लो. टिळक पुरस्कार निमित्ताने..

युवा विवेक    04-Aug-2024
Total Views |


लो. टिळक पुरस्कार निमित्ताने..

नुकताच, या वर्षीचा '४२वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' हा महत्त्वाचा पुरस्कार सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला. कामाच्या व्यग्रतेमुळे पुण्यात येऊ न शकल्याने दिल्लीमध्ये हा सत्कार सोहळा पार पाडावा, हे आयोजकांचं मोठेपण! आपल्या लेखनाने आणि समाजकार्याने भारतीय मनामनांत जिव्हाळ्याचं घर करणाऱ्या सुधा मूर्तींना हा सन्मान बहाल होणं ही स्वाभाविक आनंदाची गोष्ट आहे. एखादी अब्जावधीची मालकीण असणारी आणि स्वबळावर जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेली स्त्री आपल्याच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अगदी साधेपणाने येते, तो विनम्रपणे स्वीकारते आणि भाषणातही केवळ कृतज्ञता मनापासून व्यक्त करते यात खरं नवल काय? आजच्या काळात हेच तर नवल आहे! साधेपणा देखील दिखाऊ केला जात असताना ही गोष्ट खरोखर महत्त्वाची वाटते. त्यांचं कुठलंही (विशेषतः या पुरस्कारास उत्तर म्हणून केलेलं) भाषण ऐकल्यास लगेच जाणवेल की त्यांच्याठायी कुठलीच कृत्रिमता नाही. अगदी दिसण्यात, वागण्यात, बोलण्यात कुठेच नाही. मराठी भाषेवर प्रभुत्व नाही हे प्रांजळपणे आणि मराठीत सांगून त्या इंग्रजीत बोलायला सुरुवात करतात, आणि त्यातही मधूनमधून प्रेमाने मराठीची मिसळण करत जातात. मराठी आपल्यासाठी यशोदा असल्याची भावना.. किती सहज आहे हे बोलणं! त्यात उसना गहिवर नाही, लावलेला उंच सूर नाही की लालित्याचा अनाठायी सोस नाही. साधेपणा सुंदर कसा वाटतो? याचं उत्तर हवं, तर त्यांच्याकडेच बघावं! बोलत असताना, किंबहुना संवाद साधत असताना, शिवाजी महाराजांबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात आणि एका क्षणी आश्चर्य वाटतं. महाराजांना आपण पाहिलं नाही, त्यांच्या पाया पडणं काही शक्य नाही म्हणून उपस्थित असलेल्या शाहू महाराजांच्या पाया पडणार आहे, त्यामुळे कृपया नाही म्हणू नका असं त्या म्हणतात आणि लगेच नामस्कर करतात सुद्धा! आजच्या काळात, जिथे फक्त हात जोडून नमस्कार करणंही अनेकांना अवघड जातं, इतकंच काय? साधा नमस्काराचा इमोजी 'मी' पाठवू की नको याचा दोनदा विचार केला जातो, तेव्हा या बाई खांद्यावर पदर घेऊन पूर्णपणे वाकून शाहू महाराजांच्या पायावर डोकं ठेवतात!! ही गोष्ट अद्भूत आहे आपल्यासाठी. त्यांना यात जराही कमीपणा वाटत नाही, उलट हे पाहून आपल्या मनातला त्यांचा मोठेपणाच मोठा होत जातो. त्यांचा हा नमस्कारही कृत्रिम नाही, कारण ही विनम्रता त्यांच्या स्वभावात आहे. पूर्वी देखील अमिताभ बच्चन, संभाजी भिडे गुरुजी यांना त्यांनी नमस्कार केल्याचं आपल्याला आठवत असेलच. या भाषणात, त्या आपला एक अनुभव सांगतात, पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात पण उपस्थित टिळकांना हिताचा उपदेश द्यायला विसरत नाहीत. टिळकांचा वंश लभाण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं आहे, माझी नातवंड, उद्याचा समाज हा तुमच्याकडेच पाहणार आहे हे सांगत त्या जबाबदारीची जाणीव करुन देतात. इथेही न थांबता, मराठी समाज म्हणून आपल्या मुलांना मराठी भाषा लिहिता वाचता आलीच पाहिजे हे त्या आई-आजीच्या जिव्हाळ हक्काने सांगतात. टिळक, फुले, रानडे, रमाबाई रानडे, आगरकर, हा महाराष्ट्राचा DNA आहे. त्याचा अभिमान, कृतज्ञता असायलाच हवी हे त्या आवर्जून सांगतात. या पुरस्काराच्या निमित्ताने जसं टिळकांचं स्मरण होतं, तसंच टिळकांच्या पत्नीचं देखील स्मरण व्हायला हवं हे त्यांचं स्त्री संवेदन किती सहज येतं बोलण्यात!

मराठी वाचकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, अनुवादकाची प्रशंसा करणं, आणि अनुवादकाचं म्हणजेच लीना सोहोनी यांचं नाव घ्यायला त्या विसरत नाहीत, ते आवर्जून घेतात हे आजच्या ठरवून नाव घेणं टाळण्याच्या जगात किती महत्त्वाचं आहे! या सर्व ओघात येणारे संस्कृत सुभाषिांचे संदर्भ अनेक अर्थांनी मोलाचे आहेत.

२००४ मध्ये नारायण मूर्तींना हा पुरस्कार रतन टाटांच्या हस्ते मिळाला असताना, मूर्तींनी देखील टाटांना असाच नमस्कार केला होता! जेव्हा संस्कृतीची अशी जोपासना समाजातील मान्यवर आपल्या आचरणातून करतात, तेव्हा समाजासाठी ते सहजपाठ असतात. अर्थात, घेतले तर! एकूण, सुधा मूर्ती यांचं काम, लिहिणं, बोलणं चालणं, त्यांची भारतीय संस्कृतीची आस्था, इथल्या मुळा-मूल्यांवरील विश्वास, हे आपल्या सर्वांसाठीच किती आदर्श आहे! त्यांच्या आयुष्याची स्वकर्तृत्वाने उंच झालेली शाखा जेव्हा तितक्याच सहजतेने झुकलेली दिसते, तेव्हा ही अस्सल ऋजुता पाहून माउलींची ओवीच आठवते.

'की फळलिया तरुची शाखा सहजी झुके भूमीसी देखा' जे तरु फळांनी बहरलेले असतात, तेच तर झुकतात. कोरडी झाडं मात्र आपला ताठपणा सोडत नाहीत. किंवा कोरडी असल्याने सोडू शकतही नाहीत. असे फळलेले तरु दृश्य-अदृश्य स्वरूपात अस्तित्वात आहेत, म्हणूनच तर समज म्हणून आल्हाद देणारी संजीवक सावली जिवंत असल्याचा दिलासा मिळत राहतो. पण आजच्या काळात कुठेतरी अशा तरुंची किंबहुना त्यांच्या तशा वाढण्याचीच पडझड होत असताना, एकीकडे चिंता तर दुसरीकडे भूमीच्या पोटातील नव्या अंकुरांची आशा मनात पालवत रहाते. असो. पण सुधा मूर्ती यांच्या कामाचा हा ऋजू ठसा अमीट आहे, अक्षय आहे हे निःसंशय. म्हणूनच तर त्यांच्याकडे पाहून 'मूर्त सुधा' असं मनापासून म्हणावसं वाटतं.

- पार्थ जोशी