सावळा ग रामचंद्र,माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास,निळ्या कमळांना येतो कविता
‘सावळा’ हा रंग आपल्याला कृष्णाच्या अधिक जवळ घेऊन जातो. अनेक गाण्यांमध्ये त्या सावळ्याचे मोहक रूप आपल्याला अधिकच आकर्षित करतं. गाण्यांमध्ये, कवितांमध्ये अनेकांनी मेघांचे सावळे रंग त्या कृष्णाला देऊ केले, इतकंच काय खुद्द गदिमांनी घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा, या सुरेल, श्राव्य गीतातून कृष्ण - राधेचा प्रेमप्रसंग आपल्या समोर उभा केला आहे.
रामाच्या सावळ्या रूपाबद्दल इतरत्र कुठेही लिहिलेले मी तरी वाचलेले नाही, परंतु गदिमांनी ह्या गाण्यात रामाच्या सावळ्यारूपाचे इतके मोहक सुंदर वर्णन केले आहे की रामाचे ते साजिरे गोजिरे रूप आपल्याला बघायला मिळावे असा मोह साऱ्याच श्रोत्यांचा होतो. रामाच्या श्यामल वर्णाचे संदर्भ गदिमांना रामरक्षेतून सापडले असावेत. नीलवर्णीय पंकजाप्रमाणे राम आहे .
सांवळा गं रामचंद्र हे किती अलवार नाजूक गाणं आहे, एक आई आपल्या मुलाच्या लहानपणात रमून गेली आहे, त्याच्या हट्टाने, रुसव्या फुगव्याने ती अथाह सुखावते आहे. सोबत असलेल्या सवतींना प्रेमाने आपल्या लाडक्या रामाचे कौतुक सांगतीये. श्रीराम आपल्या बाललीला दाखवून सर्वांनाच आकर्षित करीत होते. आई होण्यासारखं सुख नाही, हे सूत्र ध्यानी मनी ठेवून कौसल्या आपल्या सवतींना सांगू लागली...
सावळा ग रामचंद्र...माझ्या मांडीवर न्हातो...
आपल्या बाळाला न्हाऊ घालताना मातेला एक सात्विक आनंद होतो त्या आनंदात माता कौसल्या कैकयी आणि सुमित्रेला सांगते की, बघा बघा माझा राम... कसा खोडकरपणा करतोय न्हाताना, कशी सारखी कूस बदलतोय, पण तुमच्या लक्षात आलं का ज्या वेळी मी रामाला न्हाऊ घालते त्या वेळी ज्या सरोवरात त्याला मी न्हाऊ घालते तिथल्या निळ्या कमळांना अष्टगंधाचा सुवास येतोय. काय सुंदर अनुभूती असेल ज्या सरोवरात एक माता आपल्या लहानश्या मुलाला न्हाऊ घालतीये ते सरोवर आणि भोवतालीच वातावरण निळ्या कमळांच्या सुवासाने दरवळून निघतंय. इथे एक नमूद करावंसं वाटतं, सावळ्या रंगाच्या अनेक छटा असतात कधी हा मातीचा रंग असतो, कधी ढगांचा, कधी दुर्वादलांचा, पण इथे गदिमांनी सरोवरात उमलणाऱ्या नीलवर्णीय कमळाप्रमाणे रामाचा रंग सावळा आहे असं सांगितलं आहे. रामरक्षेतदेखील याचे दाखले आहेतच की - || ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ||
सांवळा ग रामचंद्र, माझ्या हातांनीं जेवतो
उरलेल्या घासांसाठी, थवा राघूंचा थांबतो
सांवळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहतां लाजून, चंद्र आभाळी लोपतो
ठुमरीच्या जवळ नेणाऱ्या मिश्र पिलू रागात रामाच्या लहानपणीचे सूरमयी वर्णन बाबूजींनी केले आहे. हे गाणं रेडिओवर गायिका ललिता फडके (बाबूजींच्या पत्नी) ह्यांनी सर्वप्रथम सादर केलं होतं. हिंदुस्थानी संगीत आपल्या दैनंदिन आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला गीत रामायणातील प्रत्येक गाण्यावरून कळतं, बाबूजींनी कटाक्षाने संपूर्ण गीत रामायणातील गाण्यांमध्ये हिंदुस्थानी रागच समाविष्ट केले आहे. मिश्र पिलू हा राग मुख्य करून आपल्या मनातील अलवार, नाजूक प्रेम - आनंद दर्शवण्यासाठी वापरण्यात येतो, तसंच मनातील भाव-भक्ती ह्याच रागातून अचूक पोहोचवता येते असं जाणकारांचं मत आहे. विशिष्ट लकबीचा आर्जव ह्या रागात व्यवस्थित पोहोचतो - राजा बढेंनी लिहिलेले माझिया माहेरा जा रे पाखरा हे गाणं असोत किंवा रा.ना.पवार यांनी लिहिलेले आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले सावल्या विठ्ठला तुझ्या दारी आले हे गाणं असो हे ह्याच रागावर आधारित.
मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत कौसल्या पुढे सांगू लागली, माझ्या हातांनी रामाला भरवताना मलाच समाधान वाटतं. त्याला एक एक जिन्नस खाऊ घालताना जणू काही माझेच उदर भरले जात आहे असंच मला कायम जाणवतं. श्यामल कांती असणाऱ्या लहानगा राम ज्या ठिकाणी बसून जेवत आहे तिथे जेवतानाचे जमिनीवर सांडलेले खरगटे घास बघून आकाशात उडणाऱ्या पोपटांच्या थव्यांनादेखील त्या घासांचा मोह होतो. आपले आकाशातील मार्गक्रमण सोडून पोपटांचे थवे रामचंद्र जिथे जेवताय तिथल्या जवळच्या गवाक्षांवर येऊन बसले आहे. किती मनोहारी दृश्य आहे. कवी पुढे म्हणताय की, सावळा रामचंद्र पलंगावर निजतोय - रामचंद्रांचं लावण्य बघण्यासाठी, ते विलोभनीय दृश्य बघण्यासाठी आकाशातील चंद्रदेखील लपून रामचंद्राचे दर्शन घेतोय, पण रामचंद्रांचं लावण्य इतकं सौंदर्यपूर्ण आहे की, रामाच्या सावळ्या गोजिऱ्या रूपाचं लावण्य बघताच क्षणी चंद्र देखील आभाळात लाजून लपून जातो.
सुरेश भटांचा एक शेर मला ह्या क्षणी आठवतोय कदाचित माता कौसल्या रामासाठी हेच म्हणत असणार -
ओलावली जरी दवात लाजरी फुले
माझ्या कुशीत मात्र चंद्रकोर झोपली!!
सांवळा ग रामचंद्र, चार भावांत खेळतो
हीरकांच्या मेळाव्यांत नीलमणी उजळतो
सांवळा ग रामचंद्र,करी भावंडांसी प्रीत
थोरथोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत
रामाच्या स्वभावाचे वर्णन करीत माता कौसल्या पुढे सांगते की, बघा माझ्या नंदनाला कसा ह्या महालातून त्या महालात नुसता धावतोय, सारखा गवाक्षांत येणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करतो, जणू काही त्याला त्यांच्यासोबत हितगुज करायची आहे. चारीही मुलं माझ्यासाठी हिऱ्यासारखे तेजोमणी आहे, पण आपला मुलगा इतरांच्याहून काकणभर जास्तच आहे तरी, इतर मुलं काही कमी नाही हे सारं दर्शवण्यासाठी गदिमांनी फार अलवारपणाने आणि बखुबीनें हे शब्द ह्या ओळींमध्ये वापरतात. लक्ष्मण - भरत आणि शत्रू माझ्यासाठी माझ्या आयुष्याच्या रत्नमालेचे हिरे आहेत आणि त्या हिऱ्यांच्या तेजाने अजूनच झळाळून जो नीलमणी उजळून दिसतोय तो माझा रामचंद्र आहे. तिघी राण्यांचे प्रासाद - जिथे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न आपल्या लहानग्या पावलांनी दुडूदुडू धावतात, मधेच पडतात, एकमेकांना हात देत पुन्हा चारी भावंडे उभे राहतात. कधी हसतात, खेळतात, रडतात ह्या साऱ्यांत राम सर्वांकडे लक्ष ठेवून आहे. त्याच्या मनात त्याच्या भावंडांसाठी असलेली प्रीत वाखाण्याजोग आहे. चारही इवलेशे मुलं आहे पण त्यांच्या जगण्या बोलण्यातील एकी, त्यांचं एकमेकांच्या प्रति असलेली प्रीती, प्रेम, वात्सल्य असणं ही स्वभाव विशेषणे थोरामोठ्यांनादेखील अचंबित करतात.
