आपलं माणूस..

युवा विवेक    14-Sep-2024
Total Views |


आपलं माणूस.. 

 
माणूस हा तसा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या भावभावना, विचार, नवनवीन गोष्टी कुणाला तरी दाखवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तसेच, इतरांच्याही अशाच नव्या गोष्टी जाणून घ्यायला त्याला आवडतं. हे शेअरिंग किंवा आवडी-निवडीच्या पलीकडेही त्याला समाजाची गरज असते आणि ती म्हणजे संरक्षण! केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक संरक्षणही आपल्याला हवे असते. आपण जन्माला येतो तेव्हा सर्वांच्याच आवडीचे असतो. तेव्हा आपली माणसांशी आणि समाजाशी पहिली भेट होते. वस्तू, माणसे, नाती यातला फरक आपल्याला जाणवू लागतो. जसजसे आपण मोठे होतो तसतशा आपली हक्काची माणसे म्हणजे हक्काच्या जागा आहेत, याची जाणीव आपल्याला होऊ लागते. त्या जागांभोवती, त्या माणसांभोवती आपण फिरु लागतो. त्याच्याशी सतत बोलण्याची इच्छा आपल्याला होते. अर्धवट समज आलेल्या वयात किंवा पंधरा-सोळाव्या वर्षी हक्काची जागा हा तर जगण्याचा आधार असतो. एखादा दिवस जरी आपल्या माणसाशी बोलणं झालं नाही, तरी आपलं मन अस्वस्थ असतं. हे आपलं माणूस रंग, रुप, आकार, जात-पात वगैरे विसरून निर्माण झालेलं असतं. एखादा क्षणही माणूस 'आपलं' होण्यासाठी पुरतो.

आपलं माणूस म्हणजे नियमाला अपवाद! त्यामुळे काही वेळा आपण त्याला गृहीतही धरतो; पण त्याची भेट झाली नाही तर मात्र आपला विरस होतो. आपलं माणूस या शब्दातलं 'आपलं' हे दोन व्यक्तींनाच ठाऊक असतं. आपलेपणा वाढतो तो सहवासाने.. सुरुवातीला ओळख होते तेव्हा आपलेपणाच्या जमिनीत नातं रुजू लागतं. भेटी-गाठीतून नवे अंकुर त्याला फुटत जातात. एक मन स्त्रीचं तर एक पुरुषाचं असतं. हे भिन्नत्वच दोघांना एकत्र आणतं. त्या फुटलेल्या अंकुरातून नात्याचे झाड हळूहळू तयार होऊ लागते. एकमेकांच्या हास्याची वाऱ्याची झुळूक, प्रामाणिकपणाचा स्वच्छ प्रकाश, विश्वासाचं खत आणि सहवासरुपी पाणी या सहाय्याने त्या झाडाचा मोठा वृक्ष होऊ लागतो. अधेमधे एखादी अबोल्याची सरही येते. वृक्ष म्हटलं म्हणजे त्याला ऋतूची साथसंगत आलीच. सहा ऋतूत झाड जसं वेगवेगळं दिसतं, तसंच आसू, हसू, राग, वाद-संवादाच्या ऋतूंशी आपलेपणाला जुळवून घ्यावंच लागतं. वसंताचा उत्सव साजरा करायचा म्हणजे पानगळ सोसायला हवीच. या पानगळीच्या वेळी आपल्या माणसाशी आपलं किती जुळतं यावर आपलेपणा अधिक अवलंबून असतो. आपल्या माणसाची जशी आपल्याला गरज आहे तशी त्या माणसालादेखील आपली गरज आहे, हे समजणे अलीकडच्या काळात महत्त्वाचे आहे.

आपल्याला हवा तसा नि हवा तेव्हा समोरचा माणूस केवळ 'आपला' असावा, असं जरी आपल्याला वाटत असलं तर तो अट्टाहास झाला. त्या माणसाला आपल्याला वेळ देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यातच एखाद्या वेळी त्याचे महत्त्वाचे काम राहून जाते. अशा वेळी त्याची चिडचिड वाढते. मग तो माणूस समोर असला तरी मनाने आपला नसतो. यातूनच संघर्ष वाढतो. मग आपलं माणूस आपल्याला 'आपलं' वाटत नाही. उगाचच परकेपणाची जाणीव मनात होऊ लागते. यापेक्षा त्या माणसाशी जे जे म्हणून काही बोलायचं आहे, सांगायचं आहे ते आपल्या मनाच्या कागदावर टिपून ठेवावं. जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा तो मनाचा कागद त्या माणसाला शांतपणे वाचून दाखवावा. म्हणजे मग विसंगत संवाद न घडता शब्दांच्या वेली फुलू लागतात. 'आपलं माणूस ' जपण्याचा चार-दोन महिन्याचा कोर्स कुठे आढळत नाही. ते जपणं शिकावं लागतं नि जपूनही ठेवावं लागतं. हल्ली हे जपणंच कुठेतरी हरवत चाललंय. आपलं माणूस नावाच्या नात्यात अवेळी पानगळ होऊ लागली आहे. याचा नकळत परिणाम दैनंदिन व्यवहारात नि वागणूकीत आपल्याला झालेला जाणवतो. संवादाची फुले आपण नकळत पायी चिरडतो आहोत नि काटे कुरवाळत बसलोय! काटे बोचलेल्या हातांना सावरायला आपलं माणूस हवंय. पण ते काटे कुरवाळण्याच्या भरातच आपलं माणूस आपल्याला सोडून गेलंय याची जाणीव होते आहे नि मग ती सल मनाला अधिकच बोचते.

आपलं माणूस प्रत्येकाला हवं तेव्हा मिळेलच असं नाही. पण ज्याला मिळालंय त्याला मात्र ते जपता यायला हवं. पणं म्हटलं तर सोपं नि म्हटलं तर अवघड आहे. आपण स्वतः माणूस आहोत हे समजावणं ही त्या जपण्याची पहिली पायरी आहे. आधी स्वतःला माणूस म्हणून आपल्याला स्वीकारता यायला हवं. समोरची व्यक्ती ही फक्त आपली असली तरी तीदेखील एक माणूस आहे. आपल्याला असणाऱ्या साऱ्या भाव-भावना त्याही माणसाला असतात नि म्हणूनच आपण त्याला माणूस म्हणत असतो. ही साधी जाणीवदेखील आपल्याला 'आपलं माणूस' जपायला शिकवते. जिथं समजून घेणं असतं तिथे आपलेपणासारखं दुसरं सुख नाही! अशा आपलेपणाच्या आभाळी गप्पाचं चांदणं सुरेख फुलतं. स्पर्शाची एखादी पौर्णिमा देखील आयुष्य मंत्रमुग्ध करते..

- गौरव भिडे