ही भावना किती छान आहे. देव म्हणजे केवळ मूर्तीतील नाही, किंबहुना मूर्तीतील नाहीच तर आपल्यासाठी देव म्हणजे आईबाबा, गुरू इतकंच नव्हे, तर घरी येणारा अतिथीही देवच आहे. या सगळ्यांनी अमर किंवा फिट राहावे यासाठी हे अमृतासमान पाच पदार्थ द्यावे ही भावना खरी आहे आणि आचरणात आणावी अशीच आहे. असंही आपण प्रार्थना करतांना, 'सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे', असंच म्हणतो, इथे सर्वांना हा शब्द खूप काही सांगून जातो.
महाराष्ट्रात शेंगदाण्याचा कूट, चिंच, गुळ आणि झणझणीत फोडणी यांचा एक अप्रतिम चटणीसदृश पदार्थ सणावारी बनवतात त्यालाही पंचामृत म्हणतात. हे तिखट व्हर्जन! दूध घालून पंचामृत बनवल्यावर ते लगेच संपवायचे असते किंवा ताजे बनवावे लागते. पूजा झाली कि लगेच प्रसाद म्हणून हातावर पडते ते पटकन खाऊन टाकायचे. शिऱ्यासारखे पंचामृत पोटभर मिळत नाही, एक चमचाभर मिळते. पंचामृत खाल्यावर खूप लोक केसांवरून हात फिरवतात. त्या साखरेने आपल्या केसांना मुंग्या लागल्या तर? हा प्रश्न मला लहानपणी पडायचा. प्रसादालाही आदर द्यायचा ही भावना असावी पण हे पदार्थ केसांसाठी चांगलेच आहेत. यातील तूप सोडल्यास इतर सगळे पदार्थ हेअरमास्कमध्ये असतातच ना! साखर नसते हेअरमास्कमध्ये पण केळ असते. हेअरमास्कच नव्हे तर फेसपॅकमध्ये हेच पदार्थ असतात. किती सोपं आहे बघा, पंचामृत खायचे आणि थोडा फेरफार करून त्वचा/ केसांसाठीही वापरायचे. आपले पूर्वज खूपच हुशार होते असं मी म्हणणार नाही; पण कमीतकमी पदार्थात जास्त फायदे नक्की बघायचे!
पंचामृत बाजारात मिळते का हे मी इंटरनेटवर सर्च केले, तर अमूलने अगदी लहानशा १० मिलीच्या पॅकमध्ये लॉन्च केले आहे, लोकांनी ते मुख्यतः पूजेसाठी वापरले हे रिव्ह्यू वाचून कळले पण रोज खायलाही हरकत नसावी. हा पदार्थ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. भारतातीलच नव्हे, तर इतर देशातील लोकांपर्यंतही पोहोचायला हवा. बाकी देशांनी कॉपी करून अजून महागड्या किमतीत विकण्याआधी भारतीय कंपनीने प्रॉडक्ट लॉन्च करायला हवे. प्रोसेसिंग सोपे असले, तरी या पाच पदार्थाची ॲसिडीटी, पीएच, चव बदलायला नको आणि शेल्फ लाईफ जास्त हवी ही थोडी समस्या असू शकते. घरातच मिळणाऱ्या पाच पदार्थासाठी कोणी का पंचामृत विकत घेईल असं वाटल्यास त्यात अजून फ्लेवर किंवा हर्ब्स ॲड होऊ शकतात, थोड्या रिसर्चची गरज आहे.
पंचामृताचे फायदे तुम्हाला एव्हाना माहित असतीलच; पण नसतील तर आयुर्वेदिक डॉक्टरांना नक्की विचारा. हा छोटुसा आणि सोपा पदार्थ आपल्या जीवनशैलीचा भाग झाला, तर चांगलेच आहे ना! या वर्षीचा संकल्प होऊ शकतो. अमृतासोबतही पैजा जिंकणाऱ्या अशा मराठी भाषेत तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा!
- सावनी
Powered By Sangraha 9.0