“प्राण्याच्या आयुष्याचं खरं ध्येय हे आपली प्रजाती वाढवणं हा आहे. पण माणसाच्या महात्त्वाकांक्षा त्यापेक्षा वेगळ्या असतात याचा का विसर पडला असावा माझ्या घरच्यांना?”
“काय झालं आहे?”
“एकविसाव्या मुलाकडून नकार मिळाला आहे.”
“हं.. मी काय म्हणते.. तू सोडून का देत नाहीस काही दिवस हा लग्नाचा विषय?”
“मी सोडून द्यायला लाख तयार आहे, पण घरच्यांनी सोडला पाहिजे ना?”
“ऐशू, तू सोडून द्यायला तयार असतीस तर हा कितवा नकार आहे हे मोजून अशी डिस्टर्ब झाली असतीस का?”
“........”
“तुला सोपंय गं हे बोलणं. पंचविसाव्या वर्षी लग्न करून अठ्ठाविसाव्या वर्षी आई झालीस तू, मनाली. जगाच्या दृष्टीनं आयडीअल आहे हे. हे बघ आत्ता सुद्धा बाबांचा मेसेज आलाय.. संध्याकाळी एक मुलगा येतोय. ”
“असेलही पण प्रत्येकाची एक वेळ असते…. कदाचित आजच्या भेटीत,,, ”
“ए, चल बाय मला उशीर होतोय. काम आहे. भेटू परत.”
प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ, प्रत्येकाच्या आयुष्याची स्वतंत्र गोष्ट…. या गोष्टी ऐश्वर्यासाठी चघळून चोथा झाल्या होत्या. सुरुवातीला या अशा वाक्यांनी तिला येणाऱ्या उभारीची जागा आता संतापानं घेतली होती. तिसाव्या वर्षी हे ऐकून हुरूप यायचा, छोटासा का होईना पण आशेचा किरण दिसायचा. पण आता पस्तिसाव्या वर्षी ही वाक्य इतकी पोकळ वाटायची. अशी समजूत कुणी कढायला लागलं तर डोक्यात एक तिडीक जायची आणि मग त्या दिवसभरात घडलेल्या इतर घटना, भेटलेली माणसं यावर अवलंबून एकतर भडका तरी उडायचा नाहीतर तिला वाईट वाटून रडायला यायचं. इतर लोकांकडून तिला या सगळ्या लेक्चरची सवय झाली होती, पण आज स्वतःच्या बालमैत्रिणीकडून हे उपदेश ऐकल्यावर तिला तिथे बसावसं वाटलं नाही. काम आहे इतकंच सांगून मनालीच्या उत्तराची ही वाट न बघता ऐश्वर्या तिथून पटकन निघून गेली. जाता-जाता पर्समधून फोन काढून बघायला लागली म्हणजे मनालीनं थांबवायचा प्रयत्न करू नये.
मनाली तसाही ऐशूला थांबवण्याचा प्रयत्न करणार नव्हतीच. तिला समजावून सांगण्यासारखं काही उरलंच नव्हतं. हल्ली तर वारंवार मनालीच्या संसाराचा उल्लेख करून ऐशू तिला विनाकारण गिल्ट द्यायला लागली होती. मुलाकडून नकार आला की मनालीला भेटायला बोलवायचं. मन मोकळं करण्याचं निमित्त, पण गेल्या तीन चार भेटींचा शेवट हा मनालीच्या यशस्वी झालेल्या लग्नावर आणि मुलीवर येऊन थांबत होता. आज सुद्धा ऐशूनं परत विषय त्या वळणावर नेला, तेव्हा खरं म्हणजे मनालीनं राग व्यक्त करायला हवा होता पण झालं उलटंच, नेहमीप्रमाणे.
मनाली शिकता शिकता प्रेमात पडली, पटकन लग्न झालं आणि ऐश्वर्या म्हटली तसं दोन वर्षात मूल सुद्धा झालं. त्या वेळेला मनालीनं नोकरी सोडली होती आणि यावरून ऐश्वर्यानं तिची भरपूर हेटाळणी केली होती. त्या वेळी त्यांच्या लग्न न झालेल्या मैत्रिणी आठवडाभर काम करायच्या आणि शनिवार रविवार मस्त हिंडायच्या. लेट नाईट पार्टीज, वीकएंड गेटअवेज, क्लबिंग या सगळ्याचे फोटो दाखवून त्याची भरभरून वर्णनं करून ऐश्वर्या सांगायची. मनालीला सतत यु आर मिसिंग आउट ऑन अ लॉट याची जाणीव करून द्यायची.
