गीत-संगीत

14 Jan 2022 11:22:45

गीत-संगीत


music 

चित्रपटाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पोस्टर, संगीत, ट्रेलर रीलिज करता येत नाहीत. ते नियमबाह्य आहे. एकदा सेन्सॉर झालं की, सगळ्यात आधी गीते बाहेर पडतात. गीत-संगीत बनवण्याची तयारी मात्र प्री-प्रॉडक्शनमध्येच सुरू होते. प्रमाणपत्र मिळाल्यावरही सर्वांत आधी गीते विविध संगीत वाहिन्यांवर प्रदर्शित करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. जुन्या काळात तंत्र फारसं विकसित नव्हतं, तिथे गीते कशी तयार केली जायची हे आधी पाहिलं पाहिजे.

 

१. एकाच स्टुडिओमध्ये गायक-वादक बसायचे.

२. अगदी पार्श्वगायक नव्हते, तेव्हा स्वतः कलाकार गाणी गात असत. त्यामुळे तुम्हाला कलाकार व्हायचं म्हणजे गायनाचे प्रारंभिक धडे गिरवावे लागायचे.

३. सुमारे ५०-५५ जणांच्या वाद्यवृंदात एखादा वादक अथवा गायक चुकला की, पूर्ण गाणं पुन्हा करावं लागे. त्यात आज आहे तसं गाणं किंवा एखाद्या म्युझिकचा तुकडा पिस save करून वापरण्याची सोय नव्हती.

४. एखादं प्रासंगिक गीत लिहायचं म्हणजे कसोटी असायची. त्याला सहा-सहा महिने देऊनदेखील गाणं जमत नसायचं. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग लांबत जायचं; पण सगळी गाणी पूर्ण तयार झाल्याशिवाय निर्माते शूटिंगला जात नसत.

५. आधी गायक, गीतकार-संगीतकार, दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन त्यांच्या त्या गाण्याच्या चालीविषयी, संगीताविषयी बैठका होत. आज हे सगळं व्हर्च्युअली होताना दिसतं खरं; पण प्रत्येक जण प्रत्यक्षात हजर असल्याने त्या गाण्याविषयी आपलं मत व्यक्त करण्याचं स्वतंत्र प्रत्येकाला होतं. त्यामुळे गाणी ही मोठी रंजक व्हायची.

६. भारतात चित्रपट संगीतातदेखील शास्त्रीय संगीताची मोठी जोड असायची. आजही जुनी गाणी कोणत्या-न-कोणत्या रागाशी निगडित आहेत.

 

काळ बदलला तसा नवीन तंत्र आलं. नवीन माइक्स, सुसज्ज रेकॉर्डिंग रूम, मोठ-मोठाले स्टुडिओ आले. गाण्यात आणि संगीतात आधुनिकता आली. एके काळी जिथे एक गाणं करण्यास दोन-तीन-चार महिने लागत, तिथे आज एका दिवसात देखील गाणं होतंय. हे निश्चित छान आहे. पण गाण्यांवरचं संशोधन कमी झालाय. त्यात असलेली पारंपरिक वाद्य नाहीशी झालीय. प्रत्येक वाद्य डिजिटाइज झालंय आणि त्यामुळे त्यातून निघणाऱ्या सुरांची अस्सलता मात्र हरवतेय. यालाच कदाचित दोन पिढीतील अंतर म्हणता येईल.

 

आजकालच्या खुपशा गाण्यांमध्ये गोडवा आहे; पण कालांतराने बरीचशी गाणी विस्मृतीत जातात.

आजही किशोर-लता-रफी यांनी गायलेली गाणी आपण ऐकतो. अगदी ५० वर्ष जुनं गाणंसुद्धा आपण ऐकतो. मात्र, तीन-चार वर्ष जुनं झालेलं गाणं आपल्याला कदाचित आठवत नाही !

अधितर गाणी ही प्री-प्रॉडक्शनमध्येच मोडली जातात. गीत-संगीतकार ठरल्याप्रमाणे आपली गाणी तयार करून ठेवतात. शूटिंग पूर्ण झाल्यावर ही गाणी नंतर चित्रपटात मांडली जातात. प्रत्येक गाण्याचं गीतकार, संगीतकार आणि गायकाचं मानधन ठरल्याप्रमाणे दिलं जातं. त्यात स्टुडिओचं भाडं संगीतकाराला द्यावं लागतं. स्टुडिओ प्रतितासाप्रमाणे मिळतो. स्टुडिओ संगीतकार तयार केलेल्या क्लिप्सच्या रेकॉर्डिंग मशीन मध्ये टाकतो आणि त्यानुसार गायक आपला आवाज लावतो. आजकाल प्रत्येक संगीतकराचा आपला स्वतःचा स्टुडिओ असतो. काही संगीतकार, ज्यांना स्टुडिओ घेणं जमत नाही त्यांना स्टुडिओ भाडे तत्त्वावर मिळतात. स्टुडिओमध्ये असणारी रेकॉर्डिंग रूम पूर्णपणे हवाबंद असते आणि माइक्स खूप उत्तम दर्जाचे असतात. माइक आणि माऊथ पीसमध्ये एक फिल्टरदेखील आपल्याला बघायला मिळतो. त्याने गायकाच्या श्वासांचा आवाजही 'फिल्टर' होतो. हे सगळं बघायला , ऐकायला जरी सुंदर वाटत असलं, तरी एक स्टुडिओ उभा करणं करणं सोपं नाही. त्याला जागा शांत हवी, हवेशीर हवी.

 

प्रारंभिक गीतकार आपल्या वतीने काही गीते निर्मत्याला सादर करतो. त्यात तयार गीते आणि प्रासंगिक गीते असतात. एखाद्या सीनसाठी विशेष लिहिली गेलेली गीते आपण पहिली आहेत. किंवा आयत्या वेळी तयार झालेली गीते देखील आपण पहिली आहेत. त्यासाठी अर्थातच अधिक मानधन मोजावं लागतं. चित्रपटाचा सेन्सॉर झाल्यावर जर एखादं गीत त्यात टाकायचं करायचं असेल, तरी ते पुन्हा सेन्सॉरला दाखवलं जातं. एकदा निर्मात्याने सेन्सॉरकडे दाखल केलेली चित्रपटाची लांबी एखाद्या गीताने वाढत असेल, तर सेन्सॉर आक्षेप घेऊ शकतं.

- अनुराग वैद्य 
Powered By Sangraha 9.0