Primary tabs

बालक-पालक

share on:

आज बसमधून येताना घडलेला हा प्रसंग. एका महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून सातवी-आठवीच्या मुलाला अर्ध्या वाटेत बसमधून खाली उतरवले. त्याचवेळी ती महिलाही खाली उतरली. पोलीस केस वगैरे करेन असं तिचं बरंच बोलणं चालू होतं. बस दोघांनाही खाली उतरवून पुढे निघाली मात्र बसमध्ये त्या मुलाचाच विषय चालू होता. बसमधील महिला आपआपल्या परीने अशा शाळकरी मुला-मुलींचे किस्से सांगत होत्या. यातून विचार करायला लावणाऱ्या अनेक गोष्टी माझ्या मनात आल्या...

वय वर्ष १३-१६. बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत येण्याचे वय. या वयात मुलांमध्ये शारीरिक तसेच मानसिक बदल होत असतात. मात्र याच वयात मुलांमध्ये येणारी ही विकृती? याला जबाबदार कोण? मुलांच्या या बेजबाबदारपणाला कारण कोण? मुलांमध्ये येणारी ही वृत्ती (विकृती) यातून भविष्यातील कोणती पिढी जन्माला येत आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. आज मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी पालकांची चाललेली धावपळ, यातून मुलांकडे होणारे दुर्लक्ष, मुलांचा वेळ घालवण्यासाठी त्यांच्या हातात तासनतास संगणक व स्मार्टफोन देणं. यातून सर्फिंग करताना मुलं पोर्नकडे आकर्षित होताना दिसतात. आई-वडिलांचा नसलेला धाक, एकुलता एक किंवा एकुलती एक म्हणून लाडाकोडात वाढवताना मुलांमध्ये आलेला बेदरकारपणा यातून ही विकृती जन्म घेत आहे.

ही काही फक्त एका मुलाची गोष्ट झाली असे नाही. डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचे लेख वाचताना मुलांच्या अशा बऱ्याच घटना माझ्या वाचनात आल्या. नेट अॅडिक्शन आज साऱ्यांच्याच गळ्याचा फास बनला असताना मुलांना तो मोठ्या प्रमाणात आवळत जाताना दिसत आहे. काही महिन्यापूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती. एका शाळकरी मुलीवर शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व दहावीच्या चार मुलांनी बलात्कार केला आणि पुरावे मिळू नयेत म्हणून तिची हत्या करण्यात आली. १६ वर्षाच्या मुलांकडून बलात्कार हे भयानक आहे असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती काहीच नाही. आजच्या १६ वर्षाच्या मुलाकडून अशा घटना घडत आहेत ही चिंताजनक बाब आहे.

मागे एकदा एक मुलाखत ऐकली होती. इयत्ता सातवीमध्ये शिकणारी मुलगी आपल्याच कोशात गेली होती. नेहमीसारखे कोणाशी बोलणे नाही. खाण्या-पिण्याकडे लक्ष नाही. हळूहळू तिचा स्वभाव चिडचिडा होऊ लागला. तिचे आई-वडील तिला समुपदेशकाकडे घेऊन गेले असता तिने सांगितले की, तिला बॉयफ्रेंड नाही म्हणून वर्गातल्या मैत्रिणी तिला चिडवतात. तिच्या वर्तनबदलाचे नेमके कारण जेव्हा तिच्या आई-वडिलांना सांगितले, तेव्हा त्यांनाही काय बोलावे ते सुचेना. मुलामुलींमध्ये आतापासूनच येणारे हे विचार यातून शिक्षण हा विषय दुर्लक्षित राहून मुलं भरकटतात याची जाणीव होते. अलिकडेच ‘बॉइज’ चित्रपट पाहिला. किशोर वयातल्या मुलांच्या वयोगटाला अनुसरून चित्रपटाची मांडणी योग्य असली तरी त्यातील काही डायलॉग मात्र खटकतात. ‘हिला एकदा तरी मी घेणार’ असे जेव्हा चित्रपटाचा बालनायक म्हणतो, तेव्हा मुलींविषयी त्याच्या मनात काय विचार आहेत ते दिसून येतं. यातून कुठलं भविष्य आपण घडवतोय याचा विचार करणं गरजेचं आहे.

डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे सांगतात, मुले स्वतःहून पोर्न साईट्स ओपन करत नाहीत. मुलं जेव्हा नेटवर एखादी माहिती सर्च करत असतात तेव्हा अधेमध्ये जाहिरात स्वरूप पोप-अप्स येतात. यातून मुलांचे कुतूहल जागृत होतं व मुलं अशा साईट्स ओपन करतात. यातून आनंद मिळत असल्याने मुलांना याचे व्यसन लागते. मुलं यात गुरफटली जातात. यातून बाहेर पडणे कठीण असते. या पोर्नअॅडीक्शनचा परिणाम मुलांवर दिसून येतो. मुलं सतत एका कोशात गुरफटलेली दिसून येतात. अगदी आपणही एखादी साईट्स ओपन केली तरीही जाहिरातस्वरूप अशा लिंक्स येत असतात. मुलांचे कुतूहल जागृत होऊन त्यांनी लिंक्स ओपन केल्या यात त्यांची काही चूक आहे असं म्हणता येणार नाही, मात्र त्याचे व्यसनं लागू नये याची काळजी मुलं नक्कीच घेऊ शकतात. अशा वेळी न घाबरता ते आपल्या पालकांचे मार्गदर्शन घेऊ शकतात.

अलीकडेच पोर्नसाईट्स बंद व्हाव्यात म्हणून चर्चा-विनिमय चालू होत्या. मात्र त्यातून तोडगा अद्यापही निघालेला नाही. खरं तर पोर्न अॅडीक्ट मुलांची मानसिकता बदलणे यावर हा उपाय नाही. समाज – जागृती गरजेची आहे. आई – वडिलांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

- उत्कर्षा सुमित

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response