त्या सुमारास ऐश्वर्याला सुद्धा तिच्या ऑफिसमधल्या नकुलकडून लग्नाची विचारणा झाली होती, ओळखीच्यांकडून चार-पाच स्थळं सुद्धा आली होती, पण लवकर लग्न करणं म्हणजे करिअरला आणि एकूण आयुष्यालाच तिलांजली देणं असा ऐश्वर्याचा समज होता. मैत्रिणींमध्ये रमलेली ऐश्वर्या ऑफिसमध्ये सुद्धा एकावर एक बढत्या घेत होती. मजा, मस्ती, पैसे याची झिंगच चढली होती तिला. आपली मुलगी यशाचे एक एक पर्वत सर करत आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे याचं तिच्या आईवडिलांना कौतुक होतंच; पण वाढत्या वयाबरोबर तिच्या लग्नाची, आयुष्यातल्या स्थैर्याची चिंता विशेषतः वडिलांना सतावत होती. तिचे आईचे विचार मात्र या बाबतीत ऐश्वर्याशी मिळते-जुळते होते. लग्न म्हणजे काही आयुष्याची इति कर्तव्यता नाही असं दोघींना वाटत होतं. या वाक्याशी, त्यामागच्या विचारांशी ऐश्वर्याचे बाबा सहमत असले तरी आपल्या मुलीच्या बाबतीत ते त्यांना तितकंसं पटत नव्हतं. त्याला कारण होतं ऐश्वर्याचा हळवा स्वभाव. तरुण वयात आणि कामाच्या व्यापात, एकटीनं राहणं सोपं असतं, पण आयुष्यभर असं एकट्यानं सगळं निभावून न्यायला मन खूप खंबीर असावं लागतं. ऐश्वर्या वरवर तसं दाखवत असली तरीही तिचं मन काही तितकंसं खंबीर नाही हे त्यांना चांगलंच माहीत होतं. तसं ते वारंवार तिच्या आईला सांगत सुद्धा होते. पण तिला आपली मुलगी चार चौघींसारखी गुंतली नाही, आपल्या मर्जीप्रमाणे आपलं आयुष्य जगते आहे, स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करते आहे, इतर कुणावर अवलंबून नाही याचा अभिमान होता. लग्न न करता सुद्धा कसं सुखात आयुष्य जाऊ शकतं हे वेगवेगळी उदाहरणं देऊन ती ऐश्वर्याला वारंवार सांगायची. बायकोच्या अशा वागण्याचं, कारण बाबांना उमगत नव्हतं. कदाचित लग्नानंतर तिच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालायला लागल्याची हळहळ सुद्धा त्यामागे असेल. आपल्या परीनं त्यांनी ऐशूला योग्य काय ते सांगण्याचा बराच प्रयत्न केला पण आईच्या विचारांचा पगडा भारी होता. मनालीच्या लग्नानंतर चार-पाच वर्षांनी हळूहळू इतर मैत्रिणींची ही लग्न झाली. ऐश्वर्या तिच्या आईच्या पाठींब्यामुळे इतर मैत्रिणींना बावळट ठरवत होती. कुणावर कशासाठी ही अवलंबून नसणाऱ्या ऐशूला एकटेपणा घालवायला मात्र कुणाची तरी सोबत हवीहवीशी वाटत होती. पण आईच्या अनावश्यक पाठींब्यामुळे ते बोलायची वेळ मात्र निघून जात होती. मैत्रिणींचे लग्नाचे, नवीन आयुष्याचे, पुढे मुलाबाळांबरोबरचे फोटो बघून तिला पोकळी जाणवत होती. पण आधी केलेल्या विचारांच्या प्रदर्शनामुळे बोलायची सोय उरली नव्हती. खरं तर हे विचार अत्यंत नैसर्गिक असूनही या विचारांचा अपराधीपणा तिला वाटत होता.
ऐशूचं फ्रेंड सर्कल हळूहळू कमी होत गेलं. तिचे मित्रमैत्रिणी त्यांच्या नवीन जबाबदाऱ्या निभावण्यात व्यग्र झाले होते आणि ही मात्र शाळा-कॉलेजमधल्या जुन्या मित्रांशी नव्यानं संपर्कात यायचा प्रयत्न करत होती. ऑफिसमधल्या काही ठरविक सहकाऱ्यांशी तिची सलगी वाढत होती. तिचे मित्र-मैत्रिणी काही कारणानं तिला भेटले, त्यांच्या घरचं काही बोलले तर त्या संध्याकाळी ती हमखास शाळेतल्या एखाद्या मित्राला मेसेज करायची. लेट नाईट चॅटिंग करून ती स्वतःचे समाधान करून घ्यायला शिकली होती. सकाळी उठून आंघोळ करून शरीर आणि मन दोन्ही साफ करून घ्यायची. कामाच्या व्यापात स्वतःला गुंतवून घेतलं की अशा गोष्टींचा विसर पडतो. फेसबुक, इन्स्टाग्रामवर मैत्रिणींचे फोटो बघितल्यावर तिला न सांगता येण्यासारखं काहीतरी वाटायचं. मग ऑफिसमधल्या मित्रांबरोबर बाहेर जायचा बेत ठरवायची. मजा करणं हा यामागचा एकमेवं हेतू नसायचा. घालवलेल्या वेळेवर हक्क सांगता येत नसल्याची सल मनात असायची. पण आपल्याला या सगळ्यातून समाधान का मिळत नाही? हे कळत नव्हतं. मन शांत व्हायला शरीराची आग शमवायला लागते त्यामुळे ते सुद्धा करून झालं. सुरुवात आपण करतो आहोत ते योग्य आहे का? इथपासून सुरू झाली असली तरी काही दिवसांतच त्यात निर्ढावलेपण येत गेलं.
