
बाहेर पौर्णिमेचे चांदणे पडले आहे. शहरात रात्री रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे चांगले लांबपर्यंतचे दृश्य डोळ्याला सहज दिसते आहे. शहर आणि गाव यात बराच फरक असतो. पण तो फरक संस्कृतीत, वागण्या-बोलण्यातला असावा. त्या झाडाकडे पाहून मला फारसा फरक जाणवला नाही. गाव काय नि शहर काय चंद्राचा प्रकाश तसाच शीतल असतो सगळीकडे.. पायवाटा काय नि पक्के रस्ते काय, झाडांची मुळे जमिनीतच रुजलेली असतात! त्यांचे नाते थेट जमिनीच्या ह्रदयाशी असते. एखादे पिंपळाचे झाड शहरात किंवा गावात असले तरी दोघांचा स्वभाव दोन्हीकडे सारखाच असतो. एखाद्या ऋतूच्या ओंजळीत झाडे आपली पाने सहज देतात आणि एखाद्या ऋतूकडे ती हक्काने परतही मागून घेतात. थंडीत शहारतात, उन्हाळ्यात कोमेजतात, पावसात मजेत भिजतात. कोणत्या ऋतूशी कसे वागावे हे त्यांचे आधीच ठरलेले असते. म्हणूनच त्यांचे कुठल्याही ऋतूशी कधी भांडण होत नसावे. ऋतूचा स्वभाव ओळखून तसे वर्तन करणारी ही झाडे मला अगदी शहाण्या मुलासारखीच भासतात. म्हणूनच त्यांची सावली निरागस असते. पण शहाणी मुलेदेखील थोडीशी उनाड असतात. अर्थात त्या निरागसतेतच थोडासा उनाडपणा दडलेला असतो. शाळेतून घरी येताना रस्त्यावरुन एकदा या बाजूनी, एकदा त्या बाजूनी चालतात. घसा बसेपर्यंत चिंचा आणि कैऱ्या खातात. शहाणी झाडेही या थोड्याशा उनाड मुलांसारखीच असतात. त्यातल्या त्यात नारळाचे झाड.. आपल्या जवळून जाणाऱ्या माणसावर हळूच एखादे शहाळे टाकतात. अंगण झाडून झाले, की पाने -फुले पुन्हा अंगणभर नाचायला तयार! उंबराच्या झाडाने तर माझ्या दोन -तीन पांढऱ्या शर्टावर लॉण्ड्रीत धुतले तरी जाणार नाहीत असे डाग आपली फळे टाकून पाडलेले आहेत. तेव्हापासून उंबराच्या झाडाचा मी 'उंबरा' ओलांडलेला नाही! म्हणूनच अशी शहाणी पण थोडीशी उनाड झाडे मला शाळकरी पोरांसारखीच वाटतात..
या झाडांची सावली खरंच जादूची सावली असते. झाडाखाली बसलेल्या माणसाच्या केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही गार वाटते. या गारव्यात आणि शांततेत मनातल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे सापडतात. मनावरचा ताण हलका होतो. झाडेच नसती तर आपल्याला सणवार साजरे करताच आले नसते. वडाच्या झाडाकडे साऱ्या सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आपट्याचं झाड म्हणजे 'अस्सल' सोनं आहे. कडुलिंबाची पाने वर्षाच्या सुरुवातीला खाल्ली की वर्षभरात रोग झाले तरी त्यांची तीव्रता कमी राहते. निरनिराळी व्रते लोक करीत असतात. त्यांचे उद्यापन आंब्याच्या नि विड्याच्या पानाशिवाय 'सुफळ संपूर्ण ' होत नाही.. संत तुकाराम महाराजांनी या झाडांना 'सोयरे' म्हणजे आपले नातलगच मानले आहे. या नातलगांच्या उपस्थितीशिवाय आपल्या सण आणि समारंभांना शोभा कशी येईल! म्हणूनच अवतीभवती झाडं हवीत. निसर्गाचं हे हिरवं दान म्हणजे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या व्याधींवरच्या रामबाण औषधांचा न लपवलेला खजिना आहे.
झाडाचं हिरव्या रंगाशी खास नातं आहे. एखादी तरुणी लाजते तेव्हा तिच्या गालांवरचा गुलाबी रंग ठळक होतो तसाच झाडांचा हिरवा रंग अधिक ठळक होत असावा. लाजाळूची पाने मिटतात तेव्हा त्या पानांत लाजेची हिरवाई बहरत असली पाहिजे. मधुचंद्राच्या वेळी मोगरा हा 'अनिवार्य' घटक आहे. प्रेमाला सजवण्याचं मोठं काम हा मोगरा पूर्वापार करीत आलेला आहे. प्रेयसीच्या ओंजळीत चाफा दिला की तिच्या ओठांवर शब्दांची खास फुले फुलतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी फुलांइतके अस्सल साधनच नाही. फुलझाडेच नसती तर प्रेमाला गंधच आला नसता. मगाशी म्हटल्याप्रमाणे फळझाडे थोडीशी उनाड असली तरी कधी कधी ती शहाण्यासारखीही वागतात. गरोदर बाईला लागलेले आंबट खाण्याचे डोहाळे कैऱ्या-चिंचेची झाडे पुरवतात. काटेरी फणसात गोड गरे असतात. गऱ्यातला गोडवा फणसाच्या झाडाचे मूळ जमिनीत किती खोलवर रुजलेले आहे याची जाणीव आपल्याला करुन देतो. आंब्याशिवाय उन्हाळ्याच्या सुटीला शोभा नाही. आंब्याचे झाड शहाणे असते तसेच ते वक्तशीरही असते. उन्हाळ्याची सुटी गोड व्हावी म्हणून चार -पाच महिने ती आधीच तयारी सुरु करतात. झाडे काहीवेळा शहाणी आणि काहीवेळा उनाड वाटत असली तरी वेली मात्र कायम मला उनाडच वाटत आलेल्या आहेत. त्या झाडाच्या विश्वातल्या शेंडेफळ असतात. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर, या छपरावरुन त्या छपरावर नुसत्या धावत असतात. हळूहळू त्या इतक्या मोठ्या होत जातात की त्यांची सुरुवात आणि शेवट सापडत नाही. या उनाड वेलींनादेखील आपल्या भाषेने लता हा शहाण्यासारखा समानार्थी शब्द दिलेला आहे. झाड कितीही शहाणे किंवा उनाड असले तरी त्यांच्या सावलीत असणाऱ्या गारव्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही..
- गौरव भिडे