आयुष्यात काही काळ निवांत घालवला असल्यानं, आयुष्याची गणितं जुळवत असताना होणारी तारेवरची कसरत अनुभवली आहे. त्यामुळं असं किती दिवस चालायचं माहित नाही. पण; सुखाचे दिवस बघायचे म्हणजे आयुष्यात थोडी कसरत अनुभवल्याशिवाय ते दिसत नाहीच. तर करूयात अजून थोडी कसरत आयुष्य जगत असताना.
उठलो अन् बराचवेळ बाहेरचा निसर्ग न्याहाळत बसलो, आजचा दिवस निवांत असणार म्हणून सगळं निवांत होतंच. सध्या वाचन करण्याची इच्छा नाही, त्यामुळे पुस्तकं हाताला ठेवलेली नाहीये. लेखन सपशेल थांबवलं आहे.
बस जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मनसोक्त झोपून घेतो अन् निवांत पडून आराम करून घेतो. इतक्या दिवस बाहेर राहिलो पण अलीकडे घराची, आईची आठवण प्रकर्षानं येते. हे सगळं लिहायला घेतलं की, अजूनच दाटून येतं म्हणून अलीकडे लिहायचं बंद करून टाकलं आहे.
बेडरूममधला फॅन गरगरतोय, त्याचा आवाज ऐकत अन् बाहेर पक्षांची किलबिल ऐकत निवांत झोपून आहे. आज सुट्टी असल्यानं ऑफीसचा युनिफॉर्म धुवून, प्रेस करून ठेवावा लागेल. थोड्यावेळाने हे सगळं करेल म्हणून आजच्या कामाची गणितं जुळवत बसलो होतो.
मगाशी कॉफी पीत होतो तेव्हा सगळे जुने दिवस डोळ्यासमोरून झरकन निघून गेले. आयुष्य म्हणजे फक्त तडजोड आहे हे उलगडत गेलं.
एमआयडीसीमध्ये कंपनीत कंत्राटी कामगार होतो तेव्हाचा दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज सुटला. तो सोडला तर आयुष्यात फार काही बदल वाट्याला आले नाही. रोजचं कंपनीच्या गेटवर जाऊन आज काम भेटल का प्रश्न अन् त्याचं उत्तर सोडवत कंपनीत बारा-बारा तास ढोरासारखे राबण्यात कुठलं आलंय स्वतंत्र.
पण; देवानं पोट दिलं आहे त्याला भूक लागणारच अन् भूक लागली म्हणजे भाकर लागणारच मग ती मिळण्यासाठी हे असं राबत रहायचं.
औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी कामगार अन् त्यांचं जगणं बघितलं की, आयुष्याची गणितं कशी जुळवायची हे सहज कळून येतं. महिन्याला बारा हजार पगार झाला की बॅचलर असेल तर खानावळ, तुंबलेले बाथरुम असलेली रूम अन् तिचे रूमभाडे. रोज सांजेला लागणारी देशीची नाईंटी, महिन्यातून कमीत कमी दोनदा बाजारात तिच्यासोबत झोपायचं म्हणजे तिची चैन.
यातच या बॅचलर पोरांचं भवितव्य दिसून येतं यातून एखादा सुटला तर तो खूप पुढं जातो, नाहीतर आयुष्यातून उठून जातो. यंत्राच्या सान्निध्यात काम करत राहणारी ही पोरं कधी यंत्र झाली कळलं नाही. माझा भूतकाळ काही वेगळा नव्हता, पण; संवेदनशील मन अन् जगण्याची गणितं जुळवत बसलो. जेव्हा वाटलं हिशोब जुळत नाहीये तेव्हा तेव्हा पर्याय शोधत भटकत राहीलो.
या नाही त्या कंपनीच्या सुपरवायझरला पंधरा दिवसाला नाईंटीसाठी दहा-पाच देत राहीलो. माझ्यासारखी शे-दोनशे पोरं त्यांना पैसे देत राहीले. अन सुपरवायझर त्या बदल्यात बाजारात अम्मा जशी आमच्या वयाची पोरगी आम्हाला योग्य भावात देते तसं तो आम्हाला कंपनीत काम देत राहीला.
ज्या दिवशी त्याला नाईंटी दिली नाही त्या दिवशी त्यानं आज का प्लांट फुल हैं म्हणून रात्री साडे अकरा वाजता कंपनीच्या गेटवरून हाकलून दिलं. तिकडून अम्माकडे गेलो तेव्हा अम्मानं तिचा नुकताच तिच्या प्रियकराने फेडलेला पदर सावरत फुकटात मला खाली होऊ दिलं.
सगळं झाल्यावर अम्माला विचारलं आज बडी खुश है..!
तर बोलून गेली,
आज प्यार करनेवाले जिस्मने मेरे जिस्म का पैसो मे सौदा कीया..!
तुम कमसे कम आज की श्याम याद रखोगे.!
डोक्यात चक्कर यावं तसं गरगरले अन् तिथून तडक तुंबलेल्या बाथरुमच्या खोलीत येऊन मी पोटुशी असलेल्या विशीच्या रुबीनासारखं उलट्या करत राहीलो, घायाळ होत राहिलो.
दुपारी जेव्हा तीन वाजता दुसऱ्या शिफ्टसाठी कंपनीत कामाला जायला निघालो तेव्हा कळलं की, दररोज कंत्राटी कामगार पोरांच्या पैश्यात फुकट नाईंटी पिणारा सुपरवायझर दारूमुळे लिव्हर फेल झाल्याने पोटात पाणी होऊन मरुन गेला. वाईट वाटलं त्याच्यासाठी अन् सोबत चिंता होती की आता उद्या कुणाला काम मागायचं. अम्माकडे आपलं शरीर फेडायला दिलं असतं तर आपण तिच्या भाषेत "औरत" नव्हतो.
भारत लक्ष्मण सोनवणे.