राईट बंधूंनी आकाशात पहिले उड्डाण केले आणि मानवाचे अवकाश युग सुरू झाले. राईट बंधूंच्या त्या उड्डाणाने मानवासाठी संशोधनाचे एक नवे दालनच उपलब्ध करून दिले. त्यानंतर विविध प्रकारची विमाने तयार करण्यात आली. त्यांचा वापरसुद्धा वेगवेगळ्या कारणांसाठी होऊ लागला. जसे की, शेती, मोठ्या आगींवर नियंत्रण आणि मुख्य म्हणजे युद्ध. युद्धात शत्रूराष्ट्रांच्या रडारपासून आपल्या विमानांचा बचाव व्हावा यासाठी ती अधिकाधिक उंचीवर नेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच विमानावर क्षेपणास्त्रे चढवून शत्रूराष्ट्रांचे तळ उद्ध्वस्त केले जाऊ लागले. या काळात तंत्रज्ञान प्रचंड विकसित होऊ लागले आणि साधारण १९५० च्या सुमाराला द्वितीय महायुद्ध संपुष्टात आल्यानंतर मानवाने हेच तंत्रज्ञान अवकाश संशोधनासाठी वापरण्यास सुरुवात केली. त्या काळात विविध प्रयोगांसाठी अनेक वेळा रॉकेट अवकाशात पाठवली गेली. यामुळेच येत्या काही वर्षांत अवकाश कचऱ्याची समस्या निर्माण झाली.
मानवाने अवकाशात पाठवलेले अनेक उपग्रह याच प्रकारातील रॉकेटच्या साहाय्याने पाठवले; परंतु या रॉकेटचे काही भाग अगणित काळासाठी अवकाशात तरंगत राहिले आणि असेच तुकडे साठल्याने अवकाशात विविध प्रकाराच्या मोहिमांतून उरलेल्या वस्तूंचा कचरा तयार झाला. हा कचरा येणाऱ्या मोहिमांसाठी मोठा धोका ठरू शकतो. तसे काही अनुभवसुद्धा आले आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ही पृथ्वीभोवती फिरणारी एक अंतराळ प्रयोगशाळा आहे. सतत विविध देशांचे अवकाशयात्री या स्थानकावर राहून त्यांचे प्रयोग करत असतात. याच संशोधकांना गेल्या काही वर्षांमध्ये असे काही अनुभव आले. गेल्या वर्षांत तर, या अंतराळयानात या कचऱ्याच्या अतिशय लहान कणांमुळे एक मोठे छिद्र झाले होते. त्यामुळे अंतराळातील कचरा ही अवकाश मोहिमांच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या आहे.
मागील वर्षी काही शास्त्रज्ञ, हवाई येथील वेधशाळेतून लघूग्रहांचे निरीक्षण करत होते. त्यांच्या निरीक्षणाचा मुख्य विषय पृथ्वीच्या अगदी जवळ येणारे अथवा पृथ्वीवर धडकू शकतील असे लघुग्रह शोधणे असा होता. त्यांना हेच निरीक्षण करत असताना अवकाशात एक विचित्रपणे जाणारी वस्तू दिसली. ही वस्तू चंद्राच्या जवळून सुमारे ३००० कि.मी. प्रतिसेकंद या वेगाने जात होती, परंतु लघुग्रहांच्या वेगाच्या मानाने हा वेग अगदीच कमी होता. आधी शास्त्रज्ञांना ही नक्की काय वस्तू आहे हे समजू शकले नाही. कारण लघुग्रहांप्रमाणे याची कक्षा लंबगोलाकार नसून ती वर्तुळाकार होती. शास्त्रज्ञांनी या वस्तूंचे आणखी सखोल निरीक्षण केले आणि याला 2020-SO असे नाव दिले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी या वस्तूच्या कक्षेचे गणित मांडले आणि त्यांना असे लक्षात आले की, ही वस्तू १९६६ मध्ये याआधी पृथ्वीच्या जवळ आलेली असणार. त्यानंतर साधारण १९६६ मध्ये अंतराळात पाठवलेली रॉकेट यांची माहिती त्यांनी जमा केली आणि यातील एका यानाची कक्षा ही या वस्तूच्या कक्षेशी तंतोतंत जुळली. मात्र, ही वस्तू दुसरी-तिसरी नसून याच ‘सर्व्हेयर’ नावाच्या रॉकेटचा भाग म्हणजेच ‘सेंटॉर’ आहे, हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आपले वर्णपटलावर काम करणारे दूरदर्शक या वस्तूच्या दिशेने वळवले. कोणत्याही वस्तूचे या प्रकाराने निरीक्षण केले असता आपल्याला एखादी अवकाशीय वस्तू कशापासून बनलेली आहे ते लक्षात येऊ शकते. याच सिद्धांताचा वापरू करून ज्या दिवशी ही वस्तू २०२० मध्ये पृथ्वीच्या सर्वांत जवळून जाणार होती, तेव्हा संशोधकांनी याचे निरीक्षण केले. त्यानंतर लक्षात आले की, ही वस्तू अवकाश मोहिमांसाठी १९६६ मध्ये वापरले जाणारे विशेष प्रकाराच्या स्टील याच धातूपासून केलेले आहे. त्यामुळे या गोष्टीची खात्री झाली की, वस्तू म्हणजेच ‘सर्व्हेयर’ या मोहिमेचे ‘सेंटॉर’ रॉकेट आहे. २०२० मध्ये घडलेल्या घटनेमुळे अवकाश कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. २०१८ मध्ये अशीच एक विजेवर चालणारी कार आणि त्यात एक प्रातिनिधिक अवकाशयात्री अंतराळात सोडण्यात आला होता. गणिताप्रमाणे साधारण २०४७ मध्ये ही गाडी पृथ्वीजवळून जाईल. आता भविष्यात मानवाला या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याचीच एक मोहीम आखावी लागणार आहे!
- अक्षय भिडे