नुकताच, १० जानेवारीला यू ट्यूबवर ‘वरणभात लोंच्या, कोन नाय कोन्चा’ नावाच्या सिनेमाची झलक ट्रीझरच्या रुपात सगळ्यांनी पाहिली आणि सोशल मीडिया, व्हॉट्स अपच्या माध्यमातून मतमतांतरांचा स्फोट झाला. मराठी सिनेमा मोठा झाला, हिंदी सिनेमांच्या-वेबसिरीजच्या तोडीस तोड कंटेंट देऊ लागला अशी अनेक स्तुती सुमनं सर्वसामान्य आणि बुद्धिजीवींकडून उधळली गेली. मराठी सिनेमा कंटेंट आणि प्रेझेंटेशनच्या दृष्टीने गेली अनेक वर्षे कौतुकाचाच विषय ठरला आहे. त्यात बोल्डनेस जोडला की तो हिंदीच्या किंवा वेबसीरिजच्या तोडीस तोड होतो, हे निव्वळ हास्यास्पद विधान होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण काहीही आणि कसंही दाखवू शकतो या समजाखाली अशा विविध विषयांचा अंगीकार हिंदी-मराठीमधील विविध चित्रकृतींच्या माध्यमातून केला गेला आहे. असो!
सोशलमीडियीवरील चर्चा वाचनात आल्याने कुतुहलापोटी ‘वरणभात लोंच्या...’ चा ट्रेलर मीही पाहिला. त्यातला चित्रीकरणातील उत्तानपणा धक्कादायक होताच, पण त्यात किशोरवयीन मुलांचा केलेला वापर हा माझ्या मनाला विशेष धक्का देणारा होता. मला वाटतं की हा ट्रीझर यु ट्यूबवर टाकणं ही मार्केटिंगची एक स्ट्रॅटेजी होती. कारण तक्रार केल्यानंतर आपण तो ट्रीझर डीलीट केला असून, चित्रपटातील सीनही काढून टाकले आहेत, असा निर्वाळा संबंधित दिग्दर्शकाने दिला; पण तोपर्यंत त्या टीझरने आपलं काम चोख बजावलं होतं. विषय चर्चेत आला, कुतूहल चाळवलं गेलं, प्रसिद्धी मिळाली....
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मानवी संवेदनांना छेद देणारे विषय हाताळणं हे नित्याचच झालं आहे. तसं पाहता अनेक बोल्ड विषयांना आणि सादरीकरणांना प्रेक्षकांनी सहजपणे स्वीकारल्याचं आपण आजपर्यंत पाहिलं आहे. न्यूड, बालक-पालक असे अनेक सिनेमे आले आणि गेले. न्यूड हा सिनेमा बोल्ड चित्रिकरण करणारा असला तरी तो कलाक्षेत्रातील एका वेगळ्या प्रवाहावर भाष्य करणारा होता.(अर्थात न्यूड सिनेमातील दोन चित्रीकरणांवर आक्षेप आहेच. एक – सरस्वतीचं न्यूड चित्रीकरण आणि आईचं न्यूड चित्र पाहून मुलाची असणारी प्रतिक्रिया. पण असो.) तर बालक-पालक हा किशोरवयीन मुलांच्या बदलत्या लैंगिक भावविश्वाचा वेध घेणारा सिनेमा होता. या सिनेमांना प्रेक्षकांनी सहज स्वीकारले होतेच.
‘वरणभात लोंच्या...’ सिनेमात किशोरवयीन मुलांच्या तोंडी दाखवलेले संवाद हे खरोखरच धक्कादायक म्हणावेत असेच होते. भेटली नाही पेटली सारखी वाक्य ही किळसवाणी अशीच होती. यापूर्वीही 'बॉईज' आणि 'बॉईट टू' या सिनेमांमधील अशाच संवांदांनी मला अस्वस्थ केलं होतं. वर्गातल्या सीनमध्ये बाईंचा एकंदर वेश, विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर केलेल्या कमेण्ट्स, त्यावर बाईंनी दिलेली उत्तरं, एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला 'पिसणं' हे सारं धक्कादायक होतं. सैराटमध्येही अशाच उडाणटप्पू मुलांचा अंतर्भाव होता. नकळत्या वयात पळून जाणं, लग्न करणं, मुलं जन्माला घालणं हे म्हणजेच इतिकर्तव्य असं वाटूच शकतं कोणालाही. त्याचा परिणामही समाजावर दिसून आला होता. त्या काळात १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींनी पळून जाण्याचं प्रमाण अचानक वाढलं होतं. हवं तर तुम्ही त्या काळातली वृत्तपत्र पाहू शकता. खरं तर, १२ ते १७ या वयात मुलांना योग्य शिक्षणाच्या दिशेने, करिअरच्या दिशेने, नात्यातील हळवेपणा जपण्याच्या दिशेने, समाजातील आदर्शांच्या दिशेने वळवणं आवश्यक असतं. उत्तमोत्तम साहित्य, उत्तमोत्तम चित्रपट, कलाकृतींचा आस्वाद घेण्याचा आनंद, क्रीडाप्रकारांचा आनंद त्यांनी घेणं आवश्यक असतं अशा वयात मुलामुलींचं एकमेकांप्रती आकर्षण, गुंडगिरी, पळून जाणं, गरजेच्या आणि वेळेच्या आधी लैंगिक सुख अनुभवणं, लैंगिक भावना चाळवणं या गोष्टींचा भडीमार विविध चित्रपटांच्या, कलाकृतींच्या माध्यमातून होताना दिसतो आहे.
