Primary tabs

‘आव्हान स्वीकारा आणि यशस्वी व्हा!’

share on:

काही लोक तापदायक परिस्थितीने खच्चून जातात, तर काहीजण आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, असा ग्रह करून घेतात. याच्या अगदी उलट यशस्वी माणसे अवघड अनुभवांतून संधी शोधू लागतात. त्यांना कठीण परिस्थिती ही कोडं आहे व ते सोडवायचे आहे असे वाटते.

‘Difficult roads often lead to beautiful destinations’ असे एक उदाहरण सुप्रसिद्ध आहे. कठीण रस्त्यावर मार्गक्रमण करतच आपण आपले ध्येय गाठू शकतो. या कथनाचे अनुकरण करणे तसे महाकठीण काम आहे खरे. तसे पाहिले तर आपण सर्व साधारणपणे ताणतणाव नसलेले, समस्या नसलेले, सुखी आयुष्याचे स्वप्न पाहत असतो. पण, असे सुखाने भरलेले आयुष्य या इहलोकात असू शकते का? डोळ्यांत वेदनेचे अश्रू कधीच आले नाहीत, अशी कोणी व्यक्ती या जगात असू शकेल का? अगदी प्रामाणिक उत्तर द्यायचेच झाले, तर ते आहे ‘नाहीच.’ आयुष्य हे समस्यांनी भरलेले असावे की नसावे, या प्रश्नाचे वास्तविक उत्तर देणे शक्य नाही. कारण पूर्ण आयुष्य एकही समस्या न पाहणारा वा न अनुभवणारा माणूस आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या जगात तरी सापडणार नाही. आपण स्वप्न पाहतो. ध्येय ठरवितो. या स्वप्नांना व ध्येयपूर्तीला मूर्तरूप देण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो. पण, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनसुद्धा या गोष्टी मिळतीलच असेही नाही. कारण, प्रयत्नांच्या वाटेवर अनेक अडथळे असतात. पण, अडथळे पार करताना आयुष्यात काहीतरी अनमोल मिळत जाते. अडथळ्यांच्या मार्गातून मात करून मिळणारा आनंद आपण केलेल्या कष्टांच्या मेहनतीचे फळ आहे. महापुरुषांनी म्हटलेच आहे की, आपण आयुष्यात कधी चुकलोच नाही असे म्हणणाऱ्या व्यक्तीने खरेतर आयुष्यात काहीच केलेले नसते. परिश्रम सामान्य माणसाच्या असामान्य बनविण्यासाठी प्रयत्न करतात.

आयुष्यातील कठीण प्रसंग नेहमीच माणसांना किंमत मोजायला लावतात. पण, शेवटी मात्र आपल्याला जे बक्षीस मिळते, ते मात्र खास असते. कठीण प्रसंगांनी माणसाची ताकद वाढते. ज्यावेळी अडथळे त्रासदायक अनुभव देतात तेव्हा जाणवत नाही. पण, नंतर मागे वळून पाहताना लक्षात येते की, ते अडथळे खरेतर तेव्हा आले नसते, तर आज इतके यशस्वी जीवन जगताही आले नसते. म्हणूनच आयुष्यातील कठीण अनुभव हे एक प्रकारचे आव्हान घेऊन येतात. त्याक्षणी आपल्या आत्मविश्वासाची, श्रद्धेची परीक्षा होते. आपली सहनशक्ती पणास लागते. हळूहळू या अवघड प्रसंगातून सावरताना आपला आत्मविश्वास, आपली सहनशक्ती विकसित होऊ लागते. जेव्हा आपल्या सहनशक्तींचा विकास होऊ लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सक्षम होऊ लागतो. एकदा अंतर्मन सक्षम झाले की, बाहेरच्या जगातून आपल्याला कशाची गरज भासत नाही. काही लोक तापदायक परिस्थितीने खच्चून जातात, तर काहीजण आपण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, असा ग्रह करून घेतात. याच्या अगदी उलट यशस्वी माणसे अवघड अनुभवांतून संधी शोधू लागतात. त्यांना कठीण परिस्थिती ही कोडं आहे व ते सोडवायचे आहे असे वाटते. एकूण काय अवघड प्रसंगांना आपण सामोरे कसं जाऊ, हे शेवटी आपल्या स्वत:च्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आपण घाबरलो, तर रखडलोच समजा. आपण जर जोमाने या प्रसंगाना सामोरे जायचे ठरविले, तर आपली वाट कोणीच अडवू शकणार नाही. आपण आपली ध्येयपूर्ती केली, तर आयुष्यात आपण कठीण परिस्थितीशी भिडलो हे सूर्यप्रकाशासारखे लखलखीत सत्य आहे. तेव्हा कठीण परिस्थितीला टाळता येत नाही, हे समजून आपण न घाबरता तिचा सामना करणे यातच खरा शहाणपणा आहे. तेव्हा ‘आव्हान स्वीकारा आणि यशस्वी व्हा!’

 

- डॉ. शुभांगी पारकर

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response