देवता उत्सवाच्या उत्साहाची..

युवा विवेक    07-Sep-2024
Total Views |


देवता उत्सवाच्या उत्साहाची..

गणपती हा शब्द उच्चारताच त्याचे मंगलरुप आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. अलीकडच्या काळात गणपती बाप्पा मुलांना कार्टून रुपात बघायला मिळाल्यामुळे लहान मुले आणि त्याच्यातील अंतर कमी होऊ लागले आहे. गणपतीच्या आपण ऐकत आलेल्या कथा अशा नवीन तंत्रज्ञानाने टीव्हीच्या पडद्यावर आणल्यामुळे अनेक मुलांना त्या आता तोंडपाठही होऊ लागल्या आहेत. याबरोबरच विशेष आकर्षण असते ते गणेशोत्सवाचे! लोक अतिशय मनापासून एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. पूर्वी घरोघरी गणेशोत्सव साजरा होतच असे. पण लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिल्याने हा उत्सव अधिक लोकप्रिय झाला. अर्थात घरी काय, देवळात काय नि सार्वजनिक उत्सवात काय ते मंगलरुप आपण पाहिले म्हणजे वेगळाच उत्साह आपल्यात संचारतो. कितीतरी महिने आधीच आपल्या मनात या उत्सवाची रुपरेषा आपण तयार करीत असतो. ही बुद्धीची, विद्येची, कलेची देवता असल्यामुळे अबालवृद्धांचे ते आराध्य दैवत आहे. त्याची उपासना निष्फळ होत नाही. उपासनेचे काही ना काही फळ आपल्याला निश्चितच मिळते.

दहा दिवस सतत सुरु असणारा हा उत्सव आपला उत्साह दहा पटीने वाढवतो. उत्सवाची तयारी म्हणाल तर ती एखाद्या नाटकाच्या रंगीत तालमीप्रमाणे असते. नाटकातला नट ऐतिहासिक पात्र रंगवताना तल्लीन झालेला असतो. दैनंदिन व्यवहारातही तेच शब्द नकळत त्याच्या तोंडून बाहेर पडतात. त्याप्रमाणेच आपल्या तोंडून या उत्सवासंबंधी जे जे म्हणून असेल ते बाहेर पडते. कुणाला स्तोत्रे म्हणायला आवडतात, कुणाला सजावट करायला आवडते, कुणी छान मूर्ती घडवतं, कुणी पुष्कळ दिवस आधीपासून नैवेद्याची तयारी करत असतं. या सगळ्या कामात माणूस अगदी दमून जातो. पण मन मात्र दमलेलं नसतं. ते सतत या उत्सवाचा विचार करीत असतं. म्हणूनच आपल्याला उत्साह जाणवतो. नव्या दिवशी नव्या उत्साहाने आपण कामाला सुरुवात करतो. अधिकाधिक मूर्ती घडवताना मूर्तीकाराचे कौशल्य वाढते. मोदक नि लाडू तयार करताना पाककलेचा विकास होतो. सजावट करताना चित्रकला नि हस्तकलेला वाव मिळतो. नवनवीन स्तोत्रे नि आरत्या देखील लोक लिहण्याचा नि पूर्वापार चालत आलेली स्तोत्रे, आरत्या म्हणण्याचा लोकांच्या उत्साहामुळे सृजनाचे नाते त्यांच्यात तयार होते. कदाचित, म्हणूनच गणपतीला चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणत असावेत.

घरगुती गणेशोत्सव आता काहीसा बदलतोय. पूर्वी सार्वजनिक मंडळात सादर केल्या जाणा-या कृत्रिम देखाव्यासारखे काही देखावे आता काही घरी दिसू लागले आहेत. मधोमध गणपतीची सुरेख मूर्ती आणि भोवताली वेगवेगळे सामाजिक संदेश असलेले फलक आणि चित्रे असतात. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा माहितीपर देखावा साकारतात. हे बदललेले स्वरुप सामाजिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. पण सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप मात्र अधिक बीभत्स होत आहे. संगीताला नावे ठेवू नयेत. परंतु, कोणते संगीत कोणत्या ठिकाणी वाजवावे याला काही मर्यादा असतात. आई वडिलांच्या देखत आपण अश्लील गाण्यावर नाचत नाही. पण तोच आदर या विद्येच्या देवतेप्रती आपल्याला ठेवता येऊ नये काय? असा विचार अगदी प्रत्येकानेच करायला हवा. वास्तविक सार्वजनिक उत्सवावरच समाजाला एकत्र आणण्याची जबाबदारी आहे. या गणपती बाप्पालाच आपण सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची सद्बुद्धी द्यावी अशी विनंती आता मात्र प्रत्येकाने करायला हवी. काही सार्वजनिक मंडळे मात्र पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणेच उत्सव साजरा करीत आहेत. यात खास आकर्षण असते ते मिरवणूक आणि देखाव्याचे.. लहानग्यांपासून अगदी वृद्ध मंडळी देखील काही ठिकाणी लेझीम पथकात सहभागी होतात. ढोल हे पारंपारिक वाद्य गणपतीला अधिक आवडत असावे, असे मला वाटते. त्याच्या तालावर गणपती बाप्पा नाचू लागतात आणि त्या सुंदर नृत्यामुळेच आकाशातून अदृश्य अशा उत्साहाच्या धारात लोक न्हाऊन निघतात. सकाळपासून सुरु झालेले वादन दुपारी अधिक रंगू लागते. ढोलावर पडणा-या थापेचा हात दमू नये अशीच त्या गणेशाने रचना केलेली असते. हे सारं वादन नुसतं पाहिलं तरी पाहणा-यात एक उत्साह संचारतो आणि तो नकळतच टाळ्या वाजवून ताल धरतो. या सा-या उत्साहात वैयक्तिक हेवेदावे अगदी संपून जातात. हेच या उत्सवाचे महत्व आहे.

वेगवेगळ्या शहरात उत्सवाच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी उत्साह सर्वांचा सारखाच असतो. दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूकीत उत्साहाबरोबरच डोळ्याच्या कडा पाणावलेल्या दिसतात तेव्हा ख-या अर्थाने उत्सवाची सांगता होते. पण उत्साहाची सांगता होत नाही आणि होणारही नाही.. पुढच्या वर्षी लवकर येण्याचा शब्द आपल्याला गणपती बाप्पानी दिलेला असतो. मिरवणूक बघताना आपल्या दादाच्या किंवा बाबाच्या खांद्यावर बसलेलं मूल ढोल आणि ताशाच्या तालावर नाचणे हा वादकांच्या उत्साहाचा सर्वोच्च सन्मान असतो.. तेव्हा आपणही म्हणूया... गणपती बाप्पा मोरया!

- गौरव भिडे