पाऊस कवितांचा..

युवा विवेक    27-Jul-2024
Total Views |


पाऊस कवितांचा..

हल्ली कविता म्हटलं म्हणजे तो थोडासा कंटाळवाणा विषय लोकांना वाटतो. शायरी हा प्रकार अलीकडे अधिक लोकप्रिय झालेला आहे. इन्स्टंट या शब्दाचं महत्व वाढतंय. अखंड कविता ऐकण्याऐवजी किंवा वाचण्याऐवजी चारोळी लोकांना आवडते. आपलं म्हणणं चार ओळीत पटवून दिलं म्हणजे ती चारोळी आणि तो चारोळी लिहणारा लोकप्रिय होतो. पण या सा-या गोष्टींच्या पलीकडे जाणे आणि परंपरा व अधुनिकता यांच्यात समीकरण साधणे म्हणजे विवेक होय. आपलं नाव 'विवेक' कायमच सार्थ ठरवत आलेलं आहे. पुण्यात 'युवाविवेक ', 'विवेक साहित्य मंच ' आणि 'पुणे मराठी ग्रंथालय' आयोजित 'खुलं कवी संमेलन' पार पडलं. कविता हल्ली कोणी करत नाही, कोणी फारशी मराठी कविता वाचत नाही वगैरे बाबींना अगदी खोटं ठरवेल असंच हे संमेलन पुणे मराठी ग्रंथालयाच्या केशव सभागृहात झालं. दहा-पंधरा-वीस नव्हे तर तब्बल पन्नास-पंचावन्न मराठी कविता केवळ 'पाऊस' या एकाच विषयावर सादर झाल्या! वय वर्षे दहा ते वय वर्षे ऐंशी पर्यंतचे कवी या संमेलनात प्रत्यक्ष कविता सादर करण्यास सहभागी झाले होते. या संमेलनात निरुपमा ताई आणि कवयित्री सुचित्रा ताई यांच्यासारख्या कवयित्री प्रमुख अतिथी लाभल्या होत्या. निरुपमा ताई म्हणाल्या, "पाऊस सगळीकडे सारखा पडतो.. झोपडी असो, बंगला असो, पाऊस आपलं सारखेपण टिकवतो. पाऊस जाणणारा माणूस वेगळा असल्यामुळे भावनेतून कविता तयार होते " सुचित्रा ताईंनी सादर केलेल्या कवितांना इतक्या टाळ्या मिळाल्या की, त्यावरुन सर्व कवींना त्या कविता किती आवडल्या असतील याची कल्पना उपस्थितांना आली. या कवितांच्या पावसात भिजताना प्रत्येक कवितेचं वेगळेपण जाणवत होतं.. कितीतरी शब्द आपल्या मराठी भाषेत असतात. एका कवीने दुस-या कवीची कविता ऐकली म्हणजे साहित्याची ख-या अर्थाने देवाण-घेवाण होते. ह्या देवाण-घेवाणीतूनच प्रतिभेच्या सौंदर्यात नवनवे शब्द नि अर्थांचा पाऊस पडतो.. प्रतिभेला पुन्हा पुन्हा पालवी फुटत राहते. ह्या भरुन आलेलं संमेलनाच्या आभाळातून कवितांचा पाऊस बरसतो. काव्यरसिक त्यात चिंब न्हातात. तेव्हा साहित्यात कवितांचं महत्व आणि वेगळेपण असं दोन्हीही आपल्याला जाणवतं..

साहित्य आणि माणूस यांचं नातं सृजनाचं असतं. म्हणूनच साहित्य कधी जुनं होत नाही आणि नवनवीन साहित्याची निर्मिती देखील होते. पावसावर कितीतरी कविता आपण यापूर्वी वाचलेल्या असल्या तरी एखाद्या संमेलनात पन्नासाच्या आसपास पावसाच्या नव्या कविता सादर होणं यातूनच प्रत्येकाचं पावसाशी किती वेगळं नातं असतं याची आपल्याला कल्पना येते. पावसाची कविता आपण कुठेही वाचली तरी मन भिजतं. पावसाच्या कवितांना आपापलं असं एक वय असतं. पण कविता वाचताना मनाचं वय क्षणभरात बदलण्याची शक्तीही कवितेकडे असते. साठी पार केलेला एखादा आजोबा 'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय...' ही कविता आपल्या नातवाबरोबर म्हणताना छान फेर धरतो. स्वयंपाक करताना ब-याचशा गृहिणींना रेडिओ ऐकण्याची सवय असते. फर्माईशीचा कार्यक्रम ऐकताना 'श्रावणात घननीळा बरसला, रिमझिम रेशीमधारा..' हे गीत लागलं तर क्षणभर आपण पावसात भिजतोय असंच तिला वाटतं. कविता बरेचदा कल्पनेच्या विश्वातली असते. म्हणूनच पाऊस नावाच्या एकाच कल्पनेतून तयार झालेली कविता कधी मुसळधार, कधी रिमझिम बरसते.


पावसाची कविता म्हणजे भरुन आलेलं आभाळ, बरसणारा पाऊस, चिंब भिजलेली धरा, ओल्या पायवाटा, दुथडी भरून वाहणा-या नद्या यांचं चित्र असतं. पण त्या कवितेत पाऊस आणि माणसाच्या नात्याचं वर्णनही असतं. म्हणूनच, 'चिंब पावसानं रान झालं..' सारखी कविता महानोरांना लिहावीशी वाटते.. या कवितांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाची कविता लिहायला तुम्ही निसर्गकवीच असण्याची गरज नसते. तुम्ही अगदी कवी नसाल तरी पाऊसच तुम्हाला भावना पुरवतो आणि त्या भावनांच्या आभाळातून एकेक थेंब यावा तसे शब्द तुमच्या मनाचं अंगण अगदी चिंब करतात. मनाच्या अंगणभर नाचणारा हा शब्दांचा पाऊस मग तुमच्याही नकळत कागदावर उतरतो.. या कविताच दोन मनातल्या पावसाची गाठ घालून देतात. दोन पाऊस एकमेकांना भेटतात. या ओल्या भेटीतूनच नातं फुलतं.. काव्यरसिकांनी कविता वाचाव्यात, ऐकाव्यात. यातून रसिकांचा आणि कवींचा स्नेह वाढतो. हा स्नेह जाणण्यासाठी पावसाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. आताही छान पाऊस बरसतोय. भिजलेले रस्ते, आडोशाला थांबलेली माणसे, वाफाळलेला चहा, आपल्या गंधाने तुम्हाला आणि मला साद घालणारी कांदाभजी आणि असंख्य मनात दाटलेली कविता या सा-यांचं जणू संमेलन भरलंय!



- गौरव भिडे