उदास कां तूं आवर वेडे

युवा विवेक    14-May-2021   
Total Views |

three_1  H x W: 
उदास कां तूं आवर वेडे
नयनांतील पाणी
लाडके कौसल्ये राणी....
 
संपूर्ण रामायण मानवीय नात्यांच्या गुंतागुंतीची मोठी गुहा आहे. मानवीय नात्यांचे मूल्य रामायणात दडून आहे. गेल्या आठवड्यातील गाण्यात कौसल्या आपल्या मनातील तीव्र दुःखाचं प्रकटीकरण करते. एक पती म्हणून भार्य दशरथ तिला समजावीत आहे. पती पत्नीच्या नात्यांतील एक समंजसपणा समजूतदारपणा ह्या गाण्यात गदिमांनी किती सोज्वळ प्रकारे आपल्या समोर ठेवला आहे. बाबूजींनी ह्या गाण्याला देस रागाच्या चालीत सजवलं आहे. तसं बघायला गेलो तर बाबूजी देस रागात जास्त रमतात. आपलं म्हणणं कोणाला सांगीतिक रूपात समजावून द्यायचे असल्यास देस रागाचा वापर त्या ठिकाणी केल्यास तो व्यर्थ जात नाही. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गाणाऱ्या ह्या रागात गदिमांचे शब्द आपल्या समोर येतात कि उदास का तू आवर वेडे...नयनांतिल पाणी...लाडके कौसल्ये राणी....आपण गीत रामायणातील गाण्यांवर बोलतोय त्या मुळे गदिमांच्या शब्दांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू या... राजा दशरथ आपल्या प्रिय पत्नीला फार हळुवार, नजाकतीने, लाडिकपणाने, प्रेमाने समजावताय. प्रेमात बोलताना आपण आल्या पत्नीला सहज म्हणतो अग वेडाबाई..त्यात जी आपुलकी जाणवते त्याच आपुलकीने राजा दशरथ म्हणताय कि अशी उदास का तू माझी लाडके! माझी प्रिये!! कौसल्ये!!! आपल्याला संतती नाही म्हणूनच का तू तुझ्या टपोऱ्या डोळ्यांमधून पाणी का काढते?
वसंत आला तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी
लाडके कौसल्ये राणी...
आपल्या चहू कडे बघ..ऋतुराज वसंत आपल्या पूर्ण भरात आला आहे. बघ ह्या साऱ्या हिरवळीचा प्रदेश. जिथ पर्यंत तुझी नजर जाते तिथ पर्यंत आपल्या प्रदेशांतील हिरवळ आपल्या डोळ्यांना किती शीतलता प्रदान करते आहे. तळ्यांमध्ये - सरोवरांमध्ये हे जलचर पक्षी किती मुक्तपणे संचार करतायेत. फुलपाखरू त्या वेलीच्या सुंदर फुलांच्या नाजुकश्या मरंदाशी खेळताय. तुझ्या प्रीतीचा सहवास लाभावा म्हणून पाण्यातील मासे किनाऱ्यावर तुला भेटण्याच्या इच्छेने येताय. सगळ्या वृक्षांना - वेलींना नवीन कोवळे पाने फुटली आहेत अक्षरशः एका तरुणीने शृंगारिक मेंदीने आपल्या करांना सजवावे इतके सुंदर ते मनोहारी दृश्य आहे. निसर्ग बहरतो आहे तसाच आपला पुढील संसार देखील बहरणार आहे. माझ्या स्वप्नांचं एक गुपित तुला सांगतो सहचरी. काल रात्रभर माझ्या कानांमध्ये कोणी तरी काही सांगतंय असाच मला सारखा भास होत होता..
ती वाणी मज म्हणे "दशरथा, अश्वमेध तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरी"
विचार माझा मला जागवी आलें हें ध्यानीं
लाडके कौसल्ये राणी...