सांवळा ग रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे, चार अखंड चरण
सांवळा ग रामचंद्र, करी बोबडे भाषण
त्याशी करितां संवाद, झालो बोबडे आपण
महाकाव्य रामायणात मानवीय नात्यांची गुंफण फार सुंदररीत्या केली आहे. नात्यांच्या नानाविध छटा सहजपणे रामायणात आपल्या सामोर येतात. त्याच नजाकतीने गदिमा कौसल्या आणि चारही भावंडांच्या नात्यांबद्दल फार सुंदर लिहितात. आपल्या अनुजाची काळजी कशी करावी, त्यांची पदोपदी निगा कशी राखावी ह्याचा वस्तुपाठ म्हणजे रामाचे त्याच्या अनुजांच्या प्रति असलेले भावबंध आहे. ‘चार’ ही गणना फार महत्वाची असते. आयुष्याचे चार चरण असतात - ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. सनातन परंपरेत चारी वेदांना विश्वाने वंदन केले आहे. चारही युगांमध्ये एक वलय पूर्ण होतं एक वृत्त पूर्ण होतं. माझ्या आयुष्याचं चक्र पूर्ण करण्यास भगवंताने ह्या चारही भावंडांची नियुक्ती केली आहे. माझ्या उर्वरित आयुष्याच्या श्लोकांचे - मंत्रांचे हे चार चरण आहे. माझं पुढील आयुष्य फार सार्थकी जाणार आहे हे चारही मुलांकडे बघताना जाणवतं. माता झाल्याचं समाधान माझ्या डोळ्यांमध्ये दिसून येतं ह्या चारही मुलांकडे बघून.
माता कौसल्या पुढे सांगते की, कैकयी आणि सुमित्रे रामाला बघा तर खरी. किती गोड ते बोबडे बोल तो बोलतो. लहान मुले बोबड्या बोलीत काही बोलतात त्या वेळी प्रत्येकाला त्याचं आकर्षण होतं. कौसल्या ह्या माय-लेकांच्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेते आणि रामाच्या मुखातून खडीसाखरेप्रमाणे असणारे बोबडे बोबडे गोड गोड बोल कधी कौसल्येचा आणि इतर मातांच्या मुखातून येऊ लागले हे त्यांनादेखील कळत नाही. आजवरच्या खडतर तपाची हीच फलश्रुतीत आहे का, असादेखील विचार राणी कौसल्या करू लागली. ह्या बोबड्या बोलांसाठी आपले कान किती आसुसलेले होते. आपल्याला हवेहवेसे असणारे हेच ते शर्कराप्रमाणे असणारे माधुर्य शब्द ऐकताना मोठं आल्हादायक वाटतंय. रामाच्या ह्या बाल मनोहारी रूपाने माता कौसल्येला अक्षरशः भुरळ पाडली आहे. आतापर्यंतच्या दुःखाचं पारिपत्य रामाच्या ह्या बाललीलांनी क्षणार्धात केले.
सांवळा ग रामचंद्र, करी बोबडे हें घर
वेद म्हणतां विप्रांचे,येती बोबडे उच्चार
सांवळा ग रामचंद्र,चंद्र नभींचा मागतो
रात जागवितो बाई,सारा प्रासाद जागतो
माता कौसल्या रामाच्या बोबड्या बोलांच्या स्वप्नरंजनातून अजून पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत. रामाचं कौतुक करताना त्या आपल्या सवतींना प्रेमाने अजून सांगू पाहताय की, त्याच्या बोलांचे नाद ह्या महालाच्या प्रासादाच्या कान्याकोपऱ्यात घर करून आहे, ज्या वेळी रामचंद्र झोपतो आणि मला एकटं वाटू लागतं त्या वेळी मी ह्या प्रासादातील मनोरे, इथल्या भिंती, ज्या उंबऱ्यांमुळे तो घडी घडी पडायचा तो उंबरा, इथले वेलींनी लगडलेली गवाक्षे ह्या साऱ्यांसोबत हितगुज करून रामाच्या बोलांनी अतृप्त असलेले माझे मन आणि कान दोघांची भूक शमवित असते. ब्राह्मणांचे - विप्रांचे मंत्रोच्चार ज्या वेळी आपली बोबड्या बोलांनी रामचंद्र करतो त्या वेळी ऐकतच राहावे असंच वाटू लागतं.
