सौर वादळे

21 Jul 2021 12:06:08

stroms_1  H x W 
काल-परवाच सोशल मिडियावर एक बातमी फिरताना दिसली, ती म्हणजे आतापर्यंतचे सर्वात विशाल असे सौर वादळ पृथ्वीवर आदळण्याची शक्यता येत्या २-३ दिवसांमध्ये आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण हे सौरवादळ म्हणजे काय आणि त्याचे पृथ्वीवर काय काय परिणाम दिसू शकतात ते पाहू या.
सूर्याच्या पृष्ठभागावर जो करोना नावाचा भाग आहे त्या भागामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात सूर्याच्या पृष्ठभागावरील पदार्थ हे अवकाशात काही लक्ष किमी अंतरावर फेकले जातात त्यालाच वैज्ञानिक भाषेत 'कोरोनल मास एजेक्शन' असे संबोधले जाते. या सौरवादळांचा विस्तार प्रचंड असला तरीसुद्धा सूर्याच्या प्रमाणत ही वादळे शोधणे प्रचंड कठीण असते. करण सूर्याचा आकार हा इतका प्रचंड मोठा आहे की, सूर्याच्या व्यासावर एका मागे एक साधारण १०८ पृथ्वी मावू शकतात. सौर वादळे म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागामध्ये लहान, मोठे स्फोट होऊन त्यामधून प्रचंड उष्ण असा 'प्लाज्मा' अवकाशात फेकला जातो. सूर्याच्या पृष्ठभागावर असा स्फोट झाला आणि या हा स्फोट जर पृथ्वीच्या दिशेने असेल तर हे वादळ पृथ्वीपर्यंत पोहोचायला साधारण काही दिवस लागतात. असेच स्फोट इतर ताऱ्यांवर सुद्धा घडत असतात त्यांना “स्टेलर फ्लेयर” असे संबोधले जाते.
या सौरवादळांचे पृथ्वीवर काय परिणाम होऊ शकतात हे आता पाहूयात. अशी लहान, मोठी सौरवादळे जेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावर होतात त्यानंतर काही दिवसांनी या वादळांमुळे अवकाशात फेकले गेलेले प्लास्मा चे कण हे पृथ्वीच्या वातावरणापर्यंत पोहोचतात. आणि हे कण पृथ्वीच्या वातावरणातील वरचा थर म्हणजेच आयनोस्फीयर ला छेदुन वातावरणात शिरतात. हे कण आपल्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी सामना करत पुढे सरकल्याने उत्तर गोलार्धीय भागांमध्ये आपल्याला नॉर्थन लाइट्स , ही प्रकाशाची एक अद्भुत किमया पाहायला मिळते. आता या वादळांचा दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे अवकाशात असणाऱ्या अवकाशवीरांना आणि अवकाशयानांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रोनिक उपकरणांना यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका उत्पन्न होवू शकतो. आणखी एक महत्वाचा धोका म्हणजे जर हे वादळ खरेच प्रचंड असेल तर पृथ्वीवरील आपली वीजवाहक प्रणाली सुद्धा काही काळासाठी स्थगित होऊ शकते. तसेच आधीच्या काही निरीक्षणानुसार यामुळे काही उपग्रह सुद्धा निकामी झाल्याच्या घटना पाहण्यात आलेल्या आहेत. सध्या बहुतेक सर्वच दूरसंचार साधने जसे की आपल्या घरातील टीव्ही, मोबाईल; तसेच इतर अनेक साधने ही याच उपग्रहांवर आधारित असतात. त्यामुळे या सौरवादळांमुळे या सर्व प्रणाली ठप्प होण्याचा मोठा धोका या सौरवादळांमुळे असतो. वैज्ञानिकांनी यावर उपाय म्हणून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक अवकाशयाने सूर्याच्या जवळ पाठवलेली आहेत. त्यामधील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे नासा चा सोहो हा आहे. नासाने सूर्याजवळ जे अवकाशयान काही वर्षांपूर्वी पाठवले त्याची रचना अत्यंत तीव्र अशा तापमानात देखील हे यान टिकून राहू शकेल आणि सूर्यावरील हालचालींचा वेध घेऊन ती सर्व माहिती पृथ्वीवर पाठवू शकेल अशी रचना या यानाची आहे. त्यामुळे भविष्यात जर एखादे मोठे सौर वादळ झाले तर त्याचा पृथ्वीवर किती मोठ्या प्रमाणत प्रभाव पडू शकेल याचे गणित हे काही दिवसांपूर्वीच सांगता येऊ शकेल. भारताच्या इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेनेसुद्धा भविष्यात ‘आदित्य’ या प्रकल्पाची घोषणा करून त्यावर काम देखील सुरु केलेले आहे. याद्वारे भारताचे नावदेखील सूर्याच्या अभ्यास करणाऱ्या यानांच्या यादीत जोडले जाईल. येत्या भविष्यात जशी अधिकाधिक तांत्रिक प्रगती होईल त्याचप्रमाणे या सौर वादळांमुळे होणाऱ्या प्रभावाचे प्रमाण देखील वाढत जाईल. याच तांत्रिक प्रगतीमुळे येणाऱ्या भविष्यकाळात कदाचित या वादळांची पूर्वसूचना देणारी यंत्रणादेखील विकसित होऊ शकेल.
 
- अक्षय भिडे 
Powered By Sangraha 9.0