राजा दशरथ कौसल्येला पुढे सांगू लागले की कानामधल्या सादेमुळे मी स्वतः विचार करू लागलो आहे. अश्वमेध करण्यासाठी त्या वाणीने आपल्याला आज्ञा केली आहे. अश्वमेध म्हणजे एका प्रकारचा सोमयाग आहे. पुत्रप्राप्तीसाठी किंवा अनेक राज्य पादाक्रांत करून दिग्विजय होण्यासाठी हा यज्ञ मुळात केला जातो. भारतीय इतिहासाचे जरा अवलोकन केले तर कोणत्या दुसऱ्या राज्याच्या सीमेमध्ये शिरण्यासाठी किंवा त्या राज्याला जिंकण्यासाठी माणसांना श्वापदे किंवा पशूंची गरज कायम भासली आहे किंवा एका विशिष्ट हेतूला साध्य करण्यासाठी हिंस्त्रक पशूंचा वध करावा लागतोय त्या प्रक्रियेला इतिहासात अश्वमेध उपाधी दिली असावी. अश्वमेधाचा अश्व हा श्यामकर्णी असणं गरजेचं असतं, त्याच्या वेगळेपणाची ती ठळक वैशिष्ट्य आहे. राजा दशरथ पुढे सांगतो की प्रिये कौसल्ये! माझ्या कानात त्या वाणीने मज आज्ञा केली की तू पुत्रप्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ कर, त्यांचे फलस्वरूप म्हणून तुझ्या धर्मपरायणी घरी चार वेदरूपी संतती नांदतील आणि दिसामासाने वाढतील देखील. स्वप्नात हे सगळं घडत होतं पण अश्वमेधाचा विचार माझ्या मनी येताच, पहाटेच्या साखरझोपेत कोणीतरी येऊन मला जागे करतंय की काय असा भास झाला.
निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली
वसिष्ठ काश्यप जाबालींना घेउन ये या स्थली
इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी
लाडके कौसल्ये राणी…
एका राजाचं राज्य धर्माच्या प्रति किती उत्साही आहे परिपूर्ण आहे हे ह्या काही ओळींमधून गदिमा सुचवतात. राजा दशरथ पुढे सांगतायेत की सुमंत मंत्री ह्यांची मी नियुक्ती केली आहे ती साऱ्यांना थोरा-मोठ्यांना निमंत्रित करण्यासाठी. सुमंताना मी आज्ञा केली आहे की ऋषिवर्य वसिष्ठ, ऋषिवर्य काश्यप ह्या दोन्ही नास्तिकवादी ऋषींना ह्या क्षणी इथे घेऊन यावं. गदिमांच्या शब्दांनी एक स्वतंत्र शब्दकोश तयार करता येईल इतक्या अफाट शब्दांचे ते संचेते होते. नास्तिकवादी ऋषींना जाबाली ही उपमा देऊन त्यांनी ऋषींच्या पंथाला एक अलंकारिक रूपक देऊ केलं आहे. अश्वमेध यज्ञासाठी आपल्या धर्माप्रमाणे जे काही योग्य आहे ते ही ज्ञानी मंडळी मला सांगतील. तसेंच ह्या यज्ञासाठी आमंत्रित कोणाला करायचे आहे, त्यांना कुठले सत्पात्री दान द्यायचे आहे हे ही - ही ऋषी मंडळी आपल्याला सांगतील.
आले गुरुजन मनांतलें मी सारें त्यां कथिले
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
नवनीतासम तोंच बोलले स्निग्धमधुर कोणी
लाडके कौसल्ये राणी...
सारे गुरुजन येताच, त्यांच्या आणि इतर स्वकीयांच्या समोर माझ्या मनातील विचार मी प्रकट केला. " कोणत्यातरी वाणीने माझ्या मनाच्या तळाशी जाऊन एक सूक्ष्म विचाराची ज्योत पेटवली आहे. माझ्या मनामध्ये आता शंका कुशंकांना कुठे ही तिळभर मात्र जागा नाही. आजवर माझ्यामनात संतती संदर्भात अनेक प्रश्न उभे होते. तिन्ही राण्यांना समजवण्यास मी हतबल होतो. प्रजेसमोर जाताना आणि त्यांच्या राजगादीच्या उत्तराधिकारी कोण ह्या सारख्या प्रश्नांना सामोरी जाताना एक अनामिक भीती एका सावली प्रमाणे माझा पिच्छा सोडत नव्हती पण आता ह्या साऱ्या प्रश्नांना योग्य आणि समर्पक असे उत्तरं माझ्या कडे आहे. माझ्या स्वप्नांत येणारी व्यक्तीच्या मधुर वाणीने मी लुब्ध झालो आहे, लोणी जितकं मऊशार असतं तितक्या नजकतीने - तन्मयतेने ती वाणी माझ्यासमवेत स्नेहाचे ऋणानुबंध जपत बोलत होती.
तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे मनोदेवता वदे
याच मुहूर्ती सोड अश्व तूं सत्वर तो जाउं दे
मान्य म्हणालों गुर्वाज्ञा मी कर जुळले दोन्ही
लाडके कौसल्ये राणी…
भारतीय संस्कृतीत किंवा सनातनी परंपरेत मनोदेवता ह्या संकल्पनेला पूर्वापार पासून मान्यता आहे. सनातनी परंपरेत मनोदेवतांची मानसपूजा बांधण्याचे अनन्यसाधारण महत्वतांकडे आपलं लक्ष वेधून गदिमांच्या लेखणीतून ऋषिजन नृपश्रेष्ठ दशरथाला पुढे सांगतात कि 'ह्याच शुभ मुहूर्तावर एक श्यामकर्णी असलेला अश्व आपल्या राज्याच्या सीमेतून काही रक्षकांसह सोडायचा आहे आणि त्याचा मार्गक्रमण हा सत्वर असला पाहिजे'. ऋषींनी पुढे सांगायला सुरवात केली हे भूप! मानवाला काही मिळवण्यासाठी ज्यावेळी सगळे उपाय नाहीशे होतात त्या वेळी मानवाला मानसपूजा म्हणून पंचमहाभूतांना साद घालता आली पाहिजे. पंचमहाभूतांची उपासनेचे बीज हे यज्ञात सापडतात त्या मुळे हे भूपती, तू यज्ञांसाठी तयारी कर. तुला संतती प्राप्त होणार ह्यात आता संशयास जागाच उरली नाही. विधात्याला देखील हेच सुचवायचे आहे म्हणून त्यानें तुला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आहे. विधाता देखील आपले दान समोरच्याची झोळी तपासून देतो हे लक्ष्यात ठेव. तू एक धर्मपरायण - सत्वशील नरेश आहे. तुझी निवड करताना त्या चतुराननाला देखील जास्त प्रश्न पडले नसावे. त्या मुळे हे क्षोणिय! तुला आम्ही आज्ञा करीत आहोत तू ह्या यज्ञांसाठी तुझ्या भार्येसह सिद्ध हो!!". कौसल्ये! गुरुजनांचा आज्ञेनंतर माझे दोन्ही कर आपसूक जोडले गेले...डोळ्यांतून अश्रू वाहू लागले माझ्या..
अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतों स्वतः
त्याच्या करवीं करणे आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनीं
लाडके कौसल्ये राणी…
ऋषिवर्य वशिष्ठ आणि काश्यप यांना मी यज्ञांसाठी देखरेख बघावी म्हणून विनंती केली आणि त्याच क्षणी त्यांनी मला ह्या यज्ञांसाठी ऋषी ऋष्यश्रुंग ह्यांना "घेऊन या" अशी आज्ञा दिली. अंग देशाचे कुलपती म्हणून ऋष्यश्रुंग सारा कारभार बघायचे. हे संगिनी! तुला एक गम्मत माहिती आहे का ह्या ऋषींच्या मस्तकावर 'ऋष्य' जातीच्या मृगाचे शिंग आहेत म्हणून त्यांचे नाव ऋष्यश्रुंग असे पडले. मोठे तपस्वी आहे ऋषी ऋष्यश्रुंग. आपल्या यज्ञांची सांगता त्यांच्या शुभकरांनी व्हावी जणू हा काही ईश्वरीय संकेत आहे असेंच मला ह्या क्षणी वाटू लागले आहे. हे वनिते! किती पावन होणार आपली अयोध्या..