निर्माल्य..!

युवा विवेक    25-Sep-2024
Total Views |


निर्माल्य..!

 
वाहत्या नदीच्या किनाऱ्यावर कुणी निर्माल्य म्हणून देवाला वाहिलेल्या फुलांना नदीत वाहते टाकून पुढं निघून चालले होते. कुणी ते निर्माल्यरुपी असलेल्या कचऱ्याला नदीत वाहते टाकत असतांना ‘शिवनामाय’चे हात जोडून विनवण्या करीत होते. तर, काही आपल्या मनातले ‘शिवनामाय’ला सांगत होते माहीत नाही. अन् त्याला उत्तरही नव्हते. हे सर्व खूप मनोभावे चालू होते. यापाठीमागे श्रद्धा होती ती माझ्या सारख्यांना उमजूनही काहीही कळत नसल्याने कळल्याचे सोंग आम्हाला आणायचे होते…

कोण येतंय महादेवाच्या देवळाकडे हे बघून नदी किनाऱ्यावर उभे राहून महादेवाचे दर्शन घेतोय. कुणी पाण्यात डुबकी मारून आपलं पाप धुवून जाईल म्हणून त्यात डुबकी मारत होते. एका किनाऱ्याशी बेलाच्या पानांची दुकाने सजली होती. दहा रूपयाला एक १०८ पानांची जुडी असे ते विकत होते. सोबत बेलाची फळं सुद्धा होती....विकणारी बारा-पंधरा वर्षांची ती लेकरं बघून मी नदी किनाऱ्यावर बसून त्यांना न्याहाळत बसलो. एकीकडे व्यवहाराची गणितं शिकणारी ही मुलं होती ज्यांच्या चेहऱ्यावर न कुठला भाव होता न कुठली श्रद्धा. फक्त आपण येथून किती पैसे घेऊन जाऊ इतकंच ते विचार करत होते, बोलत होते...त्यांचं हे व्यवहारी बोलणं बघून मला माझा दशकापूर्वीचा काळ आठवत होता. नदीच्या या उंचवट्यावरून पेपरचा गठ्ठा बांधलेली सायकल लोटत घेऊन जातांना माझी होणारी अवस्था, सायकल चालवून चालवून बारीक झालेली कंबर, त्यातून निसटणारी माझी पॅन्ट. हे सगळं आठवलं अन् डोळ्यासमोर ते क्षण येऊन गेले. या मुलांनी पैसा कमवण्याचा हा किती सोप्पा मार्ग शोधला आहे याचं अप्रूप वाटलं पण याही मागे मेहनत होती, व्यवहाराची जोड होती...

गेले चार-पाच दिवस नदीचा प्रवाह दिवस दर दिवस वाढत चालला आहे. काल-परवा नदीच्या पात्रात असलेलं पाणी आज महादेवाच्या मंदिरात असलेल्या गाभाऱ्यात होतं. सभामंडप संपूर्ण पाण्याखाली गेला होता. वीनेकरी सावळीराम बाबांची वीना वाहत्या पाण्यात शिवनेच्या प्रवाहात काल एकाकी वाहून गेली. आता ती तशीच वाहत गोदामाईच्या पात्रात वाहवत जाईल...बरे झाले वेळीच लोकांना हलवल्यामुळे मंदिरातील आजी-आजोबा माय-बाप ठीक होती... वाहत्या पाण्यात अखेर दर्शन म्हणून किनाऱ्यावर उभा राहिलो. हात जोडून काय मागितलं माहीत नाही पण पाण्याच्या बाहेर येऊन तसाच अनवाणी पायांनी वाळुतून मार्ग काढत घरच्या मार्गाला लागलो. नदीवर असलेल्या पुलावर काही बायका पूजा करत होत्या. नदीला पाणी खूप असल्यामुळे पुलावर होत असलेली पूजा जवळून बघितलेली....पुलाच्या कठड्यावर वाहिलेली जाई, जास्वंदाची फुलं, बेलाची पानं अन् त्यांच्यावर वाहिलेलं हळदी कुंकु खूप सुंदर दिसत होतं. जळता कापूर विझू की मिनमिनू असा करत होता. नदीच्या वाहत्या पाण्यात श्रद्धा म्हणून छोटुली जाईची फुलं वाहत जात होती. नदीच्या प्रवाहात त्यांचं वाहणं मला माझ्या वाहत्या आयुष्यासारखं भासत होतं....

इथं माझं आयुष्य नदी झालं होतं अन् मी त्या नदीच्या पाण्यात वाहणारं एक नाजुकसं फुल, नदीचं तेच वाहतं पाणी आता फुलाची परीक्षा घेत होतं. याच विचारात मी घरी आलो. पुन्हा रात्रभर झालेला धुवाधार पाऊस आणि या पावसात सकाळी जेव्हा पुन्हा नदी किनाऱ्यावर गेलो तेव्हा हातचं खूप काही वाहून गेलं होतं. जाई-जुई, जास्वंदीची फुलं, बेलाची पानं पावसात थिजून गेलेला कापूर सगळं आणि सगळं वाहून गेलं होतं. पुलावर बघितलं तर तिथेही फक्त पाणी अन् पाणी होतं...

आता मला माझं आयुष्य निर्माल्य भासत होतं...!

 

 
- भारत लक्ष्मण सोनवणे