दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा आणि इतर अमली पदार्थांच्या व्यसनाची सुरुवात तारुण्याच्या उंबरठ्यावरच होते, असे आजचे अहवाल सांगतात. विशेषतः सिगरेटने झालेली सुरुवात हळूहळू दारू आणि अमली पदार्थांच्या सेवनाकडे जाते ही बाब अनेक संशोधनांनी मांडली आहे. व्यसनाची ही कीड फार मोठ्या अनिष्टाला आमंत्रण देते, कारण या पदार्थांच्या सेवनामुळे श्वसन संस्थेचे विकार आणि मेंदू आणि फुफ्फसांच्या तक्रारी सुरू होतात, पण सोबतच व्यसनांमुळे बसणारा मानसिक आरोग्यावरील फटका जबरदस्त खोलवर असतो. अनेक मानसिक आजार, ताण, चिंता, नैराश्य, व्यसनामुळे निर्माण होतात आणि त्या ताणामुळे, नैराश्यामध्ये आणखीन जास्त व्यसन केले जाते. हाच तो विळखा! कौटुंबिक व आयुष्यातील इतर तणांवांमुळे व्यसन करणं आणि त्यामुळे वाढलेल्या तणावामुळे व्यसन अधिक वाढत जाणं हेच न संपणारं दुष्टचक्र आहे. अशाप्रकारे व्यसनाची कीड वाढत जाते.
ही कीड आजच्या काळात अधिक घातक आणि चिंताजनक आहे, कारण आज मोबाईल वापराचं व्यसन, त्यात व्हिडिओ गेम्सच व्यसन, समाज माध्यमांचा अतिरेकी आणि अविवेकी वापर, त्यातही पॉर्नसारख्या विघातक व्यसनी सवयी तरुणाईचं सर्वच स्तरावरील स्वास्थ्य गिळंकृत करताहेत. काहीच वर्षांपूर्वी अमेरिकन सायकिएट्रिक असोसिएशनद्वारे एफ.ए.डी. (फेसबुक अँडिक्शन डिसऑर्डर) हा व्यसन-विकार जाहीर झाला आहे. मध्यंतरी देशपातळीवर एक महत्त्वाचा सर्व्हे केला गेला. ज्याद्वारे धक्कादायक वास्तव समोर आलं. देशातील शहरांमध्ये तरुणांचं (युवक व युवती दोन्ही) पॉर्न अथवा लैंगिक कंटेंट पाहण्याचं प्रमाण तब्बल ६३% आहे. यावरून व्यसनाची कीड किती मोठ्या प्रमाणात आजच्या युवा वर्गाला लागली आहे, याचा अंदाज येतो. किती भयंकर आहे हे वास्तव! ज्या वयात तरुण-तरुणींनी कंबर कसून अभ्यास करावा, तितक्याच उत्साहात खेळावं, व्यायाम करावा, मजा करावी, बागडाव, आयुष्याच्या या सोनेरी क्षणांचा आनंद मनाच्या ओंजळीतून पुरेपूर लुटावा, मनमुराद भटकंती करताना आलेल्या जीवनरसाचा हृदयंगम प्रत्यय मनात खेळवावा, मुरवावा, समाजासाठी काही करू पहावं, ज्या वयात जीवनाची सुरेल स्वप्नं रंगवणाऱ्या मनाने जागेपणीही पहावीत, त्या वयात व्यसनाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई पाहून हृदयाचं पाणी होतं. व्यसनांची कीड तरुणांना लागते खरी, पण त्याच्या परिणामांची झळ त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते. ज्या वयात मुलामुलींनी घरातील कामांना हातभार लावावा, आईवडीलांच्या हाताशी येऊन आधार द्यावा, त्या वयात जेव्हा आईवडिलांना व्यसनी मुलांमुळे पुष्कळ सोसावं लागतं. आईवडीलदेखील उतारवयात आलेले असतात. त्यांनाच मुलांकडे पहावं लागतं, त्यांचे प्रताप सहन करत, व्यसनमुक्तीसाठी पैसे पाण्यासारखे खर्ची घालावे लागतात. या सर्वात होणारी जननिंदा, नामुष्की आणि त्यामुळे आत्मिक मनस्ताप एवढी मोठी किंमत व्यसनी तरुणाच्या घराला आतबाहेर चुकवावी लागते!
तरुणांना लागलेली व्यसनाची कीड कशी आणि किती खोलवर आहे हे अनेकअर्थी घातक आहे हे आपण पाहिलं. पण तेवढं पाहून निष्फळ खेद करत बसण्यात अर्थ नाही. ती कीड लवकरात लवकर कशी कायमची मिटवता येईल किंवा लागूच नये यासाठी काय कृतिशील करता येईल, याबद्दल विचारविमर्श करायला हवा. तिथेही न विसरता ते विचार कृतीत उमटून त्यातून ही कीड जायला हवी. एक महत्त्वाचा सर्व्हे सांगतो, की आज जे प्रौढ व्यसनी आहेत, त्यांपैकी किमान निम्म्या लोकांची व्यसनाची सुरुवात तारुण्यात झालेली आहे. त्यामुळे या धोक्याच्या वयातच व्यसनांना आळा घालणं गरजेचं आहे. अर्थात त्यासाठी तरुणतरुणींना शाळा-महाविद्यालयांमधून खऱ्या अर्थाने डोळे उघडणारं व्यासानाशी निगडित शिक्षण देणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष व्यसनमुक्ती केंद्रांना भेट देऊन त्यांचं गांभीर्य समजून देणं महत्त्वाचं ठरेल असं वाटतं. ज्या मोबाईलमुळे निरनिराळी आधुनिक व्यसनं (व्हिडिओ व्यसनं, पोर्न, समाज माध्यम व्यसनं, वगैरे) निर्माण होतात आणि फोफावतात तो मोबाईल तरुणांच्या हातून दूर करणं आजमितिला केवळ अशक्य आहे. पण तरीही आशा अजून कायम आहे असंच मला वाटतं. यासाठी मोबाईलचाच वापर कल्पकतेने करणं सुयोग्य ठरेल. मोबाईल-माध्यमातून व्यसनमुक्ती, व्यसन सोडण्याची तीव्र प्रेरणा दृकश्राव्य माध्यमातून निर्माण करणं, त्यासाठी तरुणांना आकर्षित करतील असे चित्रपट, चित्रफिती, लघुपट, अशांची निर्मिती करणं महत्त्वाचं आणि व्यसनमुक्तीसाठी परीवर्तक ठरेल. व्यसन नावाची कीड संपवणं याला पर्याय नाही, कारण ती वेळेत संपवली नाही तर अधोगतीकडेच घेऊन जाते. तुकोबांनी हेच तर सांगितलेलं आहेच -