Primary tabs

देवाची प्रॉपर्टी

share on:

काल दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून जाणं झालं. देवळाला चांदीची दारं दिमाखात लागलेली दिसली. छान आहेत, खरंच अप्रतीम कलाकुसर आहे!
देव आहे किंवा नाही हा वादग्रस्त विषय आहे. कोणासाठी आहे, तर कोणासाठी नाही. माझ्यासाठी तो मंदिरात नाही. ज्यांच्यासाठी तो तिकडे आहे ते त्याला दानपेटीमध्ये अर्पण करतात, कधी अमुक मूर्तीला सोन्याचा मुकुट देतात, तमुकदेवाला सोन्याचा हिरेजडित रथ देतात, कोणत्या देवीला सोन्याच्या पालखीत बसवतात, तर कोणी चांदीची दारं बांधतात. असते कोणाकोणाची भक्ती, श्रद्धा, भावना! याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण प्रश्न असा उद्भवतो की, आंबाबाई एवढ्या रत्नजडित पालखीत बसून काय करणार? काय करणार ती एवढ्या प्रॉपर्टीचं? आंबाबाई सोन्याच्या पालखीत, दगडूशेठ चांदीच्या दारातून, तिरुपती बालाजी हिरेजडित रथात बसून ज्या प्रार्थना ऐकतात त्याच प्रार्थना एवढ्या नेत्रदीपक वैभवाशिवाय ऐकतीलच ना? हो! ऐकतच असणार. आणि तोच आशीर्वाद देणार ना? देवासाठी दान करण्याला विरोध नाही, जास्त दिलं तर तो माझं जास्त लवकर ऐकेल या भावनेला विरोध करावासा वाटतो. देवाच्या नावानं देवस्थानांना मोठ्या मोठ्या रकमा, दागिने, ऐवज, उपहार वगैरे वगैरे देण्यासाठी लावल्या गेलेल्या धनाचा नक्की काय उपयोग होतोय त्याचा विचार करण्याची आज गरज आहे. अनेकांचं म्हणणं असेल की या धनाचा सदुपयोग लोकांसाठी, समाजासाठी केला जातो. नक्कीच! पण तो किती आणि कसा हे काळण्याचा काही मार्ग आहे का? असेल तर किती लोक खरंच त्याचं काय झालं हे पडताळून पाहतात?
देवाला धन अर्पण करणं; पर्यायानं समाजाला धन अर्पण करणं हे पुण्य आहे; मान्य! मग हे आपण आपल्या मनानं, आपल्या हातानं करू शकत नाही का? त्यासाठी देवस्थानच्या कुबड्या का? चला दान-धर्म वगरे सोडा...! आपल्या घरी काम करणाऱ्या, पेपर-दूध टाकणाऱ्या व्यक्ती, सफाई कामगार हे सुद्धा समाजाचाच भाग आहेत. त्यांना त्यांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे वेळेवर देणं हे पुण्य आहे. दिवसभर ऊन, पाऊस, वाऱ्यात बसलेल्या भाजीवल्याकडून भाजी घेताना पाच-दहा रूपयासाठी वाद न घालणे हे पुण्य आहे. थरथरणाऱ्या गरिबाची भूक भागवणं हे पुण्य आहे. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या गरीबाचे पैसे द्यायला किरकिर करायची, भाजीवल्याचे दहा रुपये कमी द्यायचे, वेठबिगाराकडून मोबादल्याच्या कित्येक पट काम वसूल करायचं आणि मग वर्षातून एकदा कुठल्या देवस्थानाला जाऊन मोठं दान करायचं, केसबिस काढून धार्मिक असल्याचं दाखवायचं यात विरोधाभास नाही का?
हा विचार आपण करू शकलो तर ती एक 'दैवी' देणगीच असेल!

रविराज गोसावी 

yuvavivek@gmail.com

लेखक: 

No comment

Leave a Response