काही महिन्यातच हे लेट नाईट चॅटिंग, आऊटिंग तिच्या आयुष्याचा भाग झाले. जरा मनाविरुद्ध काही झाले, कुणाला सुखात बघून हळहळ वाटली की तिच्याकडे उपाय ठरलेला होता. या उपायाला वेळ, काळ आणि अगदी माणूस याची सुद्धा काही बंधनं नव्हती. ऐशूला कोणत्याच नात्यात स्थैर्य नको होतं, त्यामुळे त्याबद्दल समोरून सुद्धा कधीच विचारलं गेलं नाही. उलट तिला असं वाटणं हे बऱ्याच जणांसाठी सोयीचं होतं. काही अपवाद होते, नाही असं नाही, पण ऐश्वर्याच्या वागण्यामुळे त्यांनी कधी काही बोलून दाखवलं नाहीच.
या सगळ्यामुळे क्षणिक आनंद मिळायचा पण मनात मात्र कायम कसलीतरी हुरहूर असायची. तिची सतत चिडचिड व्हायची. एकटेपणा घालवण्यासाठी कामात स्वतःला गुंतवून घेणं, कोणत्याही कार्यक्रमाला कामाची सबब पुढे करणं हे अविरतपणे सुरू होतं. वय निघून जात असल्यामुळे आता नातेवाईकांत कुजबुज सुरू झाली होती.
“आईवडिलांना मुलीचा भरमसाठ पगार सोडवत नाही..” हे वाक्य जेव्हा तिच्या आईच्या कानावर आलं तेव्हा मात्र त्या सावध झाल्या. स्वतःच्या मर्जीनुसार मुलीचं मन वळवणं त्यांना नवीन नव्हतं. बाबांनी नेहमीप्रमाणे आत्ता सुद्धा शांत राहण्याचा पर्याय स्वीकारला होता. ऐशूनं मुलं बघायला होकार जरी दिला असला तरी मनातून मात्र आता हे स्थैर्य नको वाटत होतं. त्यात वाढलेलं वय, बक्कळ पगार आड येत गेला. कारण काहीही असो, कोणताही नकार पचवणं अवघड असतंच. समोरून नकार येत गेले तसा लग्न करण्याचा विचारच नसल्याचा पवित्रा ऐशूनं घेतला होता. येणाऱ्या नकाराचा काही फरक पडत नाही हे जगाला पटवून देताना तिच्या मनावरचा ताबा अलीकडे सुटू लागला होता. अशाचवेळी मनात, तळाशी असलेली सल अचानक वर यायची.
आज सुद्धा मनालीशी बोलताना असंच झालं होतं. म्हणूनच तिच्या अगदी नकळत तिनं मनालीच्या संसाराचा उल्लेख केला होता. मनालीवर चिडचिड करून ऐशू तिथून निघून चालली होती कारण खरंतर मनालीच्या कोणत्याही प्रश्नावर ऐशूकडे उत्तर नव्हतं. मनालीनं शब्दात पकडू नये म्हणूनच तिथून चिडचिड करून निघून जायचा पर्याय तिनं निवडला होता. अख्खं जग जे सांगतंय तेच मनाली सांगायला लागली या गोष्टीचं तिला जितकं वाईट वाटलं होतं, तितकाच त्याबद्दल विचार सुद्धा करावासा वाटला. कुठेतरी शांत बसावं म्हणून ऐशू तिथून निघाली आणि मनाली थांबवायला येऊ नये म्हणून फोन उघडला तर त्यावर दोन मेसेज होते. आज संध्याकाळी भेटायला येणाऱ्या मुलाचा एक आणि परवा पार्टीमध्ये भेटलेल्या शाळेतल्या मित्राच्या मित्राचा एक… एखाद्या स्थळाचा एकीकडे विचार करून बोलणं, प्रश्न, प्रतीप्रश्न त्यांची हुशारीनं दिलेली उत्तरं आणि तरीही असणारी नकाराची भीती आणि एकीकडे प्रश्न, शंका होकार-नकार या सगळ्याच्या पलीकडे नेऊन ठेवणारी एक रम्य संध्याकाळ…
ऐशूला अर्थातच या क्षणभर आनंद देणाऱ्या भेटीची ओढ होती, पण त्याबरोबर येणाऱ्या आयुष्यभराच्या एकटेपणाचं गांभीर्य मात्र नव्हतं..
- मुग्धा सचिन मणेरीकर