लघुग्रह म्हणजे सूर्याभोवती भ्रमण करणारे लहान मोठे खडक. हे सर्व लघुग्रह मंगळ आणि गुरु यांच्या कक्षांच्या मधून सूर्याभोवती भ्रमण करत आहेत. यांचा आकार हा एखाद्या ग्रहापेक्षा फारच लहान असल्याने यांना ग्रह न म्हणता त्यांना लघुग्रह असे संबोधले जाते. या लघुग्रहांच्या पट्यामध्ये लक्षावधी लघुग्रह आहेत. यातील काही लघुग्रह हे काही किमी व्यासाचे तर काही लघुग्रह काही फूट आकाराचे आहेत. या सर्व लघुग्रहांचे वजन करता ते सर्व वजन आपल्या चंद्राच्या वजनापेक्षा सुद्धा कमी भरेल. या लघुग्रहांचा आकार जरी लहान असला तरी सुद्धा हे लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतात. भूतकाळात असे अनेक लहान आणि मोठे लघुग्रह पृथ्वीवर आदळलेले आहेत. आणि भविष्यात सुद्धा असे अनेक लघुग्रह पृठीवर आदळण्याचा धोका कायम आहे. याचसाठी शास्त्रज्ञ लोक सतत या लघुग्रहांवर नजर ठेवून असतात, त्यांची निरीक्षणे नोंदवतात.
हे लघुग्रह जेव्हा आपली सूर्यमाला तयार होत होती तेव्हाच्या उरलेल्या धूळ आणि दगडांचे अवशेष ह्यांपासून बनलेले आहेत. आपली सूर्यमाला तयार होण्याच्या वेळी गुरु ग्रहाच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे इतर ग्रहांप्रमाणे ह्या खडकांच्या एकत्र येण्याने मंगळ आणि गुरुच्या मधल्या कक्षेत एकही ग्रह बनू शकला नाही. उलट हे सर्व खडक एकमेकांवर आदळून त्याचे लक्षावधी असे लघुग्रह बनले. हे लघुग्रह सुमारे ९४० किमी व्यास (सेरेस लघुग्रह) ते साधारण ६ फूट व्यास इतक्या व्यासाचे देखील असू शकतात. हा ६ फूट व्यासाचा लघुग्रह ऑक्टोबर २०१५ साली पृथ्वीजवळून गेला होतं तेव्हा शास्त्रज्ञांनी त्याचे निरीक्षण केले होते. साधारण सर्वच लघुग्रह हे आकाराने ओबडधोबड आकाराचे आहेत परंतु काही मोठे लघुग्रह जसे की सेरेस हे आकाराने गोलाकार आहेत. सर्वच लघुग्रहांवर एकमेकांच्या टकरीच्या कारणाने अनेक लहान मोठी विवरे आहेत. याचे उदाहरण म्हणजे व्हेस्टा नावाच्या लाघुग्रहावर साधारण ४५० किमी इतक्या आकाराचे एक महाविशाल विवर आहे. हे सर्वच लघुग्रह सूर्याभोवती लंबगोलाकार कक्षेमध्ये फिरत असतात. त्यातील सुमारे १५० ज्ञात लघुग्रहांना स्वतःचे उपग्रह आहेत. काहींना एक तर काहींना २ उपग्रह देखील आहेत. काही लघुग्रह एकमेकांभोवती फुगडी घालत असल्या सारखे फिरतात आणि तसेच ते सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालतात. यांच्यामधील काही खडक हे मोठ्या ग्रहांच्या गुरुत्वाकार्षणामुळे खेचले जाऊन त्या त्या ग्रहांचे उपग्रह सुद्धा बनलेले आहेत. याचे उदाहरण म्हणजे मंगळ ग्रहाचे दोन उपग्रह फोबोस आणि डीमोस. हे सुद्धा उपग्रह अगदी लहान व्यासाचे असून आकाराने ओबडधोबड आहेत. या लघुग्रहांचे सरासरी तापमान उणे १०० अंश सेल्सियस इतके आहे. या लघुग्रहांमध्ये गेल्या काही कोटी वर्षांपासून काहीच बदल झालेला नाही. त्यामुळेच शास्त्रज्ञांना या लघुग्रहांच्या अभ्यासाद्वारे आपल्या सूर्यमालेच्या उत्क्रांतीविषयी अतिशय सखोल ज्ञान होऊ शकेल. भविष्यकाळात अनेक अवकाशयाने ही या लघुग्रहांच्या अभ्यासासाठी पाठवली जाऊ शकतात.
या सर्व लाघुग्रहांपैकी महत्वाचे दोन लघुग्रह म्हणजे सेरेस आणि व्हेस्टा. सेरेस हा आकाराने सर्वात मोठा लघुग्रह आहे. या लघुग्रहाचा शोध गुसेप्पे पियाझ्झी याने १ जानेवारी १८०१ सालीच लावला होता. या लघुग्रहाची वैशिष्ठ्ये म्हणजे याचा पृष्ठभाग हा पाणी आणि धूळ यांनी बनलेला आहे. तसेच यावर अनेक खनिजे आहेत. यावर २०१४ साली बाष्पाची मोठी मोठी कारंजी शोधण्यात आली. हे एखाद्या लघुग्रहाच्या बाबतीतले नवे ज्ञान होते. नासा चे डॉन नावाचे अंतराळयान २०१५ साली या लघुग्रहाच्या कक्षेत पोहोचले आणि त्याने या लघुग्रहाचा बराच अभ्यास देखील केला.
सर्व लघुग्रहांपैकी आणखी एक महत्वाचा लघुग्रह म्हणजे व्हेस्टा. याचा शोध १८०७ साली हेन्रीच या जर्मन संशोधकाने लावला. सुमारे काही कोटी वर्षांपूर्वी मोठ्या खडकांच्या टकरींमुळे व्हेस्टा लघुग्रहाचा भरपूर भाग हा अवकाशात फेकला गेला. त्यामुळे याच्या दक्षिण गोलार्धात दोन मोठाली विवरे तयार झालेली आहेत. या व्हेस्टा चा काही भाग हा उल्कांच्या स्वरूपात पृथ्वीवर देखील आदळला. याचाच अभ्यास करून संशोधकांनी व्हेस्टा विषयी सुद्धा आधीक माहिती मिळवली.
असे हे लघुग्रह हे खनिजांनी आणि वेगवेगळ्या घटकांनी बनलेले आहेत. भविष्यात अश्याच एखाद्या सोने अथवा लोह अशा महत्वाच्या खनिजांनी भरलेला एखादा लघुग्रह शोधावा आणि तिथून ती खनिजे पृथ्वीवर आणता येतील का याचा विचार शास्त्रज्ञ करीत आहेत. येत्या काळात आपल्याला कदाचित ‘लघुग्रहांवरून आणलेल्या सोन्याचे दागिने’ आधी पाटी एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये लावलेली आढळल्यास आपल्याला नवल वाटू नये !
- अक्षय भिडे