मित्रहो, आपली सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही हे तर आपण ऐकलं असेलच, पण तुम्हाला कुणी सांगितलं की, आपल्या भारतामधून वर्षातले दोन दिवस हा चमत्कार बघता येतो तर? होय फक्त भारतामधूनच नाही, पण जगाच्या काही भागांतून आपल्याला आपली सावली दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस असे संबोधले जाते. हा कोणताही चमत्कार नसून अशी परिस्थिती ही एका खगोलीय परिणामामुळे येते. प्रस्तुत लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत.
शून्य सावली दिवसामागील गणित जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला काही प्राथमिक गोष्टी माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. आपणास ठाऊक आहेच की, पृथ्वी ही स्वतःभोवती फिरताफिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरते. परंतु पृथ्वीचा स्वतःचा अक्ष हा २३.५ अंशांनी कललेला आहे. यामुळेच आपल्याला पृथ्वीवर ऋतूंचे गणितसुद्धा पाहायला मिळते. जेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात मात्र कडाक्याची थंडी असते. असे का होते बरं? तर पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे हे होते. मित्रहो, तुम्ही रोज सूर्य उगवण्याची जागा पहिली तर, तुम्हाला असे लक्षात येईल की, सूर्य पूर्वेला एकाच जागी उगवत नाही तर तो काही काळ, मुख्य पूर्व दिशेपासून थोडा उत्तरेकडे उगवतो तर, काही काळ दक्षिणेकडे उगवतो. यालाच आपण सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हणतो. ज्याप्रमाणे सूर्य पुर्वेपासुन थोडा उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे उगवतो तसाच दररोज सूर्य उगवल्यानंतर आपल्या ख-बिंदूवर येत नाही. ख-बिंदू म्हणजे आपण उभे राहिल्यानंतर बरोबर आपल्या डोक्यावर असणारा बिंदू. आता जर आपण तात्विक विचार केला तर, आपल्या सहज लक्षात येईल की, सूर्य आपल्या बरोबर डोक्यावर असेल तेव्हाच आपली सावली पडणार नाही. हा प्रयोग आपण सध्या दिव्याने आणि एखाद्या गोल डब्ब्यानेसुद्धा करून पाहू शकता. एखादा डबा बरोबर दिव्याखाली ठेवला तर, त्याचीसुद्धा सावली आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे सूर्य आपल्या बरोबर डोक्यावर आला की, आपली सावली आपल्याला दिसणार नाही.
सूर्य आणि आपल्या पृथ्वीवर असणारे रेखांश यांचेसुद्धा एक नाते आहे. दररोज सूर्य बरोबर कोणत्या रेखांशावर असेल म्हणजेच कोणत्या रेखांशावर सूर्याचे किरण हे बरोबर काटकोनात असतील याचा एक तक्ता दर वर्षी प्रकाशित केला जातो. त्यालाच सूर्याचे आयनिक चलन म्हणजेच “Solar Declination” असे म्हणतात. आता या तक्त्यामधून तुम्ही तुमचे रेखांश शोधून काढले तर तुम्हाला तुमच्या गावी कोणत्या दिवशी शून्य सावली दिवस असेल हे सहज काढता येईल. आता यावरून अजून लक्षात येईल की, २३.५ अंश उत्तर आणि २३.५ अंश दक्षिण या रेखांशाच्या जर पुढील भागात तुम्ही गेलात, म्हणजेच ज्या जागेचे उत्तर अथवा दक्षिण रेखांश हे २३.५ अंशांच्या पुढे असतील त्या गावांच्या ठिकाणी सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. डोक्यावर म्हणजे ख-बिंदूवर. यामुळेच ध्रुवीय प्रदेशात आणि प्रत्यक्ष उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर सुद्धा सूर्य फार कमी वेळ असतो. उत्तर आणि दक्षिण धृवांच्या जवळ तर सहा महिने दिवस आणि उरलेले ६ महिने रात्र अशी परिस्थिती असते. याचे कारणसुद्धा पृथ्वीचा कललेला अक्ष असेच आहे. तर मित्रहो, येत्या आठवड्यात आपल्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी थोड्याथोड्या दिवसांच्या फरकाने आपल्याला शून्य सावली दिवस अनुभवता येईल यासाठी काही ठिकाणे आणि त्यांचे शून्य सावली दिवस पुढे देत आहे.
गोवा – २ मे आणि १० ऑगस्ट
कोल्हापूर – ६ मे आणि ६ ऑगस्ट
रत्नागिरी – ७ मे आणि ५ ऑगस्ट
सातारा, सोलापूर – १० मे आणि २ ऑगस्ट
लातूर – १३ मे आणि ३० जुलै
पुणे – १३ मे आणि ३० जुलै
अलिबाग – १४ मे आणि २९ जुलै
मुंबई – १६ मे आणि २७ जुलै
नाशिक – २० मे आणि २३ जुलै
- अक्षय भिडे