यज्ञ - भाग 3

24 Jun 2021 10:48:11
 
रूममधला पसारा आवरल्यावर राहुलनेच काकूंना समजावले. "लहान आहे, पहिल्यांदा बाहेर राहतोय, परत असं करणार नाही तो." महेश चकित होऊन त्यांच्याकडे पाहत होता. काका-काकुंशी बोलणे संपवून दोघे राहुलच्या रूममध्ये आले. काहीशी अस्ताव्यस्त असलेली ती लहानशी रूम. त्या खोलीत खूप सामान होते. महेश एका खुर्चीवर जाऊन बसला.
"चहा घेतोस?"
"हो." राहुलने इंडक्शनवर चहा बनवायला सुरवात केली.
"अरे, किती दिवस विचार करत होतो तुझ्याशी बोलावं, पण माझी सेकंड शिफ्ट होती. तू आलास की मी जायचो कामाला. तसा मी आपला लॅपटॉप उघडून सीरिज पाहत बसतो. फार माणसं लागत नाहीत आसपास. पण इथे खूपच कंटाळलोय. माझ्या वयाचं कोणीच नाहीत टीममध्ये. तू आलास तेव्हा वाटलं, चलो एक दोस्त मिलेगा."
"हो. मला पण तसं कोणी मित्र नाहीयेत इथे. कॉलेजमध्ये ओळखी झाल्यात थोड्या." यानंतर दोघांच्या गप्पा रंगल्या. इतक्या की रात्रीचे जेवण त्यांनी बाहेरून मागवले आणि जेवणानंतर बॅडमिंटन खेळले. दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती. पण महेशने तो दिवस नोट्स तयार करण्यात घालवला. पुढच्या आठवड्याचे प्रेझेन्टेशन तयार केले. कारण रविवारचा दिवस परत बाहेर जाणार होता. शनिवारी संध्याकाळी राहुल महेशला भेटायला आला.
" क्या बॉस, संडेका क्या प्लॅन? चहा कर बरं. मला कंटाळा आलाय."
"करतो. कलिग्ससोबत बाहेर लंचसाठी जाणार आहे."
"तुझे कलिग्जपण म्हातारे लोक आहेत की आपल्या वयाचे."
"मुली आहेत दोन. एकीचे लग्न झालेय, एकीचे नाही."
"काय??? नशीबवान आहेस. तुझी आहे का गर्लफ्रेंड?"
"नाही. तुझी?"
"आहे. पण या महिन्यात ब्रेकअप होणार असं दिसतंय."
"बापरे!! का? काय झालं?"
"अरे इतकं काही नाही त्यात. या आधी तिच्यासोबत तीनदा झालं ब्रेकअप. हे फायनल असेल. तेच तेच रे. रोजची भांडणे. मला वेळ देत नाही, कदर नाही. माझंच चुकलं, खूपच बोअरिंग आहे ती. कंटाळा येतो बोलायचा. काही नवीन बोलतच नाही. किती वेळ रोमँटिक बोलणार? अपनेको सिर्फ गर्लफ्रेंड नाही, फ्रेंडभी चाहिये, ये समझ अब आयी."
"बरोबर आहे."
"ती परत आली आयुष्यात, ठरवलं तर राहीलही पण मध्यंतरी अक्कल आलीये आणि ठाण मांडून बसलीये. हा हा हा."
चहा पिऊन दोन तास गप्पा मारून राहुल निघून गेला. महेशच्या मनात परत वादळ सुरु झालं. 'आपण तर चांगले मित्रही होतो, तरी का ब्रेकअप झालं मीरासोबत? तिने दिलेला शर्ट एकेकाळी लकी होता, आता अनलकी झालाय.' त्याने मोबाइलवरचे जुने चॅट्स वाचायला सुरवात केली. पण नाते तुटले की आधी केलेल्या स्तुतीतही उपहास दिसतो. सगळे फोटोज पाहत, संवाद आठवत, तिच्या चेहऱ्यावरचे गोड हसू आठवत रात्री दोन वाजेपर्यंत जागला. मग केव्हा तरी त्याला झोप लागली.
**********
सकाळी उठायला चक्क साडे दहा वाजले. घाईगडबडीत तयार होऊन तो कसाबसा बारा वाजेपर्यंत रेस्तराँला पोहोचला. प्रिया आणि अनुजा तिथे वाट पाहत होत्या. मग नेहमीच्या गप्पा, कॉलेजमधले गॉसिप, यासोबत जेवण छान झाले. त्या दोघींसोबत बोलतांना तो जरा लाजत होता. त्या मस्त मोकळेपणाने बोलत होत्या. प्रियाच्या ते लक्षात आले.