‘वरणभात लोंच्या...’ सिनेमात मुलांच्या तोंडची भाषा, आईच्या वयाच्या स्त्रीकडे लैंगिक नजरेतून पाहणं, ती आपल्या बाळाला स्तन्य देत असताना लैंगिक सुखाची कल्पना करणं, एखाद्याचा गळा चिरणं, पराकोटीची गुंडगिरी करणं हे सारं समाजाच्या एका घटकाचं म्हणजे गिरणी कामगारांची संपानंतर जी अवस्था झाली त्याचं चित्रण आहे, असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. मुळात असे चित्रीकरण करताना हा ट्रीझर एका पब्लिक प्लॅटफॉर्मवर जाणार आहे, हे लक्षात घ्यायला हवं होतं. तुम्ही आता भलेही तो युट्यूबवरून काढून टाकला असेल, पण एखाद्याने तो आधीच डाऊनलोड करून ठेवला असल्याची आणि तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसृत केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे एकदा वेबसीरीजमधील समलैंगिक चित्रणाचं मोबाईल रेकॉर्डिंग करून व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आलं आणि त्याचा विलक्षण मनस्ताप मराठीतील एका सुप्रसिद्ध आणि हुशार अभिनेत्रीला भोगावा लागला होता.
लॉकडाऊनच्या काळात मोबाईल पूर्णपणे मुलांच्या ताब्यात आला आहे. पॉर्न इंडस्ट्री आणि त्यांचे प्रेक्षक हे एक वेगळंच क्षेत्र आहे. हा डाऊनलोडेड व्हिडिओ त्या ग्रूप्सवर शेअरही होऊ शकतो. याचा तोटा संबंधित किशोरवयीन बालकांच्या संपूर्ण इमेजवर कायमस्वरुपी होऊ शकतो. या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात १५-१६ वर्षांची मुलेही मागे नाहीत. त्यांच्यापुढे हे चित्रण जाणं म्हणजे निखाऱ्याच्या बाजूला लोणी ठेवणं. वास्तविक, याला पहिला आक्षेप त्या मुलांनी आणि विशेषतः त्यांच्या पालकांनी कठोर स्टॅण्ड घेणं आवश्यक होतं. दुसरा आक्षेप सहकलाकारांनी घेणं आवश्यक होतं. म्हणजे कलाकार म्हणून आपल्याला एखाद्या कामाचे पैसे मिळत असतील तरी ते जर नैतिकतेला आणि भावनांना चुचकारणारं असेल तर तिथेच ठाम आक्षेप नोंदवणं आवश्यक होतं. ज्या स्त्रीने मुलाबरोबर 'बोल्ड' सीन दिला आहे, तिला क्षणभरही निषेध नोंदवावासा वाटला नसेल का? असेल तर तो समाजापुढे का आला नाही?
हा चित्रपट 'ए' म्हणजेच 'अडल्ट कॅटेगरी'त 'सेन्सॉर' झाला आहे. पण त्या कॅटेगरी अंतर्गतही यातील दृश्य आक्षेपार्हच आहेत. ती काढून टाकल्याचं दिग्दर्शकाने मान्य केलं असलं तरीही ती आता 'पब्लिक डोमेन'मध्ये गेली आहेत. कदाचित त्या मुलांना यामुळे मनस्ताप भोगावा लागू शकतो. तसं झालं नाही, तरी वेळीच बंधन घातलं नाही तर अशा विषयांचा ट्रेंडच बोकाळेल आणि ते जास्त धोक्याचं आहे. गंमत, सवय आणि व्यसन या टप्प्यांच्या सीमारेषा फार पुसट आहेत. गंमतीचं रुपांतर हळुहळू सवयीत होईल आणि मग तेच हवं, हा व्यसनी ट्रेंड वाढत जाईल. या सिनेमावर भारतीय स्त्रीशक्तीने तक्रार दाखल केली आहे, तसंच काही मागण्याही स्पष्ट केल्या आहेत. या तक्रारीचं कायदेशीररित्या जे व्हायचं ते होईलच; पण असे चित्रपट पुढेही कदाचित भावविश्वात आणि सामाजिक सौहार्दात ढवळाढवळ करत राहतील अशी भीती वाटते. जागरूक प्रेक्षक म्हणून आपणही हे सर्व सामाजिक जबाबदारी समजून घेऊ या.
- मृदुला राजवाडे