वाटले जसा फुलाफुलात चाललो..

युवा विवेक    28-Sep-2024
Total Views |


वाटले जसा फुलाफुलात चाललो..

परवाच एका कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमात कवी अनिल यांची 'वाटेवर काटे वेचीत चाललो..' ही कविता कुणीतरी सादर केली. कविता लिहणे आणि सादर करणे यात तसा बराच फरक आहे. कविता लिहता आली तरी सादर करता येतेच, असे नाही. सादर करण्यात एक कौशल्य असते. त्या कार्यक्रमात कविता सादर करणारी व्यक्ती कवी नव्हती. पण त्या व्यक्तीने अतिशय मनापासून केलेलं सादरीकरण मनापर्यंत पोहचलं. हे गीत असले तरी तुमच्या-माझ्यासारख्या प्रत्येक माणसाच्या मनाच्या एका कप्प्यातली ही कविता आहे. वाटेवर काटे.. म्हणताच मनात ती सल जागी होते. सूर्य वर वर जावा तशी ती सल मनातल्या कप्प्यातून दाटून येऊ लागते. तेव्हा अश्रूंना काहीशी वाट मोकळी करुन द्यावी लागते. पण फार वेळ दु:ख कवटाळूनही बसता येत नाही. आपले दैनंदिन काम पार पाडणे महत्वाचे असते. तेव्हा ती सल किंवा ते दु:ख पुन्हा तसंच मनाच्या कप्प्यात हळुवार जाऊन बसतं.
आपल्या भोवती वेगवेगळ्या प्रकारची माणसे असतात. त्यातले काही आपले नातेवाईक, काही मित्र, काही जवळची किंवा मानलेली नाती, तर काही केवळ ओळखीची नाती असतात. त्यातल्या अनेकांच्या आयुष्यात सुख-दु:ख येत जात असेल. एखादी व्यक्ती बंगल्यात राहते. चारचाकीने फिरते, तिच्याकडे आर्थिक सुबत्ता असेल म्हणजे मग ती व्यक्ती सुख देखील विकत घेऊ शकते, असा आपला समज असतो. तर दु:खी म्हणजे आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, असं आपल्याला वाटतं. त्यामुळे तटस्थपणाने आपण एकमेकांची सुख-दु:खे जाणून घेऊ शकत नाही. कुणाला कशाचं दु:ख होईल किंवा कुणाला कशात सुख वाटेल, हे सांगणे अवघड आहे. काही जण म्हणतात सुख मानण्यात आहे नि दु:ख वाईट वाटून घेण्यात आहे. असं जरी असलं तरी प्रत्यक्षात ते आपल्याला शक्य होत नाही. अप्राप्य गोष्टी आपल्याला हव्या असतात. त्यातच माझं सुख आहे आणि त्या मिळत नाहीत म्हणून आपण दु:खी आहोत, असाही आपला एक समज असतो. अशा सुख-दुखांचं म्हणजेच ऊन-पावसाचं येणं-जाणं आयुष्यात असतंच. किंबहुना, आपल्या जगण्याचा तो अविभाज्य भागच आहे. पण काही माणसांकडे सुख आणि दु:ख वेचण्याचं कौशल्य असतं. सकाळी बागेतली फुले वेचावीत त्याप्रमाणे ही माणसं सुख-दु:ख वेचतात. फुले संध्याकाळी कोमेजतात त्याप्रमाणेच सुख-दु:खांचा कोमेजण्याचा कालावधी ठरलेला असतो. ही माणसे खऱ्या अर्थाने जगतात आणि सकाळ इतकीच संध्याकाळही आनंदाने स्वीकारतात.
भोवतालच्या माणसांचे आपण निरीक्षण करत राहिलो म्हणजे पुष्कळ गोष्टी आपल्या लक्षात येतात. काही माणसे दु:खाला आपलेसे करतात. अपंग माणसे आज वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. आपल्या अपंगत्वावर त्यांनी मात केलेली आहे. अपंग असण्याचं दु:ख ते कवटाळून बसत नाहीत. आयुष्याचं सुरेख फूल तयार करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. म्हणूनच अशा व्यक्तींच्या आयुष्यातील दु:खावर तो सुखाचा सुगंध दरवळत राहतो. हा सुखाचा सुगंध म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील कधीही न संपणारं हास्य! कित्येकांची दु:खे बोलून दाखवण्यासारखी नसतात. त्या हास्याच्या मागे ही न बोलण्यासारखी दु:खे दडलेली असतात. कवी अनिल यांनी याच दु:खाला फुलाची उपमा दिलेली असावी.
दु:खावर मात करणं तसं फार कठीण असतं. नियतीने ओंजळीत दिलेल्या दु:खाला दान म्हणणारी माणसं आपल्या भोवती असणं आपलं भाग्यच असतं. आयुष्याकडे कसं पहावं हे ती माणसं आपल्याला त्यांच्या कृतीतून शिकवत असतात. जोडीदाराचं अकाली निधन हे दु:ख कुणाच्या ना कुणाच्या वाट्याला आलेलं असतं. पण त्या दु:खाची कल्पना करणं देखील अवघड आहे. अर्थात, वेगवेगळ्या वयात वेगवेगळी दु:खे असतात. पण वय वाढत जाईल तसं दु:ख झेलण्याची क्षमता वाढत जाते. पण तरीही काही दु:खे या क्षमतेच्या बाहेरची असतात. तेव्हा जगण्याचा कस लागतो. पण काही माणसे त्या काट्यांचीही फुले करतात. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक पोटभर हसताना दिसतात तेव्हा ते हास्य पाहून क्षणभर आपणच स्तब्ध होतो. एखाद्या व्यक्तीकडे आपलं दु:ख व्यक्त करायला आपण जातो. ती व्यक्ती आपल्याला आधार देते तेव्हा आपल्याला थोडंसं मोकळं वाटतं. पण त्या व्यक्तीचा आधार असणारी दुसरी कुणीतरी व्यक्ती नुकतीच सोडून गेलेली आहे, असं आपल्याला समजतं तेव्हा देखील आपण स्तब्ध होतो. ही माणसं एवढी मोठी दु:खे सहज झेलतात तेव्हा त्यांचा हेवा वाटतो. या माणसांना सुखात कुणाची तरी सोबत हवी असते. पण दु:खाच्या वाटेवर ते कुणालाही तसदी न देता फुलांच्या पायघड्यांवरुन चालावे इतकी शांतपणे चालत असतात. ते पाहून कवितेची ओळ आठवते, 'आपुलीच साथ कधी करीत चाललो '...

- गौरव भिडे