मोगरा फुलला..

युवा विवेक    19-Aug-2024
Total Views |


मोगरा फुलला..

 

स्मिता आणि सुशीला ऑफिसमधल्या कलिग्स. त्यात दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी. नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता ऑफिसमधून निघाल्या. आज दोघींचा मूड काही चांगला नव्हता. एकतर गजबजलेला रस्ता, त्यात पाऊस आणि त्यामुळे झालेला चिखल.. छत्र्या उघडून, रस्त्याकडे बघत दोघी चालल्या होत्या. सुशीलाने किती प्रयत्न केले बोलायचे, पण स्मिता काही बोलेचना! सुशिला म्हणाली

"ए बास झालं हां स्मिता. इतकी कसली खट्टू झालीस? ऑफिसमधून बाहेर आलोत आपण. तिथले विषय सोडून द्यायचे तिथेच. चल.. काही खायचं का?"

"नाही गं. पण उदास कशी नको होऊ? तू भलती उदार असशील. मी नाही. आपण दोघींनी केलेल्या कामाचं क्रेडिट द्यायचं नाही, आणि चुका मात्र कावळ्याच्या डोळ्यांनी दाखवायच्या.. असंच्चे हे सरांचं वागणं. आता आपण केलं होतं ना शहांचं प्रोजेक्ट? जाऊदे. तुला नाही का वाईट वाटलं? करुन सरून आपण कुणीच नाही बघ.. घरी पण आणि दारी पण तेच." स्मिताची टेप सुरुच होती.

खरं हे सुशीलाला मनापासून पटत होतं. या शब्दांनी तिच्या आतली तार छेडली होती. स्मिताला खुश करायचं सोडून आता सुशीलाच उदास झाली.

अचानक थांबलेला सुशीलाचा आवाज बघून स्मिताने पाहिलं, तर सुशीलाचा चेहरा पडला होता. मगाशी ऑफिसमध्ये नाही पडला तितका आत्ता उतरला. एखादा कटा टोचता क्षणी दुखत नाही त्यापेक्षा आत रुतल्यावर आतून तुटावं तसंच काहीसं झालं तिचं. स्मिताला जरा हळहळ वाटली खरी, पण समदुःखी सोबत असण्याचं सूप्त हवेपण तिला मिळालं होतं. बस पकडून त्यातल्या ढकाढकलीत वाट काढून, दोघी आपल्या स्टॉपवर उतरल्या. पाऊस थांबला होता, पण चिखल आणि चिकचिक होतीच. चालता चालता, सुशीला अचानक थांबली. तिला दिसलं, रस्त्याच्या कोपऱ्यात एका लहानशा रोपाला आलेलं, अगदी नाजूक कोवळं फूल. ती क्षणभर फुलापाशी गेली, आणि ते पाहता क्षणी, तिच्या गालावरची खळी फुलली. अगदी साधं रानफूल ते. त्याच्या पिवळ्या केशरी पाकळीवरचे पाण्याचे थेंब तिने बाजूला केले. ओल्या बोटांना झालेला त्या पाकळ्यांचा नाजूक स्पर्श अनुभवत ती पुढे निघाली सुद्धा. हे सगळं पाहणाऱ्या स्मिताला मात्र आश्चर्य वाटत होतं. एक ते छोटंसं फूल, त्याचा एवढा आनंद? कमालच आहे! पुढे रस्ताभर सुशीला आनंदाने गुणगुणत होती. त्यामुळे स्मिताची उदासी सुद्धा मावळून गेली.

सुशीलाचा निरोप घेऊन स्मिता घरी गेली. कुलूप उघडलं. अजून मुलगा ग्राउंडवरुन यायला वेळ होता. ती शांत होती आतून. विचार करत होती. एक फूल पाहून इतका आनंद व्हावा? टेंशन विसरुन जावं?

शेजारच्या आजींनी लावलेलं गाणं मागून ऐकू येत होतं.

'इवलेसे रोप, लावियले द्वारी

तयाचा वेलू गेला गगनावरी..'

हे ऐकून ती स्वतःशी हसलीच! स्वतःशीच बोलू लागली

'आनंद इवलासाच असतो की! मगाचच्या फुलासारखा. त्याचा वेलू मात्र मनाचं अवघं आकाश व्यापून टाकतो.'

याच विचारात तिने चहा करायला ठेवला.

'देवाने अशी कितीतरी रोपं लावून ठेवली आहेत आपल्यासाठी. किती सुंदर आनंद आहे त्यांत! आपणच बघायला हवं नाही?'

आता गवतीचहाचा वास सुद्धा तिला आनंद देत होता.

तो उकळेपर्यंत ती बाहेरच्या सोफ्यावर आरामात टेकून बसली.

मऊ आवाजातले स्निग्ध मधुर स्वर तिच्या कानी पडत होते

'मोगरा फुलला.. मोगरा फुलला..'

या मोगऱ्याच्या सुगंधात ती हरवून गेली होती..

~ पार्थ जोशी