स्वप्नीच वेध घ्यावा..

युवा विवेक    03-Aug-2024
Total Views |


स्वप्नीच वेध घ्यावा..

स्वप्न म्हणजे माणसाच्या जगण्याची आशा.. ज्या 'उद्या' नावाच्या गोष्टीनी माणसाला 'आज'चा विसर पडावा.. अशी गोष्ट म्हणजे स्वप्न.. स्वप्नाची अशी व्याख्या करता येईल. पण स्वप्न मुळातच कुठल्या व्याख्येत किंवा साचात बसवता येत नाही. ते मुक्त असतं. या मुक्तपणामुळेच ते माणसाला पुन्हा पुन्हा पहावंसं वाटतं. आजच्या आनंदात माणूस जितका रमेल त्याहूनही अधिक तो उद्याच्या स्वप्नात रमतो. काही स्वप्ने नवी तर काही नव्याने फिरुन आलेली असतात. आपण झोपेत जी स्वप्न पाहतो ती आपण जागेपणीच पाहू असं नाही. जागेपणी पाहिलेल्या स्वप्नांच्या मागे एखादा नवा विचार असतो. माणसाला स्वतःचं आयुष्य स्वतःच रंगवता येत नाही. आयुष्याचं पुढील चित्राची तो कल्पनाही करु शकत नाही. पण स्वप्नांचे मात्र तसे नसते. त्या स्वप्नाचं चित्र काढण्याची संमती त्याला मागावी लागत नाही. कोणताही रंग तो चित्रात सहज भरु शकतो. अगदी जरी सा-या विश्वाला ते चित्र फारसं आवडलेलं नसलं तरी त्याला ते चित्र मनापासून आवडलेलं असतं. भविष्य हा त्या स्वप्नाच्या चित्राचा आकार आहे. विचार आणि भावना म्हणजे त्याच्या आडव्या-उभ्या रेषा आहेत. निरनिराळ्या कल्पना, नात्यातली किंवा परकी माणसे, पशु-पक्षी-प्राणी, पैसा, इमले, गीत-संगीत, कला, एकटेपण, आपलेपण, फुले-पाने, जमीन, आभाळ आणि या विश्वातल्या ज्या ज्या गोष्टी म्हणून तो आपल्या मानतो त्या सा-या गोष्टी म्हणजेच त्या चित्रात भरलेले रंग आहेत. हे स्वप्न किंवा स्वप्नाचं चित्र बघूनच नाना अडचणींनी ग्रासलेला माणसाला नव्याने जगावंसं वाटतं.

         
हे स्वप्न म्हणजे माणसाने आपल्याच आयुष्याला वाहिलेले सुंदर फूल आहे. या स्वप्नफुलांचा दरवळ मनात येताक्षणी हातातल्या कामाचा त्याला क्षणभर का होईना पण विसर पडतोच. हाच विसर पडल्यामुळे माणूस ख-या अर्थाने 'जिवंत ' आहे, असंच म्हणता येईल. एखाद्या कवीच्या मनात असंख्य कल्पना कितीदातरी दाटून येत असतात. कविता हे कवीचं स्वप्नच आहे. म्हणूनच एखादी कविता लिहताना स्वतःच्या आयुष्याच्या देखील कवीला विसर पडतो. त्या कवितेचं गाणं होताना संगीतकाराला स्वतःच्या आयुष्यातल्या रडगाण्याचा विसर पडल्यावाचून राहत नाही. या स्वप्नाच्या दुनियेतलं हे गाणं जेव्हा एखादा श्रोता किंवा रसिक ऐकतो तेव्हा ते गाणं ऐकण्यासाठीच आपलं जीवन निर्माण झालेलं आहे, असा त्याला भास होतो. काही माणसं ईश्वराचं अस्तित्व मानत नाहीत. अर्थात, त्या माणसांना नास्तिक म्हणता येईलच. पण नास्तिकतेची माझी व्याख्या काहीशी वेगळी आहे. ज्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीशी, निसर्गाशी आपलं जगणं जुळवून घेता येत नाही, या विश्वातल्या ज्या ज्या गोष्टी म्हणून सुंदर आहेत त्याची स्तुती करता येत नाही नि स्वतःच्या मनावर श्रद्धा ठेवता येत नाही ती व्यक्ती नास्तिक आहे. अशा व्यक्तीने ईश्वराच्या नामाचा कितीही वेळा जप केला तरी तिला आस्तिक म्हणताच येणार नाही. याउलट, साधंसं फूल फुलल्यानी देखील जिला आनंद होतो आणि त्या फुलाच्या फुलण्यावर जी व्यक्ती श्रद्धा ठेवते ती व्यक्ती ईश्वर मानत नसली तरी तिला आस्तिक म्हटले पाहिजे. आस्तिक आणि नास्तिकतेचा संबंध धर्माशी नि ईश्वराशी नसून तो श्रद्धेशी आहे. म्हणूनच, जो ईश्वराला मानत नाही त्याने पाहिलेल्या स्वप्नांवर श्रद्धा ठेवावी. त्या श्रद्धेमुळेच त्याला राग, लोभ, मत्सर वगैरे भावनांचा विसर पडेल आणि ख-या अर्थाने तो जगण्यावर श्रद्धा ठेवेल.

         
स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याचा माणसाने सतत प्रयत्न केला पाहिजे. ते साकार होतानाच त्याचं सौंदर्य वाढतं. माणसाच्या जगण्याला स्वप्ने दिशा देतात. वास्तवाच्या अंधारात स्वप्नचांदण्यांच्या छोट्याशा प्रकाशाचाही व्यक्तीला आधार वाटतो. तुमचं नि माझं मन रोज नवी स्वप्ने बघत असतं. पण त्यातल्या ब-याचशा स्वप्नांची नोंद आपण ठेवतही नाही. ती नोंद आपण ठेवली म्हणजे प्रत्येक स्वप्नाचं वेगळेपण नि आपल्या जीवनाशी त्या स्वप्नाचा संबंध आपल्याला सापडेल. लहान मूल रंगीत गोळ्या खाण्याचं स्वप्न पाहतं, तरुण मन प्रेमाचं स्वप्न पाहतं, मध्यमवयीन व्यक्तींच्या मनाची स्वप्ने अधिक परिपक्व असतात, तर वृद्धांच्या मनाची स्वप्ने समाधानी असतात. एखाद्या गावाला आपण निघालो की, आजूबाजूची झाडे, डोंगर आपल्याबरोबर धावतात असंच आपल्याला वाटतं. स्वप्नांचंही तसंच असतं. ती आपल्याबरोबर धावत असतात. फक्त वयाच्या वळणावर त्यांचं स्वरुप बदलतं.. पण स्वरुप बदललं तरी चित्राचं सौंदर्य कायम असतंच. स्वप्नांचा वेध आपल्याला स्वप्नात घ्यायला शिकवणारं 'ही वाट दूर जाते. ' हे शांताबाई शेळके यांचं गीत अगदी बोलकं आहे. त्या गीताच्या शेवटच्या ओळी अशा आहेत, स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा !

-
गौरव भिडे