मागे एकदा परिक्षेदरम्यान एक दुर्दैवी प्रसंग घडला. असं असून सुद्धा दुसऱ्या दिवशी तीन तास मनातले विचार बाजूला ठेऊन परिक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहावी लागली होती. पण मग आयुष्याचा, माझ्या आयुष्याबाबतच्या दृष्टिकोनाचा प्रश्न पाठी लागला तो कायमचा! वैयक्तीक आयुष्य संपूर्ण विखुरलेलं असताना किंवा दैनंदिन जीवनातील एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक गायब होते तेव्हा हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही कचेरीतील कामं कशी करता?
हल्ली या ना त्या गोष्टीवरून दोन लोकांमध्ये भांडणं होतात, प्रेम या संकल्पनेचा तर अगदी खेळ मांडला गेला आहे. पण मग आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये पाच आजोबा दर रविवारी भेटून एकत्र चहा पितात तेव्हा त्यांना विचारावं वाटतं - आपके दोस्ती का राज़ क्या हैं? पहिलं प्रेम हरवून गेलं, त्या मुलीने नाकारलं म्हणून आत्महत्या करणारी लोकं दिसतात किंवा एखादा मित्र प्रेम या संकल्पनेला नावं ठेवताना दिसतात तेव्हा माझ्या आजोबांना आवडतात म्हणून सकाळी लवकर उठून पानग्या बनवणाऱ्या आजीला विचारावं वाटतं की प्रेम म्हणजे काय गं नेमकं? नातं जपणं म्हणजे काय करता तुम्ही?
मध्यांतरी माझा एक निर्णय चुकला आणि पुढचे अनेक दिवस मी माझ्या निर्णयावर विचार करत बसले होते. एखादा निर्णय चुकला तर त्याचे परिणाम सहन करावे लागतातच पण त्या बरोबर येणारी निराशा, आत्मविश्वासाची कमतरता यांचं काय करायचं? दडपण येतं या गोष्टीचं! बाहेर पडण्याचा मार्ग सापडेना होतो. हे असं तुमच्यासोबत सुद्धा झालं होतं का आणि मग त्या दडपणाला तुम्ही कसं पळवून लावता?
आता तर मला वाटतं की या सगळ्या प्रश्नांचा एकच प्रश्न करता येईल! तुम्ही कसं जगता??? आमच्या पिढीला एका विषयाचा अभ्यास होत नाही म्हणून एक सिगरेट ओढण्याची वाईट सवय लागली आहे. एक स्वतःचं घर बनत नाही म्हणून कदाचित उद्या अख्खं सिगरेटचं दुकान विकत घेतील.
एखादा चित्रपट बघून पुढे आयुष्यात मोठ्या सहलीवर जाण्याची स्वप्न रंगवणारी आमची पिढी! फार सोप्या वाटतात आम्हाला गोष्टी! पण जेव्हा काहीतरी अवघड घडतं तेव्हा आमचा सगळा आवेश गळून पडतो! म्हणूनच विचारावं वाटतं की तुम्ही कसं जगता? कसं सांभाळता सगळं? कशी करता सगळ्याची गोळाबेरीज? कशी तुमची आयुष्याची पोळी सुद्धा गोल गरगरीत आणि टमटमीत फुगलेली असते?
आणि आता शेवटचा प्रश्न!
तुम्ही माझ्या वयाचे होतात तेव्हा तुम्हाला सुद्धा असं माझ्या सारखं व्हायचं का? मोठ्यांची गरज भासायची का? सारखे प्रश्न पडायचे का?
थोडा नाही फार त्रास देतेय तुम्हाला! पण अगदी असं ‘आता काय’ असं होऊन जातं अगदी रोजच्या रोज! आणि मग आईच्या कुशीत शिरून झोपून जावं वाटतं! बाबांच्या पाठीमागे लपून बसावं वाटतं! पण काही वेळा शक्य नाही होत या गोष्टी! कदाचित जसं तुम्हीकडून लहानपणी प्राण्यांच्या गोष्टी ऐकून संस्कार शिकले तसचं आता तुमच्या आयुष्याच्या गोष्टी सांगून जगण्याची कला, युक्त्या सुद्धा शिकेन!
चूकभूल माफ असावी!
- मैत्रेयी सुंकले