ओ सनम

14 May 2021 11:30:44

sanam_1  H x W: 
जवळचं माणूस दूर गेलं की, ओ सोनम असं म्हणतात, माणूस लांब गेलं तरी, आठवणी आहेत ना, त्या कायम सोबतीला असतात. पण खरं तर या कायमस्वरूपी ‘सलणाऱ्या’ आठवणींचं नक्की काय करायचं असतं हे कुणीच सांगत नाही. एखाद्या जुन्या-पुराण्या गाठोडयासारख्या या आठवणी जवळ बाळगून जगता येत नाही आणि त्यांना कुठेतरी गाडून टाकून काही झालंच नाही, अशा आविर्भावातही पुढे जाता येत नाही, पण आपण या आठवणींचे वाहक होऊन काही तरी सुंदर घडवू शकतो, त्या आठवणी वाटून घेऊन पुढच्यासाठी एक उदाहरण, एक वारसा ठेवू शकतो. रेताड, रूक्ष प्रदेशात फुललेल्या प्रेमाच्या आणि त्यातल्या निवडुंगासारख्या खुपणाऱ्या आठवणींचा सुंदर काफिला घेऊन आलेलं गाणं म्हणजे लकी अलीने गायलेलं ‘ओ सनम’.
१९९६ मध्ये आलेल्या ‘सुनो’ या लकीच्या पहिल्याच आल्बममधलं हे गाणं तूफान लोकप्रिय झालं. त्याच्याच बालमित्राने स्येद असलम नूरने लिहिलेलं, लकी अलीनेच संगीत दिलेलं हे गाणं बऱ्याच गोष्टींमुळे अल्पावधीतच एम टीव्हीच्या चार्टबस्टरमध्ये तब्बल ६० आठवडे तळ ठोकून होतं. शाळा /कॉलेजमधून आलं की, आधी एम टीव्ही किंवा चॅनेल व्ही लावून त्यावर हे गाणं सुरू असणं म्हणजे काय की,
वा ‘चल रे लवकर, तुझं गाणं लागलय बघ, लकी आलाय” हे म्हणल्यावर हातात असेल ते सोडून आधी गाणं बघायला धावणं (फक्त ऐकायचं गाणच नाही हे!) म्हणजे काय हे नव्वदच्या दशकात तारुण्य घालवलेल्या पिढीलाच समजू शकतं.
शाम सवेरे तेरी यादें आती हैं
आके दिल को मेरे यूँ तड़पाती हैं
ओ सनम मोहब्बत की कसम
सुरुवातीचा लकीचा गिटारवरचा पीस आणि लकीचं हमिंग हे अतिगोड समीकरण या गाण्याची सिगनेचर आहे. सोपी शब्दरचना, अतिरंजित नसलेले, नेमके भाव, लकीचा खर असलेला पण गाण्याच्या बोलांबरोबर सहज, ओघवता आवाज यामुळे हे गाणं प्रत्येकाच्या मनात जाऊन बसतं. जोडीला इजिप्तमधल्या कैरो शहरातल्या पिरामिड, रेती, वाळवंट आणि अनेक सूचक चिन्हांमधून उलगडत जाणारी कथा आणि व्यथा यामुळे गाण्याचा स्तर आणखीन उंचावतो.
या गाण्यात दाखवण्यात आलेल्या कथेबाबत वेगवेगळे प्रवाद आहेत; पण मला समजली ती अशी- अगदी सुरुवातीला लकी अली आणि एक वृद्ध माणूस हुक्का, चहा आणि सोबत फासे (dominoes) खेळतांना दिसतात. हे दोघे याआधी भेटलेत का, हा उलगडा नंतर होतो. नंतर लकी एका नकाबमधला अरब राजा/ सरदार म्हणून दिसतो आणि फक्त त्याचे करडे, भावनाशून्य डोळे दिसतात. एका वृद्ध माणसाला त्याच्यासमोर आणलं जातं आणि त्याला हा सरदार गुन्हेगार म्हणून कैद करतो. एक निळ्या डोळ्यांची मुलगी या सरदाराबरोबर प्रेमाचं नाटक करते आणि तो झोपलेला असताना त्याच्याजवळची किल्ली घेऊन त्या वृद्ध माणसाला (कदाचित तिचे वडील) कैदेतून सोडवू पाहते, पण दुर्दैवाने पहारेकऱ्यांच्या हाती लागते. ते तिला सरदारासमोर हजर करतात तेव्हा सरदार संतापून तिला मृत्यूदंड सुनावतो. जिच्यावर मनापासून प्रेम केलं, तिनेच फसवणूक करावी आणि तिला अशी कठोर शिक्षा सुनवावी लागावी, यापरतं दुर्भाग्य ते कुठलं याने सरदार विद्ध होतो. या सगळ्या प्रसंगात लकी आणि ती मुलगी (लकीची पहिली बायको- मासूमा उर्फ मेघन जेन मॅकक्लेरी) या दोघांचे फक्त डोळे बोलतात, ते पडद्यावरच बघावं.
