नुकताच पाऊस पडून गेला. औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपन्यांचे एकाकी साडे अकरा वाजता भोंगे वाजू लागले. दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार करदुड्यात आपल्या कंबराच्या खाली जाणाऱ्या चड्ड्या सावरत गेटवर येऊन आयडी कार्ड दाखवत कंपनीच्या गेटमधून बाहेर पडली.
पुन्हा एकदा आयडी कार्ड खिश्यात व्यवस्थित ठेवलं आहे का नाही हे चाचपून बघितलं अन् ही कामगार मंडळी रुमच्या दिशेनं पायीच पॉश अश्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एकाकी वाटांनी रुमच्या वाटा जवळ करू लागली. कंपन्या म्हंटले की सगळं लाखो करोडोत असतं पण; आपली उभी हयात कंपन्यात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्काची जुनी मोटार सायकल घेण्या इतपत पैसे महिन्याच्या शेवटीला त्यांच्या पदरात राहत नाही.
त्यामुळे आयुष्यभर एकटंच या सूनसान वाटा तिन्ही शिफ्टच्यावेळी ओळखीच्या करून घेतल्या जातात. लुटणारे तरी काय लुटणार त्यांच्याकडून कंपनीत असलीच मोबाईल घेऊन जायला परवानगी तर एखादा गाण्याचा बटणाचा मोबाईल असतो सोबत. रस्त्यानं तोच विरंगुळा. कंपनीतील भोग्यांचा आवाज, त्या मोबाईलमधील गाण्यांचा आवाज अन् या सगळ्यात कामगारांच्यातील माणसांचा आवाज कुठे विरला जातो काही कळत नाही.
चौकात येऊन बिडी शिलगवून बराच वेळ बसून राहीलो. बाराचा पार कलून गेला पण अजून काही रूमच्या वाटा जवळ करायची इच्छा झाली नाही. नुकतच येऊन गेलेल्या अवकाळी पावसाने वस्तीतील नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यांचा खळखळ आवाज अन् चौकातल्या लोकांचा संडासाच्या तुंबलेल्या पाण्याला वाहण्यासाठी मोकळती भेटल्याने ड्रेनेज लाईन मोकळी वाहू लागली होती. जसं शिनभाग उरकून झाल्यावर एखादी कोरी पोरगी पहील्यांदा वाहवत जाते.
चौकात असलेल्या कौसरची अंडाभुर्जीची गाडी त्याने साडे अकराच्या भोंग्याला बंद केली. जवळच असलेल्या बिना दरवाज्याच्या पत्राच्या शेडच्या आत तो पडदा ओढून बायकोच्या शरीराशी लगट करत बसला.
देशीच्या गुत्त्यावर अजून बरेच सकाळसाठी असलेले देशी दुकानाचे पहारेकरी तिथेच पेंगुळल्या अवस्थेत झोपी गेले होते. दुकानाला त्यांच्या उपस्थितीत चोर येऊन फोडू शकणार नव्हते. त्यामुळे देशी दारूच्या दुकानाच्या मारवाडी मालकाला सिक्युरीटी गार्ड ठेवायचं काम राहिलं नव्हतं.
चखणा म्हणून असलेल्या उडदाच्या पापडाचे उरलेले पापुद्रे घेऊन एकवीस वर्षांचा समीर पुलांच्या खाली असलेल्या वाहत्या पाण्यातील मासोळ्यांना ती पापुद्रे तो खाऊ घालत होता. अन् स्ट्रीट लाईटच्या उजेडात त्या माश्यांची ते पापुद्रे खाताना होणारी तरफड तो मात्र रिकाम्या पोटी बघत बसला होता.
वस्तीला एका अंगाला झोपलेले भिकारी लोकं पावसाचा आसरा म्हणून बस थांब्याच्या आत कुडकुडत सिमिटांच्या गोण्यावर पहुडली होती. त्यांच्या कपड्यांना इसाडा वास सुटला होता. जसंकाही उन्हात एखादं उबवलेले अंडे फुटून जावं इतका तो घाण वास होता. पण माणसंच ती माणसांच्या आश्रयाला येऊन एकमेकांच्या अंगाला एकमेकांचा आधार करून अंगाचे मुटकुळे करून झोपी गेली होती.
कुत्रे मोठ्यानं भुंकत होती, रस्त्यावरील गाई भाजीपाला विकणाऱ्या लोकांनी फेकून दिलेल्या भाजीपाल्याचे देठं, सडके टमाटे खाऊन त्यांना रवंथ करत डोळे लाऊन बसल्याजागी झोपी गेली होती. चौकात उभी राहणारी सनथ नावाची किन्नर मैत्रीण नुकतच बासी बिर्याणी खाऊन ढेकर देत विमल खाऊन रखेलींच्या बाजारात आईझव्या गिऱ्हाईकांना डोके लावत होती.
अन् म्हणत होती,
रंडवे साले रांडा चोदने आया इधर, तेरी बीवी नहीं पैसे निकाल फट्टू लवडे..!
तिचं हे वाक्य कितीवेळ कानात गुणगुणत होतं. रूमवर येऊन निस्तरलो एकचा पार कलून गेला होता. दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज पाऊसात भिजल्याने दोन अडीच किलोचा झाला होता. दिवसभर कामाने तळपायाला येणाऱ्या घामाने भिजलेले सॉक्स नाल्याच्या वाहत्या पाण्यात अजून भिजल्याने साऱ्या रूममध्ये त्याचा वास सुटला होता.
आता मात्र वीर्य गळून पडावं तसं औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारी कंत्राटी कामगार पोरं रात्रीच्या एकच्या सुमारास वस्तीला असलेल्या फाळक्या खोलीत अंथरुणावर निपचित निस्तरली होती.
भारत लक्ष्मण सोनवणे.