गुलाबजाम!

30 Dec 2021 10:37:56

गुलाबजाम!


gulabjam_1 

नावातच एक फुल आहे, गुलाब आणि एक फळ, जामून! आपल्या भारतातील बहुतांश लोकांचा आवडता गोड पदार्थ. इतका आवडता की, हा पदार्थ पर्शियन आहे याचा आपल्याला विसर पडला आहे. गुलाबजामचे अरेबिक नाव लूकमत-अल-कदी आहे. (याचा गुलाबजाम असा अपभ्रंश कसा काय झाला कोणास ठाऊक) सर्व पदार्थांच्या उगमाच्या ढीगभर कथा असतात. नेपाळमध्ये गुलाबजामला लाल-मोहन म्हणतात. हे साजेसे नाव आहे कारण गुलाबजाम लालसर (मरून रंग) रंगाचे आणि मोहक असतात.

 

तमिळनाडूमध्ये कुंभकोणम गावातील 'कुंभकोणम मुरारी स्वीट्स' या शंभर वर्षे जुन्या दुकानात ड्राय जामून मिळतात. कुटुंबपरंपरेने चालत आलेल्या या व्यवसायातील लोकांनी ही रेसिपी बनवली आहे. ड्राय जामून पाकात तरंगत नाहीत तर त्यांच्यावर पिठीसाखर भुरभुरलेली असते. लहानसे कुरकुरीत, खुसखुशीत असे हे ड्राय जामून फ्रिजबाहेरही एक आठवडा टिकतात. गुलाबजामचा अजून एक भाऊ म्हणजे काला जमून. याचा रंग लाल पण जरा काळसर असतो. गुलाबजाममध्ये खवा, मैदा/राव असतो पण काला जामुनमध्ये छेना/पनीरही असते. कोलकाता शहरात साखरेचे सारण भरलेले गुलाबजाम पंतुआ नावाने प्रसिद्ध आहेत. याच शहरातील भीमचंद्र नाग यांनी लंबगोलाकार पनीर असलेले गुलाबजाम बनवून विकायला सुरवात केली. १८२६ मध्ये सुरू केलेले त्यांचे दुकान अजूनही आहे.

 

गोड गुलाबजाम तर आपण सर्वांनीच खाल्ले आहेत पण त्याची भाजी खाल्ली आहे? राजस्थानातील जयपूर शहरात हे खव्याचे गोळे तळून, मसालेदार ग्रेव्हीच्या रूपात 'गुलाबजाम कि सब्जी' नावाने सर्व्ह होतात. साधारण मलई कोफ्ता करीच्या जवळपास जाणारी ही करी. भारतीयांचे या पदार्थावर इतके प्रेम आहे की, या पदार्थासाठी अर्धा किलोमीटर हायवे आहे. दिल्ली-शाहजहानपूर-लखनौ या राष्ट्रीय महामार्गावर (एन-२४), उत्तरप्रदेशातील मिशेलगंज गावाजवळ शंभरपेक्षा जास्त दुकाने आहेत, गुलाबजाम विकणारी!!

 

फ्युजन फूड सदरातही हा पदार्थ भाव खातो. चीजकेक, आईस्क्रीम, पुडिंग, केक, इतकेच नाही तर बुंदीसोबत पिटुकले गुलाबजाम 'दिलजानी' या नावाने प्रसिद्ध आहेत. गुलाबजामची माझी पहिली आठवण म्हणजे, 'गुलाबजामून खाऊ या, मामाच्या गावाला जाऊ या.' या गाण्याची. त्या गाण्यात आपल्या आवडत्या पदार्थाचे नाव ऐकून मला खूप मजा वाटायची. कोणत्याही समारंभात, कोणत्याही वेळी गुलाबजाम परका वाटत नाही, हेच त्याचे वैशिष्ट्य! गुलाबजामचे चित्र म्हणजे असे गोलगुटुक, क्युट गोळे पाकात तरंगत असतात, हे केविलवाणे दिसतात. बिनपाकाचे, पिस्त्याचा गंध लावलेले, एकावर एक रचून ठेवलेले गुलाबजाम 'शाही' दिसतात. सिलिंडरच्या आकाराचे गुलाबजाम आरामात सोफ्यावर बसलेल्या एखाद्या उद्योजकासारखे वाटतात. आकार कसाही असला तरी, साखरेचा पाक मुरलेला हवा आणि गुलाबजामही नीट तळलेले हवे. पूर्वी घरी हा पदार्थ तयार करणे कठीण होते; पण त्याचे मिल्क पावडरचे रेडिमेड मिक्स मिळायला लागल्यापासून हा पदार्थ घराघरात पोहोचला. इतकेच नाही तर, एक किलोचे प्रोसेसिंग केलेले टिन मिळतात. तरीही, घरी आई-आजीने प्रेमाने बनवलेल्या खव्याच्या, थोड्याश्या तुटलेल्या, कमी-जास्त तळल्या गेल्यामुळे एकसारखा रंग नसलेल्या गुलाबजामची चव यासर्वांपुढे भारीच असते!

- सावनी 
Powered By Sangraha 9.0