इथे अश्वमेध यज्ञ पूर्णत्वास येणार आहे, अनेक नामवंत राजे आणि त्यांच्या स्त्रियां ह्या यज्ञांसाठी अयोध्येत पाचारण करणार आहे. अनेक ऋषीमुनीं ह्या यज्ञांसाठी त्यांच्या त्यांच्या प्रदेशातून निघण्याची बातमी मला तुझ्या प्रासादात येण्याआधीच मिळाली आहे. पुण्य अर्जित करण्याची केवढी मोठी संधी आपल्यासाठी चालून आली आहे. ह्या यज्ञांमुळे आपल्या हातून काही मोठे कार्य त्या पंचमहाभूतांना घडवून आणायचे आहे असं मला सूचित होतंय. मला आत्तापासूनच डोळ्यांसमोर ते सारे दृश्य दिसतायेत. आपण यज्ञकुंडाजवळ सिद्ध होऊन बसलो आहे. चहूकडे दानांचा महासोहळा सुरु आहे. अयोध्येत सगळीकडे चैतन्य पसरले आहे. यज्ञांच्या धुराने आपले प्रासाद - महाल - प्रजाजनांचे गेह, इथली देऊळे, अयोध्येतील उपवन सगळं सगळं काही पुनीत झालंय. यज्ञांसाठी ऋषींच्या मंत्रांमुळे जो महासागर उसळला आहे त्यात आपण सारे चिंब न्हातोय. काय अवर्णनीय महासोहळा असेल कौसल्ये..
सरयूतीरीं यज्ञ करूं गे मुक्त करांनी दान करूं
शेवटचा हा यत्न करूं गे अंती अवभृत स्नान करूं
ईप्सित तें तो देइल अग्नी अनंत हातांनीं
लाडके कौसल्ये राणी…
हे वामांगिनी! हे आपल्या ह्या जन्मातील शेवटले यज्ञ आहे. मानवाला आपल्या स्वतःच्या - परिवाराच्या आणि प्रजेच्या सुखासाठी कायम सत्पात्री दान केले पाहिजे असं पुराणांमध्ये देखील अभिलक्षित केले आहे.भार्ये! चल सिद्ध हो गुरूंच्या आज्ञाप्रमाणे आपल्याला यज्ञांस बसावयाचे आहे. आपल्या सढळ हातानें आपण आपल्या भोवतालीच्या माणसांना काय हवंय त्या त्या हिशोबाने दान करू. संतती प्राप्ती साठी तुम्ही तिघी राण्या कुढताय. अश्रू ढाळून तुमचं प्रखर आणि बोचरं दुःख तुम्ही कमी करताय. तुमच्या ममतेची कूस अजुनी धन्य झाली नाही म्हणून माझ्या समोर तुम्ही तुमचं दुःख मांडताय. विचार कर सहचरी! मला नाही का माझ्या संततीचे संगोपन करायचे. मला संतती नाही ह्याचं मला किती दुःख होत असेल. माझी समजूत कोण घालेल कौसल्ये! सगळे उपाय आता थकले आहेत आणि अश्वमेध यज्ञ हा एकच उपाय मला समोर दिसतोय. यज्ञ समाप्त झाल्यास आपण अवभृत स्नान करूं जो नियमांना धरून ही आहेच. कौसल्ये आपण साऱ्या देवी देवतांना साद घालून पहिली, मनोभावे साऱ्यांना पूजिले मात्र आपल्याला संतती प्राप्त नाही झाली, आता ह्या यज्ञांमार्फत आपण मुखत्वे अग्नीदेवांना साकडं घालू. मला विश्वास आहे कि ते आपल्या आहुत्या व्यर्थ नाही जाऊ देणार. आपल्या मनातील सुप्त इच्छा त्यांच्या शुभ हातांनी पूर्णत्वास येईल असं मला मनोमनी वाटतंय. कौसल्ये ही वेळ गलितगात्र होण्याची नाही अपितु सिद्ध होण्याची आहे. ते बघ सगळे आमंत्रित यांचे पाऊले अयोध्येच्या दिशेने चालायला लागली आहेत. उठ महाराणी! एका मोठ्या महासोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे. ही संधी अशी दवडू नकोस...उठ कौसल्ये! सिद्ध हो! अश्वमेध यज्ञांसाठी...आपल्या होणाऱ्या संतती साठी..
- मृणाल जोशी