पुण्याच्या लकडी पुलावरून अनोळखी रस्त्यांची ओळख काढत माझी भटकंती सुरू झाली होती. गळ्यात शबनम बॅग अटकवून अन् पायात कोल्हापुरी चप्पल घातलेला मी भर उन्हात लकडी पुलावरून निघालो होतो.
उन्हात अधूनमधून पुलाच्या खालून वाहणाऱ्या मुठेच्या पात्रात डोळे भरून बघत होतो. नाल्याखोल्याच्या पाण्याने बरबटलेली मुठा माय तिच्या आत पडलेल्या, वाहत असलेल्या अनंत किड्यांचा काफीला घेऊन एकसंथ वाहत होती.
एकाअंगाला दगडी मंदीराच्या अडोश्याला भरदुपारी भर उन्हात मांडलेला देशी दारूचा घाट अन् त्यांच्या पोटात वाहणारे जाणारे देशीचे पाट. दुसऱ्या अंगाला झोपडीवजा बकाल वस्ती गुरं, ढोरं, डुकरं, गाढवं अन् त्यांच्या आश्रयाला असलेली माणसं.
कुणी नदीच्या थडीला लागून तळीरामांनी टाकून दिलेल्या बाटल्या भंगारात विकत घेतात म्हणून गोणपटात त्या जमा करत होतं. कुणी एक तरुण काळ्या रापलेल्या शरीराचा उघडा, नागडा देह घेऊन साडी फेडलेल्या पंचविशीतील त्याच्या तरुण काळ्या पण नाकी, डोळी सुंदर असलेल्या बायकोला घेऊन मुठेत वाहणाऱ्या, अंडी घालणाऱ्या सोनसळी मासोळ्यांना जाळ्यात पकडत होतं.
महाविद्यालयातील चार-पाच नवतरुण प्रेमी युगुलांची जोडपे कुण्या बोडक्या बाभळीच्या आश्रयाला बसून जगणं साकार करीत भविष्याच्या गप्पा करत बसलेली होती. त्यांच्यासाठी सध्यातरी मुठा निवांत वाहत होती.
अधूनमधून देशी रिचवत असलेल्या तळीरामांच्यात शिव्यांचा भडीमार होत असत, तेव्हा मासे पकडणाऱ्या त्या तरुणीच्या काळजाचा थरकाप उडायचा. तिची भेदरलेली नजर डोळ्यांतून सुटायची नाही.
अन्; इकडे जाळ्यात काही सोनसळी मासोळ्या येत नाहीये यामुळे त्या रापलेल्या शरीराच्या तरुणाचा होणारा तरफडा बघितला की, दारु ढोसत असलेल्या तळीरामांच्या चखन्यातील तिखट मीठ लाऊन केलेली बोंबलाची खुडी उद्या त्यांना भेटणार नाही. मग ते काय करतील, काय खातील हा प्रश्न मला पडून गेला.
लकडी पुलावर घेतलेला हा दहा मिनिटांचा विसावा मला खरं पुणे दाखवून गेला. बाराव्या मिनिटाला पुलावरच एक कान कोरणारा, कानातील मळ काढून देणारा भेटला. मला आदी त्यांची वेगळीच भीती वाटायची, बळजबरी माझ्या अंगाला लुचून कानात लाचकंड घालून त्यानं कानातील मळ असलेला एक गोळा त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्यावरच्या त्वचेवर ठेवत मला दाखवला. अन् बीस रुपये मे दो कान मेडीसिन डालकर साफ कर दुंगा साहब म्हणाला.
खिश्यात चाळीस रुपये होते, याला वीस दिले तर खायचं काय दोन दिवस म्हणून हिशोब जुळवून घेतला. शुक्रीया म्हणून मी बळजबरी तिथून निघालो, त्यानं थोडी चिडचिड करत त्याच्या हातावर घेतलेला तो मळ मूठेच्या पात्रात फेकून दिला. अन्; पुढे पुलावर अनवाणी पायांनी निघून गेला.
का कुणास ठाऊक वाटलं मळ काढून घ्यायला हवा होता. असं किती गिऱ्हाईक त्याला या आयटी कंपन्या असलेल्या पुण्यात भेटत असेल, अन् लाखोंची पॅकेज असणारी माझ्या वयातील तरुण मुलं खरंच यांच्याकडून कानातील मळ काढून घेत असेल का..? कधीकधी पैसा माणसाला श्रीमंत करतो तो असा म्हणून दोन पैकं कमवायला हवं आहे. त्यासाठी या पुणेच्या वाटा जवळ करत राहतो.
असंच भटकत भटकत काहीही माहीत नसताना कधी एकदा पुण्याच्या प्रसिद्ध पेठेत येऊन गेलो कळलं नाही. माझ्याच वयातील एक गोरीचिट्ट तरुणी मला बघून बोलू लागली, दोनशेत काय करायचं ते करून घे आज धंदा नाही.
पुढे थोडी चाळीशी ओलांडलेली एक बाई भेटली ती बोलली देडसो मे उपर-निचे सबकुछ कर ले बेटा. अरे बेटा म्हणतेय तू मला..! असं बोलत मी तिथून पुढे भटकत राहिलो. अन् जसंजसं मी भटकत राहिलो तसतसं दोनशे, पाचशे, आठशे, एक रात के दो हजार असा माझा लिलाव तिथं त्या गल्लीत होत राहिला.
अन् आता मला खूप कळलं होतं की, आपण लोकांनी बदनाम केलेल्या बदनाम वस्ती नसलेल्या पण; बदनाम वस्ती म्हंटलेल्या बुधवार पेठेत भटकंती करत होतो. कुठेतरी वाटलं खिश्यात असलेल्या चाळीस रुपयातील वीस रुपयाची नोट माझ्याच वयातील एखाद्या तरुणीच्या हातात कोंबून तिच्या लाल ओठांवरील जखमा तिच्याकडून वधवून घ्याव्या अन् ऐकत रहावं प्रत्येकीची एक वेगळी तिची कहाणी.
वीस रुपयात मी काही त्यांना बोलतं करू शकलो नसतो. अन् ; पुढे काहीच नाही दोन-चार पाने लिहून घेतली असती, बोलून घेतलं असतं पण मला काय करता येणार होतं. अखेर तिथंच एका मडक्यातून गिल्लासभर पाणी मी नरड्याच्याखाली ओतलं अन् पुन्हा भटकत राहीलो. रस्ता कुठे वाटा मोकळ्या करत मला घेऊन जात होता माहीत नाही पण हाती खूप काही लागलं होतं अन् हातातून खूप काही सुटून गेलं होतं.
कारण भर बुधवार पेठेच्या बाजारात आज माझा, माझ्या शरीराचाही लिलाव ती माझ्या वयातील तरुणी, मला बेटा म्हणनारी ती बाई, दोन हजारात एक रात्र सोबत करणारी अजूनतरी ती कुणीतरी करत होतं.