कलाकार - ४

17 Dec 2021 11:59:24

कलाकार - ४


artist_1  H x W 

ऑडिशन -

सध्या सोशल नेटवर्कींगमुळे ऑडिशनची माहिती तात्काळ कळते. कित्येक Production Houses रोजच्या रोज आपल्या चित्रपटासाठी ऑडिशन घेताना दिसून येतात: पण ऑडिशनही पडताळून बघणं गरजेचं आहे. प्रत्येक ऑडिशनसाठी चित्रपट महामंडळाच्या परवानगीची आवश्यकता आहे. या बद्दल मागच्या एका भागात आपण चर्चा केली आहेच. या भागात एक कलाकार म्हणून आपण ऑडिशन साठी कोणती तयारी करावी हे पाहू..!

१. ऑडिशन म्हणजे परीक्षा नाही. प्रत्येक कलाकार वेगळा असतो आणि त्याचे लुक्स, भाषा, देहबोलीही भिन्न असू शकतात. एखाद्या रोल मध्ये आपण फिट बसूच असं नाहीये. त्यामुळे आपली पूर्ण तयारी असून आपण फेल होतोय हा न्यूनगंड सोडून द्यावा.

२. ऑडिशन पॅनलमध्ये असलेले लोक तुम्हाला एक पार्ट प्ले करायला देतात. तो तात्काळ सादर करावा असं नाहीये. शक्यतो रेग्युलर ॲक्टस प्ले करण्याचं टाळा. एखाद्या हिट फिल्म मधला हिट सिन करायचा अट्टहास टाळावा. उदा. 'नटसम्राट' चित्रपटातील 'to be or not to be' ही 'क्लिप' आजवर अनेक नवख्या कलाकारांनी सादर केली.त्यात प्रचंड चुका झाल्यात. आपल्याला पूर्ण अर्थ समजलेली आणि पूर्ण पाठ झालेली स्क्रिप्ट ऑडिशनसाठी निवडावी.

३. ऑडिशन मध्ये हावभाव, पाठांतर, संवादकौशल्य, उच्चार हे मुख्यतः पाहिलं जातं. त्यामुळे शुद्ध भाषा आणि थेट उच्चार असलेली क्लिप निवडावी.

४. शक्यतो साध्या सोप्या पद्धतीने ऑडिशन द्यावी. उगाच आपल्याला जमतं म्हणून खूप जास्त इंटेन्स आणि कोणत्याही रसाचा अतिरेक असलेली क्लिप निवडू नये. एक लक्षात असू द्यावं, की प्रत्यक्ष फिल्ममध्ये ते पात्र साकारलेल्या कलाकारांची तयारी पूर्ण झालेली आहे. पात्राचा अभ्यास पूर्ण झाला आहे. ते पात्र त्या कलाकाराला ठळक बसलंय. आपण त्यात स्वतःला तोडून-मोडून घालणं योग्य नाही.

५. ऑडिशनला भडक मेकअप करून जाऊ नये. साधेपणात वावरावं. बऱ्याचदा आलेल्या स्पर्धकांमध्ये प्रॉडुसरची माणसं बसलेली असतात. ते आपल्या प्रत्येक कृतीकडे बारीक लक्ष देऊन असतात. ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून इतरांशी आपलं वागणं-बोलणं थोडं जपून आणि नैसर्गिक ठेवावं. काही ठिकाणी कलाकार थोडा कमी असलेला चालतो, पण माणूस म्हणून पारख केली जाते.

६. ऑडिशन्समध्ये हमखास आढळणारी गोष्ट म्हणजे ओव्हरॲक्टिंग. आपल्याला खूप काही येतं या अविर्भावात कलाकार स्वतःची क्षमता विसरून काम करायला जातात. हे बऱ्याचदा अवास्तव होतं. रिजेक्ट करण्याची कारणं यांच्यामुळे तयार होतात.

७. काही ठिकाणी नेमक्याच ग्रुपसाठी ( वय, पात्र, भाषा, Profession ) ऑडिशन घेतली जातात. उदा. डॉक्टर च्या पत्रासाठी , विशिष्ट वयोगटातील , रंगाने, उंचीने ,भाषेनेही विशिष्ट ! आपण त्यासाठी किमान पात्र आहोत का, याची पडताळणी करून मगच ऑडिशन द्यावं.

८. ऑडिशनसाठी जाताना आत्मविश्वास असावा लागतो. आपण अनोळखी लोकांना सामोरे जात आहोत हे लक्षात ठेवून पाऊले उचलावी. भडक आणि तोडके कपडे, भडक मेकअप, उगाच भाषेतला फॉल्स ॲक्सेन्ट टाळावा.

९. कितीही ऑडिशन्स दिले तरी ते कमी असतात. प्रत्येक ऑडिशन एक नवीन अनुभव असतो. त्यामुळे खचून न जाता आहे त्या स्थितीला सामोरं जाण्यात आनंद आहे.

प्रत्येक कलाकाराला प्रत्येक रोल सूट होईल असं नाहीये. आपली शरीरयष्टी, हावभाव आपण ओळखावे. रोज आपण स्वतःला आरशात बघतो. यावरून आपण नेमक्या कश्या भूमिका करू शकतो याचा अंदाज आपल्याला यायला हवा. आपला चेहरा 'लीड'साठी नाहीए, तर आपण लीड करू शकणार नाही, असं कधीही होत नाही; पण त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते. एक कलाकार म्हणजे आत्मविश्वास आणि संघर्ष आलाच ! वाट बघणं आलं! जर आपण एक कलाकार म्हणून करिअर करण्याचं ठरवलं आहे, तर तशी शारीरिक आणि मानसिक तयारीही केली पाहिजे. घरच्यांना विश्वासात घेतलं पाहिजे; पण उगाच हौस म्हणून आपण कलाकार होण्याचं ठरवलं असेल तर यात न पडणं इष्ट..! कष्ट करून वर आलेले अनेक कलाकार आपण पाहिले आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागावं. आजकाल जग जवळ आलं आहे. ज्या काळी फार विकसित संपर्क यंत्रणा नव्हती, त्या वेळी स्ट्रगल करून वर आलेल्या कलाकारांनी त्या वेळी काय केलं याचे दाखले आपल्याला मिळू शकतील. मैलोमैल पायी जाणं, उपाशी राहणं, एका खोलीत दहा जण, केलेल्या कामाचा वेळेवर मोबदला न मिळणं या सगळ्यातून जे तरले, ते आज यशाच्या शिखरावर आहेत. आपणही तशी मानसिक तयारी ठेवावी. कारण जर यश हातोहात मिळालं तर त्याची किंमत रहाणार नाही. कष्टाने मिळालेलं यश मात्र अनंतकाळ टिकून रहातं.

काही कलाकारांच्या स्ट्रगलच्या अनुभवावर पुढच्या भागात चर्चा करू या.

- अनुराग

Powered By Sangraha 9.0