मिलके बिछड़ना तो दस्तूर हो गया
यादों में तेरी मैं जो दूर हो गया
ओ सनम तेरी यादों की कसम
कट टू, या जन्मी लकी पुरातत्त्व संशोधक आहे आणि संशोधन करत असताना त्याला कारागृह, त्याची किल्ली, सुंदर निळ्या डोळ्यांची मुलगी, तिने प्रेमात झालेली वंचना तो म्हातारा (हुक्का आणि फासेवाला), हे सगळं आठवत जातं.
समझे ज़माना के दिल है खिलौना
जाना है अब क्या है दिल का लगाना
नज़रों से ना यूँ हमको गिराना
मर भी गए तो भूल न जाना
हे आठवत असताना काही बुरख्यातल्या तरुणी आसपास असतात त्यातली एक तीच असते आणि पुन्हा एकदा तिचे डोळे त्याला चकवा देतात.
आँखों में बसी हो पर दूर हो कहीं
दिल के करीब हो ये मुझको है यकीं
ओ सनम तेरे प्यार की कसम
यात symbolism फार सुंदररीत्या आलंय. ‘कारागृहाचा पिंजरा’ आणि ‘कुलूप’ म्हणजे विविध विषय वासनानी भरलेलं जग आणि त्यांच्या मागे धावणारे आपण, हा पिंजरा उघडण्याची खरी ‘किल्ली’ म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे आपण विसरतो. नसत्या हव्यासापोटी प्रलोभनात अडकत गेलेलो आपण आयुष्यातल्या सध्या-सुंदर गोष्टींमध्ये खरं सुख लपलेलं असतं आणि तीच तर आनंदाची ‘गुरुकिल्ली’ आहे, हे नजरेआड करतो, पण एक संधी दार ठोठावते, एक ‘लहानशी खिडकी’ यातून सुटण्याचा मार्ग दाखवते. एरवी खिडकी बंद असते, त्यातून कधी ‘सूर्यप्रकाश’ (सुख) तर कधी ‘रेतीचे कण’ (दुःख) फक्त येत राहतात. पण नशीबवान असलात तर, या सगळ्याच्या परे झेपावता येते. सुख-दुःखाच्या सावल्या अविरत पडत राहतात; त्याने आयुष्य थांबत नसते, हे स्वीकारावे लागते. मग, प्रेमासारखी चिरंतन गोष्ट जवळ असेल तर, तुमची झोळी सदैव भरलेली राहते, ह्याची अनुभूती येते. गाण्याच्या शेवटी लकी “मिलके बिछड़ना तो दस्तूर हो गया” हे सत्य स्वीकारून किल्ली दूर फेकून देताना दाखवला आहे, तो यासाठी की प्रेमाबरोबर, सुखाबरोबर येणारी वंचना, वेदना, दुःख याचीसुद्धा “दस्तूर” म्हणजे सवय करून घ्यावी लागते. तेच खरं जगणं नाही का ?
या गाण्याची ‘सुनो’ मधलीच अनप्लग्ड व्हर्जनसुद्धा तितकेच गोड आहे. त्यातले गिटारचे पीस खास आहेत. या गाण्यामुळे लकीला इंडि-पॉप आयकॉन अशी ओळख मिळाली होती; त्याबद्दल एक मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं “तू संगीताची व्याख्या काय करशील, तुझ्यासाठी इंडि-पॉप संगीत हे काय आहे?” त्यावरलकी म्हणतो “It is seven notes; whatever makes your heart cry is music. Do not give it a genre; it is an expression.”
“संगीत म्हणजे सात सूर; जे ऐकल्याने तुमच्या हृदयाला घरं पडतील, ते संगीत, त्याला कुठल्याही व्याख्येत, चौकटीत बसवू नये, ती एक अभिव्यक्ती आहे!” हे वाचल्यानंतर २४ वर्षानंतरही हे गाणं आपली जादू का टिकवून आहे आणि वृद्धत्वाकडे झुकलेल्या लकीच्या चिरतरुण आवाजात हे गाणं लाइव्ह ऐकायला अजूनही गर्दी का होते, याचं उत्तर मिळून जातं !!
- नेहा लिमये
neha.a.limaye@gmail.com
Powered By Sangraha 9.0