आपल्या भावंडांमध्ये समजुदारीने वागणारा, भावांप्रति प्रेमभाव ठेवणारा हाच रामचंद्र ज्या वेळी नभात चंद्रासाठी हट्ट करतो त्या वेळी नेमका त्याचा हा हट्ट कसा पुरवावा हा मला प्रश्न पडतो. आपल्या पैंजणांच्या छुम छुम आवाजाने प्रासादातील प्रत्येक खोलीतून त्या चंद्राचा मागोवा घेत रामचंद्र मलादेखील पळवतो, तेव्हा मोठी गंमत वाटते. अर्धरात्र होऊन जाते तरी, ही राम त्या चंद्रामुळे निजायला तयार नाही हे बघताना मलाच दमायला होतं. करूण चेहरा करून कौसल्या दोन्ही राण्यांना सांगते की - नाईलाजाने सरोवरात किंवा कुठल्या पात्रात पाण्यात त्या चंद्राचे जलचित्र रामाला दाखवून त्याचे हट्ट पुरवते... तेंव्हा कुठे जाऊन राम निजायला तयार होतो.. हे सगळं सांगताना कौसलेच्या डोळ्यांमधले वात्सल्याचे भाव बघण्याजोग असावे.
सांवळा ग रामचंद्र, उद्यां होईल तरुण
मग पुरता वर्षेल, देवकृपेचा वरुण
श्रीरामाच्या बाललीलांमध्ये स्वतःला गुंतवरून ठेवणारी माता कौसल्या, एका स्वप्नांतून कोणीतरी खाडकन जागं करावं तशी जागी होते आणि स्वतःच स्वतःशी बोलू लागते. स्वतःला स्वप्नातून बाहेर काढून ती म्हणते - माझा सावळा रामचंद्र ज्याला मोठ्या हौसेने मी माझ्या मांडीवर न्हाऊ घातलं - माखू घातलं. त्याला मायेने भरवताना माझ्याच डोळ्यांमधून वात्सल्याचे अश्रू निघत होते. त्याचे आणि त्याच्या भावांच्या सहवासात घालवलेले सोनेरी क्षण माझ्या भाग्यात आले. त्यांचे हट्ट पुरवताना मोठी मौज वाटायची, पण हाच राम आता दिसामासाने वाढत जाणार आहे. कौसल्येला रामाच्या भवितव्याची एकाएकी काळजी वाटू लागते. उद्या माझा रामचंद्र अयोध्येचा राजकुमार आणि नंतर राजा होईल, प्रजेच्या गळ्यातील ताईत बनेल त्या वेळी माझ्या रामाला मी जवळदेखील घेऊ शकणार नाही. उरलेली वर्षे मी रामाच्या लहानपणीचे त्याच्या बाललीलांचे हे क्षण माझ्या आठवणींमध्ये - स्वप्नांमध्ये जिवंत ठेवून जगत राहणार आहे. इथले वास्तूत ते सारे क्षण माझ्यासाठी पायघड्या घालून उपस्थित असतील त्या वेळी त्या त्या क्षणांना मी माझ्या साश्रू नयनांमध्ये बंदिस्त करून घेईन...रामचंद्र भगवंताचा अवतार आहे त्यामुळे त्याच्या वर देव-देवतांच्या शुभाशीर्वादाचे वरदहस्त कायमच असणार आहे...
हा विचार करत करत एका हाताने रामाला थोपटत थोपटत कौसल्या रामाकडे वात्सल्यपूर्ण दृष्टीने बघू लागते, तिच्या डोळ्यांतून काळजीचे अश्रू वाहू लागतात आणि ती रामाच्या गालांवरचे हळुवारपणे मुके घेऊ लागते...
सकाळपासून अव्ह्याहत सुरू असलेले तिच्या सावळ्या रामाचे नाव अजून तिच्या ओठांतच आहे..
सांवळा ग रामचंद्र...
सांवळा ग रामचंद्र...
सांवळा ग रामचंद्र...
सांवळा ग रामचंद्र...
- मृणाल जोशी