"महेश, आता इथेच राहायचे आहे, जरा कमी लाजत जा. मुलगा आहेस म्हणून नाही तर गरज नाही."
"हो मॅम."
"थोड्या दिवसांनी बोलशील. माहीत आहे पण सांगणं माझं काम आहे. बरं, तुमचे दोघांचे काही प्लॅन्स नसतील तर माझ्या घरी चला. संध्याकाळी जा घरी."
हो-नाही म्हणत तिघे प्रियाच्या घरी पोहोचले. तिचा नवरा होता. दोघांनी घर अगदी छान सजवले होते. त्या दोघांचे बॉण्डिंग बघून महेशला कौतुक आणि हेवाही वाटला. प्रिया तिच्या नवऱ्याला कुठेही टोकत नव्हती, दोघांची मते जुळली नाहीत तरी. ती संयमी, मोजून शब्द बोलणारी आणि तो त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा. महेशला मीरा आठवली. मित्रांसोबत असतांना त्याला सतत तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचावे लागायचे, कुठे काही चुकीचं बोलतोय का यावर लक्ष ठेवावं लागायचं. तरीही भांडण ठरलेलं.
त्या सगळ्यांसोबत संपूर्ण दुपार खूप छान गेली. खरंतर त्यांचे विषय वेगळे. त्यांच्या चित्रपटांच्या आवडी वेगळ्या पण त्यांनी त्याला सामावून घेतले. शहरी लोकांमध्ये आपण कसे वावरू याची भीती जरा कमी होत गेली. 'खरंच सगळी माणसे इतकी चांगली असतात? की सध्या चांगली वागताय नंतर रंग दाखवतील?' त्या सगळ्यांबद्दल वेगवेगळा विचार तो करत नव्हता. त्या सगळ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये तोलत होता. हळूहळू त्या सगळ्यांच्या स्वभावाचे कंगोरे त्याच्या लक्षात येत होते. हे सगळं त्याला खूप हवंहवंसं वाटत होतं. हे प्रेम नव्हतं, आकर्षण नव्हतं मग काय होतं? चांगल्या आणि सकारात्मक माणसांचा वावर इतका सुखद असतो याचा त्याला याआधी अनुभवच नव्हता.
त्या सगळ्या गप्पांची झिंग डोक्यात घेऊनच तो घरी परतला. छानसे गाणे लावले आणि बेडवर पडला. आज दिवसभर व्हॉट्सअप उघडायची आठवणही त्याला झाली नाही. अनुजाने तिघांचा ग्रुप तयार करून त्यात आजचे फोटोज शेअर केले होते. 'मी किती साधा दिसतो या सगळ्यांसमोर. मी पण जरा बरं रहायला हवं. पगार झाला की शॉपिंग करता येईल.' या विचारातच त्याचे लक्ष मीराच्या मेसेजकडे गेले. सकाळपासून वेगवेगळ्या वेळी पाठवलेले पंधरा मेसेजेस होते. शेवटचा मेसेज होता, 'आपण सगळं विसरून परत एकत्र येऊ ना, प्लिज.' तो ताडकन उठून बसला. पहिल्यांदा ती असं बोलत होती, आजपर्यंत त्यानेच नातं वाचवायची शिकस्त केली होती. त्याने क्षणाचा वेळ न घालवता तिला फोन लावला. पूर्ण रिंग गेली पण तिने फोन उचलला नाही. तो हताश झाला. दहा मिनिटांनी तिचा मेसेज आला, 'घरी आहे. उद्या बोलू फोनवर. आता मेसेजच करू शकते.'
त्याने रिप्लाय केला, 'उद्याच बोलू मग.' त्या दहा मिनिटांत त्याच्या मनात प्रचंड उलथापालथ झाली होती. तिने फोन उचलला असता तर तो चक्क रडला असता, नेहमीप्रमाणे सगळं विसरून तिला माफ केले असते. पण आज काहीतरी वेगळा आत्मविश्वास आला होता, ती सोडून जाईल ही भीती कमी झाली होती. त्याला अचानक राहुलचे वाक्य आठवले, 'ती परत आली आयुष्यात, ठरवलं तर राहीलही पण मध्यंतरी अक्कल आलीये आणि ठाण मांडून बसलीये.' त्याला किंचित हसू आले. उद्या तिच्याशी काय बोलायचं याची उजळणी करत असतांनाच त्याला झोप लागली.
क्रमशः
Powered By Sangraha 9.0